Sunday, January 22, 2023

 दिवाळी

दिवाळी साठी आलेल्या
मुलांच्या गाड्या
धूळ उडवत
निघून गेल्या...
संथ पावलांनी
आजी-आजोबा
अंगणातून भल्याथोरल्या
बंगल्याकडे परतले...!

आजी क्षणभर टेकली
पायरीवर...
डोळे टिपण्यासाठी...
झोपाळ्यावर बसत
आजोबांनी
पेपराआड
गिळला आवांढा....!

मग मात्र
पदर बांधून आजी
लगबगीनं उठली
घरादारावर
तनामनावर
पसरलेली
दिवाळी आवरण्यासाठी...!

स्वयंपाकघरातले
रिकामे झालेले
फराळाचे डबे
घासायला देताना
चकली हवी म्हणून
हट्ट करणारी नात...
दिवसाला बेसनाचे
चार चार लाडू
गट्टम् करणारा नातू
आईच्या हातची
त्याच चवीची
आवडती करंजी
मनापासून खाताना
तोंड वळवून
लेकानं पुसलेले डोळे...
बस्स्
सार्थक झालं
आठवडाभर राबून
केलेल्या फराळाचं...!

मग तिनं
पांघरुणांच्या घड्या
अलगद ठेवून दिल्या
कपाटात...
एरव्ही पाहुणे राउळे
येउन गेल्यावर
धोब्याकडे जायचे कपडे...
पण मुला नातवंडांचा
स्पर्श साठवलेली पांघरूणं
ती न धुताच ठेवायची
आठवण आली की
त्यावरुन
हात फिरवण्यासाठी....!

लेकीसुनेच्या
आग्रहाखातर नेसलेल्या
भरजरी साड्या
ईस्रीला देण्यापूर्वी
लाजली ती..
मुलाबाळांच्या नकळत
पाडव्याच्या दिवशी
आजोबांनी तिच्या
रेशमी पदराला
चंदनाचं अत्तर लावलं
ते आठवून....!

अंगणातल्या किल्ल्यावरचे
शिवाजी महाराज,मावळे
रामदास स्वामी,गवळण
वाघ , सिंह,बदकं..
सगळी खेळणी
हलक्या हातानं
कागदात गुंडाळून ठेवले
पुढच्या वर्षासाठी..
ओकाबोका किल्ला
पाहताना
सुस्कारा सोडला तिनं....!

हे सगळं तिला  
एकटीलाच
आवरायचं असतं
हट्टच असतो तिचा...
या निमित्तानं
सगळी दिवाळी
पुन्हा अनुभवते ती...!

मात्र
दोघंही
ढाळत नाहीत आसवं..
मुलांचं दूर जाणं..
आपलं इथं राहणं..
अपरिहार्य आहे
हे समजुतदारपणानं
अंगिकारलंय त्यांनी....!

सांजावल्यावर
पोर्चमधे लावलेला
आकाशकंदिल मात्र
काढत नाही ती
वर्षभर...
कारण त्याच्या
झिलमिल कवडशात
हुडकत राहते ती
मुलं, नातवंडं,पतवंडांनाही
आणि 
वाट पहात राहते
पुढच्या दिवाळीची....!

========================================

माहेरवाशीण(काही वर्षापूर्वीची)...

गाडी आली घुंगुराची,
लेक आली माहेराला|
गेला होता ग लाडका,
भाऊराया आणायला |
         लिंबलोण आनंदे उतरी, 
         हसरी ती वहिनीबाई |
         आई आणि बाबांच्याही,
         आनंदा पारावार नाही|
मामा मामीच्या भोवती,
गलका होतो भाचरांचा|
आणि आईच्या मिठीत,
देह विसावतो लेकीचा|
            आई मायेने न्हाऊ घाली,
            जरी अंगी नसे शक्ती|
            आईची ग माया ती,
             वर्णावी किती किती ?
लेक आली माहेराला,
आज केली ग सांजोरी|
उद्यासाठी पुरणपोळी, 
रोज नव्या नव्या खिरी|
              किती करू लेकीसाठी!
              मन आईचे भरेना|
              आईची ती माया,
               ओसरता ओसरेना|
विटीदांडू आणि गोट्या,
खेळ रंगतो मुलांचा|
आई आणि मामीसंगे,
खेळ चाले भातुकलीचा|
              रोज नव्या नव्या गप्पा,
              वाटतो वेळच अपूरा|
              दिवस संपले बघता बघता,
             लेक निघाली सासुरा|
लेकीसाठी साडीचोळी,
मुलांसाठी कपडे,खेळणी|
कुरडया आणि पापड,
संगे मुरंबा लोणच्याची बरणी|
               गेली घुंगुराची गाडी,
               मनी दाटली हुरहूर|
               मागे चाले वेडी माया,
                डोळी आसवांचा पूर |
   ================================================
  

 ...माहेरवाशीण (सध्याच्या काळातील)

आली रिक्षा गेटवरी,
लेक माहेराला आली।
नव्हते कोणी स्वागतासी,
वोचमनने रजिस्टरला नोंद केली।1।

फ्लॅटचे बंद दार पाहुनी,
बेल वाजवी ती दारावरी।
थकलेले आई-बाबा,
हसतमुखाने आले सामोरी।2।

आय टी मध्ये भाऊ-वहिनी,
नाही मिळाली गं सुट्टी।
थरथरत्या हाताने आजी,
पाणी आणते नातवांसाठी।3।

सकाळी डब्यांची घाई घाई,
घाई कामवालीची गं पुन्हा।
लेकीला न्हाऊ घालण्याची,
इच्छा पुरी गं होईना।4।

माहेराला लेक आली,
' स्वीग्गी ' धावली मदतीला।
पिझ्झा, समोसे,वडे नाश्त्यासाठी,
घरी बनवण्या वेळ इथे कोणाला?।5।

टी. व्ही.वरील कार्टून,
आणि मोबाईलवरती गेम।
नाही कोणी खेळायला,
मुले बसली गं रुसून।6।

ऑनलाईन मागविली साडी,
ऑनलाईन खेळणीही मुलांसाठी।
मुलं बसली हटून,
मॉल मध्ये जाण्यासाठी।7।

लेकी संगे काय देऊ?
विचार करते गं आई।
शेवटी भावाने देण्यासाठी,
आणली गं मिक्स मिठाई।8।

लेक निघाली सासुराला,
रिक्षा मागविली दारी।
आई-बाबा निरोपला,
भाऊ-वहिनी नाही घरी।9।

तरीही लेक समाधानी,
तिजला वाईट नाही वाटले।
आई-बाबा,भाऊ-वहिनी,
चार दिवस तरी भेटले।10।

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...