Monday, January 9, 2023

 मराठी भाषा, देवनागरी लिपी, मोडी लिपी आणि लेखन नियमांबद्दल काही प्रश्न व काही समज -


1. मोडी ही मराठीची मूळची लिपी. देवनागरी लिपी नंतर मराठीवर लादली गेली.

देवनागरी लिपी मराठी लिहिण्यासाठी मोडी लिपीच्या आधीपासून वापरली जात असे. मराठीचा पहिला उपलब्ध लिखित पुरावा मानला जाणारा गोमटेश्वराचा शिलालेख देवनागरी लिपीतच आहे, मोडी लिपीत नाही. (मजकूर - "चामुंडराये करवियले, गंगाराज सुत्ताले करवियले")

मोडी लिपी फक्त राज्यकारभारासाठी वापरली जायची. जेव्हा राजदरबारात मोडी लिपी प्रचलित होती तेव्हाच सर्वसामान्यांमध्ये देवनागरीसुद्धा प्रचलित होती. तत्कालीन धार्मिक मराठी पोथ्या, हस्तलिखिते, घरगुती हिशोब वगैरे सर्व देवनागरीत केलं जाई. देवनागरी आबालवृद्ध सर्वांनाच कळत असे. म्हणूनच त्याला 'बाळबोध' असंही म्हणत (जिचा बाळांनाही बोध होईल अशी). 

.... आणि म्हणूनच त्या काळी मुलगी सासरच्यांना दाखवताना मुलीचे आईवडील आग्रहाने सांगत - "आमची मुलगी अगदी बाळबोध वळणाची आहे हो....". म्हणजे तिला बाळबोध (देवनागरी) अक्षरं वाचता येतात. त्यामुळे घरात देवाधर्माच्या पोथ्या वाचून ती वडीलधाऱ्यांना खूष ठेवू शकेल आणि लहान मुलांवर धार्मिक संस्कार करू शकेल असं पालकांना सांगायचं असायचं.

2. पण मग देवनागरी लिपी असूनही राज्यकारभारासाठी मोडी लिपी का वापरायचे?

कारण मोडी लिपी ही cursive आहे. म्हणजेच एका अक्षराला जोडून दुसरं अक्षर आणि एका शब्दाला जोडून दुसरा शब्द झरझर वेगाने लिहीत जाता येतं. म्हणूनच राज्यकारभारासाठी मोडी लिपी जास्त उपयोगी पडते. 

3. मोडी लिपीत एक वेलांटी एक उकार आहे. देवनागरीसारखे जाचक गोंधळवणारे शुद्धलेखन नियम नाहीत. म्हणून देवनागरी लिपी फेकून देऊन पुन्हा एकदा मोडी लिपी वापरणं सुरू केलं पाहिजे जेणेकरून मराठी शिकणं आणि वापरणं जास्त सोपं होईल. 

मोडी लिपीत एकच वेलांटी आणि एकच उकार आहे (ऱ्हस्व-दीर्घ नाहीत) हे खरं. पण ऱ्हस्व-दीर्घ हे शिकायला कठीण आहे हा गैरसमज आहे. शिकवण्याची पद्धत चुकल्याने उगाच कठीण वाटतं.

शिवाय, ऱ्हस्व-दीर्घ व्यतिरिक्तसुद्धा अनेक प्रमाणलेखन नियम आहेत. नियमांमुळे भाषा कठीण होते असं म्हटलं तर न आणि ण, ड आणि ळ, ल आणि ळ ही अक्षरं एकमेकांऐवजी वापरणं योग्य आहे असाही नियम काढायची मागणी करता येईल. माणूस पळतोय की पडतोय ते कडणार (कळणार) नाही. भूत, वर्तमान, भविष्य काळाचेही नियम काढून टाका आणि क्रिया कधी घडणार/ घडली/ घडतेय ते आपलं आपलं समजून घ्या असंही म्हणता येईल. मग ती भाषा कमी आणि सर्कस जास्त वाटेल.

4. पण मुळात शुद्धलेखन नियमांची गरजच काय?

पहिलं म्हणजे शुद्धलेखन हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे. त्याऐवजी प्रमाणलेखन हा शब्द वापरला पाहिजे. शुद्धलेखन ह्या शब्दातून असा अर्थ निघतो की ते नियम न पाळता केलेलं लेखन (विशेषतः ग्रामीण बोलींचं) अशुद्ध, कमी दर्जाचं असतं. त्यामुळे प्रमाण बोलीऐवजी ग्रामीण बोली वापरणाऱ्यांना उगाच न्यूनगंड येतो.

दुसरं म्हणजे प्रमाण लेखनाची गरज विविध बोली बोलणाऱ्या भाषिक समूहाला परस्पर संवाद सोपा जावा यासाठी असते. मराठी भाषेच्या बोलींची संख्या 40 पेक्षा जास्त आहे. अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी ह्या तर फक्त जास्त परिचित बोली आहेत. इतक्या वैविध्यपूर्ण भाषिक समूहाला परस्पर संवाद सोपा होण्यासाठी काही समान नियम लेखनापूरते स्वतःसाठी घालून घेणं गरजेचं आहे. नंदुरबारचा अहिराणी भाषिक बेळगावात पोचल्यावरही किमान लिखित सूचना/ माहिती कळावी किंवा कुडाळचा शिक्षक बदली होऊन गोंदियाला गेल्यावर किमान औपचारिक कागदपत्रे आणि लिखित संवाद तरी साधता यावा यासाठी प्रमाण लेखन नियम गरजेचे आहेत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखन जितकं प्रमाणबद्ध तितका अर्थ नेमका व्यक्त होतो. आज इंग्रजी, जर्मन वगैरे युरोपीय भाषांमध्ये किती वाजल्यानंतर good afternoon म्हणावं आणि किती वाजल्यानंतर good evening म्हणावं याचेही प्रमाण नियम ठरलेले आहेत. "त्या दिवशी", "परवा" अश्या अचूक, नेमक्या नसलेल्या शब्दांचा वापर कमी होऊन भाषेला अधिकाधिक नेमकेपणा येतो आहे. शिवाय, ज्या भाषांचं लेखन अधिकाधिक प्रमाणबद्ध आहे त्या भाषा समजणं वेगवेगळ्या काळातही आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्येही सोपं जातं. उदा. 8-9 शतकांपूर्वीची ज्ञानेश्वरीतील मराठी आज पटकन कळत नाही. पण 14-15 शतकांपूर्वीचं संस्कृत आजही कळतं. कारण संस्कृत जास्त प्रमाणित आहे. शिवाय बंगाल, केरळ, काश्मीर, सिंध ह्या 4 टोकांना लिहिलं जाणारं संस्कृत एकसारखं असल्यामुळे एकमेकांना कळतं (लिखित तरी).

5. मराठी लेखन नियम संस्कृतवर आधारित आहेत. ह्या नियमांच्या रूपाने संस्कृत मराठीचा गळा दाबत आहे आणि देवनागरीऐवजी मोडी लिपीचा वापर पुन्हा एकदा सुरू केला तर मराठी संस्कृतच्या मगरमिठीतून मुक्त व प्रवाही होईल.

"हात पाय कष्ट करतात आणि पोट फक्त खातं. त्यामुळे पोट बाकी शरीराचं शोषण करतं. त्यामुळे पोटापासून बाकी शरीराची सुटका केली पाहिजे" असं म्हटल्याइतकं मूर्खपणाचं आहे ह.



© तन्मय केळकर

फेसबुक वरून कॉपी पेस्ट

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...