Friday, December 16, 2022

 🌹 *: मी देव पहिला :* 🌹

*"खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल.*

      एका भयाण रात्री *"मंदिराच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा एक मुलगा* अभ्यास करताना पाहिला.
*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता. 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. 
दिवसा कधी दिसत नसायचा. 
खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. 
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. 
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. 
         
*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. 
मी त्या मंदिराकडे आलो. 
तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मंदिराच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. 
मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात *हसला.* 
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 

सर माझ्या *घरात लाईट* नाही. 
माझी *आई आजारी* असते. 
दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.

बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ? 

सर तुम्ही *देव* आहात !

नाही रे! 

सर तुम्ही माझ्या साठी *देवच* आहात. 

ते जाऊदे तू *जेवलास* का? 
मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे. 

सर म्हणूनच मी *हसलो.* 
मला माहित होतं. 
तो ( देव ) कोणत्याही *रूपात* येइल पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. 
मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, तो काहींना काही मला *देतोच.* 
कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* तो मला देऊन जातो. 
आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. 
मला माहित होतं....तो काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.
तुम्ही *देव* आहात ना !

मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. 
रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *देवाला* कोसत होतो. त्याने आज मला *देवाची उपाधी* देऊन लाजवलं होतं.

 त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.
माझे डोळे *तरळले.*
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 
तो पाच मिनिटांनी परत आला. 
त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती. 
सर, 
माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.

क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *पाषाणाकडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटलं. 

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
*शाळा, कॉलेज, मंदिर बंद* झाले. 
देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला.
असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *देवळाकडे* डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
देवळाची पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. 
वाईट वाटलं मला.  
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले. 

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. 
असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. 
मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.
सर्व आपल्या घरी निघाले. 
निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. 
पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. 
मला बघून त्याने आवाज दिला, 
सर .... 

अरे तू *इथे* काय करतोस ? 
सर आता मी *इथेच राहतो.* 
आम्ही घर बदललं.
*भाडं* भरायला पैसे नव्हते. 
त्यातच लॉकडाऊन मध्ये *शिव* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.
 
मग मला घेऊन आई इथे आली. 
काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. 
त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. 
तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* 
ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.
 
सर मी *हार* नाही मानली. 
*आई* सांगायची........
ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार. 

बरं..... तुझी आई कुठे आहे ? 
सर ती *कोरोनाच्या* आजारात *गेली.* 
तीन दिवस ताप खोकला होता. 
नंतर दम अडकला. 
मी कुठे गेलो नाही.  
इथे *पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. 
*१४ दिवस* इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.
*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.
*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं. 
          
सर तरी मी *हरलेलो* नाही पण *दुःख* एव्हढच आहे की मी *पास* झालेलो पहायला *आई* ह्या जगात *नाही.* 
ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश* असेल हे माझं *यश* बघून.  
कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. 
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर *खरी अडचण* उभी राहिलीय. 
*ऑनलाईन* अभ्यास करायला माझ्या जवळ *मोबाईल* सुद्धा नाही. 

असो 
सर, 
तुम्ही का वाईट वाटून घेता ? 
तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? 
सर, 
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. 

त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. 
सर *तोंड गोड* करा. 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.
*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*

सर, 
मला माहीत होते, *देव* या जगात आहे आणि तो माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. 
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. 
आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......
न सांगता. 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण, 
मी त्या *मुलाच्या डोळ्यात देव* पाहिला. ....
 
*देव पाहिला....*

       🙏 *धन्यवाद !!* 🙏

हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर खरंच मन सुन्न होते डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही. 
 🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...