
||...अवध्य मी...|| 

शिवसेनेची अज्ञानी आयात खासदार प्रियंका चतुर्वेदीने संसदेत " माफी मागायला मी सावरकर नाही.." हे वाक्य उच्चारले आणि त्या क्षणीच संसदेत.. महाराष्ट्रात.. देशात ह्या वाह्यात बाईने बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेच्या पुण्याईचं जाहीर वस्त्रहरण केलं..! त्याच क्षणी शिवसेनेची आन-बान-शान शरमिंदा झाली..! निस्वार्थ, निर्भिड, निस्सीम अशा एका हिंदुहृदयसम्राटाच्या निष्कलंक चारित्र्याचा.. तेजस्वी, तडफदार अशा दुसर्या हिंदुहृदयसम्राटाच्या अनुयायाने निष्कारण केवळ आकसापायी अवमान केला आणि इथेच शिवसेनेची अखेरची घरघर सुरु झाली..! पूर्वी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार, नगरसेवकच नव्हे तर प्रत्येक शिवसैनिक हा "वाघ" आहे ही ओळख द्यायला लागत नव्हती..! पण दुर्दैवाने आज हे कोकलून सांगावं लागतंय..! बाळासाहेबांचा कट्टर, कडवा शिवसैनिक आज खासदार असता तर सावरकरांचा असा अवमान त्याने केलाच नसता..! आणि व्हायला पण दिला नसता..!
उठसूठ दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करणारे शिवसेनेचे वाचाळ बोरुबहाद्दर तथा साक्षात् पक्षप्रमुखांनी या घटनेचा एका शब्दाने निषेध न केल्याने.. वा दिलगिरी व्यक्त न केल्यामुळे इथेच शिवसेनेने नैतिक अधःपतनाचा तळ गाठला..! आज बाळासाहेब हयात असते तर सर्वप्रथम पक्षप्रमुख नात्याने त्या बिनडोक महिलेची पक्षातून तात्काळ हाकालपट्टी केली असती.. चिरंजीवांची कानउघाडणी केलीच असती आणि त्याच क्षणी खरा "माफीवीर" कोण..? "नेहरु" की "सावरकर" हे दस्तावेजांसह सप्रमाण दाखवुन दिलं असतं..! एका बाजूला वाचन, अभ्यास, जाणिवा, नेणिवा, आदर्श तर दुसऱ्या बाजूला "उचलली जीभ.. लावली टाळ्याला" असा उध्दट, उथळ, उसळता प्रकार..! आणि हाच मुख्य फरक आहे "शिवसेना प्रमुख" आणि "पक्ष प्रमुख" ह्या दोघां बापलेकातला ..! एक "विभूती".. तर दुसरी "अधोगती"..! गेली दोन वर्षे त्याचीच प्रचिती महाराष्ट्राला आणि देशाला येत आहे..! मोर नाचला म्हणुन लांडोर नाचून कसं चालेल..?
पंचेचाळीस वर्षांचे गांधी 1915 साली दक्षिण अफ्रिकेत दोन दशकांहून अधिक काळ राहुन जेंव्हा भारतात आले.. त्या आधी चार वर्षे अठ्ठावीस वर्षांचा एक क्रांतिकारी तरुण अंदमानच्या काळ कोठडीत बंद होता..! बैलाऐवजी त्याला घाण्याला जुंपुन इंग्रज त्याच्याकडून कोणाचं तेल काढुन घेत होते..! काथ्थ्या कुटून घेत होते..! झाडांच्या साली कुटून घेत होते..! स्वातंत्र्य समरयज्ञाची धगधग जिवंत ठेवण्यासाठी.. तथा त्यात इंग्रजांची आहुती देण्यासाठी सुटकेच्या संधीचा प्रयत्न करत होता..! स्वातंत्र्य यज्ञात
सर्वस्वाची आहुती दिलेल्या त्या निरामय चैतन्याला तुम्ही संधीसाधू सौदागर "माफीवीर" ठरवता..?
पु.ल. म्हणतात.. " विज्ञान महर्षी असल्यामुळेच खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद सांगणारा, आचरणात आणणारा.. सर्व धर्मातील अंधश्रद्धेवर टीका करणारा.. धर्मवेडे नांगी ठेवणारा हा सुधारक काँग्रेस प्रमाणेच सनातनी हिंदूंना पचवणे कठीण आहे..! "
साहित्य संमेलनात आपल्याच माणसांनी सावरकरांचा केलेला अपमान न रुचल्याने शरद पवारांनी " स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चा होऊच शकत नाही..! " अशा मोजक्या शब्दांत फटकार निषेधासह तीव्र नाराजी व्यक्त केली..! हीच सडेतोड भूमिका पक्ष प्रमुखांकडुन महाराष्ट्राला, देशाला अपेक्षित होती..! शिवसेनेत आयात केलेल्या नादान नंदीबैलांना तुम्ही वाघाचं कातडं सहज पांघराल हो..! पण त्यांच्या धमन्यांतून वाहणारं पूर्वाश्रमीचं नासकं, सडकं रक्त कसं बदलणार..? बुध्दिचा गंध आणि अकलेचा अंश नसलेल्या " प्रियंका " ह्या नावातच सर्व काही आलं..! एवढं मात्र निश्चित की शिवसेनेच्या आयात केलेल्या ह्या निर्बुद्ध महिला खासदाराने आपल्या अकलेचे तारे तोडुन राहुल गांधींना "प्रियंका" नावाची आणखी एक बालिश बहिण आहे हे दाखवुन दिलंच.. आणि त्याचवेळी शिवसेनेला अनेक योजने बॅकफूटवर फेकून दिलं..!
जो प्रदीप्त सूर्य करोडोंच्या मनामनात तळपतोयं, तेजाळतोयं.. ज्याच्या माध्यान्हीच्या तेजस्वी तेजाची दाहक प्रखरता आणि ज्याच्या सर्वस्वाच्या समर्पणाचं अर्घ्य साऱ्या जगाने पाहिलंय.. वाचलंय.. अनुभवलंय.. मान्य केलंय त्या अवध्य तेजोनिधी सूर्यावर तुम्ही कितीदा थुंकणार..?
" गलतके साथ गलत करनेवाला गलत नहीं होता..!" असं भगवद् गीता म्हणते..! तेंव्हा " माफीवीर कोण..? " आणि " माथेफिरु कोण.? " याचा निवाडा सव्वाशे करोड जनतेला करायला सांगा..! आहे हिंमत..?
- अनंत सामंत
स्तंभलेखक पत्रकार
वसई.
No comments:
Post a Comment