Saturday, December 10, 2022

गोवा मुक्ती आंदोलनाच्या अपरिचित इतिहासाबद्दल ...

 *नमस्कार, आज गोवा मुक्ती आंदोलनाच्या अपरिचित इतिहासाबद्दल थोडे जाणून घेऊ या...

काल १८ जून, त्यामूळेच आठवलं
गोव्याची राजधानी पणजीतील एका रस्त्याला  "१८ जून रस्ता" असं नाव देण्यात आलेलं आहे. राममनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलेलं होतं. डॉ. लोहियांनी याच दिवशी गोवा मुक्तीचं रणसिंग फुंकलं होतं. प्रत्यक्ष गोवा मुक्त झाला तो पंधरा वर्षांनी म्हणजेच १९ डिसेंबर १९६१ या दिवशी.दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील कॉंग्रेस सोडून बाकीच्या सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन चौदा वर्षे संघर्ष चालविलेला होता. त्याचे नायक अर्थातच डॉ. राममनोहर लोहिया होते. पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केलं होतं.१४९८ ला "वास्को द गामा" यानं अरबी समुद्रामार्गे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर १५१० साली विजापूरच्या आदिलशहाची सत्ता पोर्तुगीजांनी उलथून टाकली आणि १९६१ पर्यंत राज्य केले. डॉ. राममनोहर लोहिया हे त्यांचे मित्र ज्युलिओ मिनेझिस यांच्या निमंत्रणावरुन गोव्यात विश्रांतीसाठी गेले होते. त्यांनी गोवेकरांवर पोर्तुगीजांनी लादलेले निर्बंध प्रत्यक्ष पाहिले. नागरिकांचं होणारं शोषण पाहून ते अस्वस्थ झाले होते. खुद्द लोहियांवर सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास बंदी घालण्यात आली होती.पण लोहिया हा निखारा होता. थोडी हवा मिळाली की भडकलाच समजायचं. त्यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे १८ जून १९४६ ला जाहीर सभा घेतली त्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. त्यांचं भाषण ऐकायला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आपलाही हुंकार कोणीतरी ऐकतोय हा विश्वास गोवेकरांमध्ये लोहियांमुळं निर्माण झाला होता. देश स्वतंत्र झाला, त्यानंतर संस्थानंही विलीन झाली होती. तरीही गोव्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. उलट बंधनं करकचून आवळली गेली होती. त्याच्या मागचं कारण असं होतं की शेजारील भारतीय स्वातंत्र्याच्या उर्मीचा संसर्ग गोयंकरांना होऊ नये.भारत स्वतंत्र झाला होता, गोवा मात्र गुलामच राहीला होता. केंद्र सरकार लक्ष देत नव्हतं. मधु लिमये, शिरुभाऊ लिमये, नानासाहेब गोरे, बंडू गोरे, सुधा जोशी, पीटर अल्वारिस, सिंधुताई देशपांडे, कमल भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, मालिनी तुळपुळे, शांता राव, जयवंतराव टिळक, जगन्नाथराव जोशी, श्यामकांत मोरे अशा अनेकांनी गोव्यासाठी योगदान दिलं होतं. मात्र भारत सरकार उदासीनच होतं. दरम्यानच्या काळात अनेकांना हौतात्म्यं पत्करावं लागलं. गोवेकरांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. त्याचं पर्यवसान सशस्त्र लढ्यात झालं होतं. तरीही पोर्तुगीजांनी दाद दिली नव्हती. नेहरुंवर टीका सुरु झाली. केंद्र सरकारवर दबाव वाढला. अखेर केंद्र सरकारला गोव्यामध्ये भारतीय सेना पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला. सैन्य पाठविण्याआधी नेहरुंनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यासाठी प्रत्यक्ष गोव्यात तुरुंगवास भोगलेले खा. नानासाहेब गोरे आणि खा. बॅ. नाथ पै यांच्याशी चर्चा केली. पोर्तुगीज सैन्य बळाचा आणि कुवतीचा अंदाज घेतला गेला. त्या नंतरच भारतीय सेनेनं गोव्यावर आक्रमण केलं. पोर्तुगीज सरकारनं ब्रिटन,अमेरिकेची मदत मागितली होती. पण भारत सरकारची बाजू रास्त आहे असं सांगून त्यांनी सहकार्य नाकारलं आणि भारतीय सेनेनं गोवा मुक्त केला. पं. नेहरुंनी स्विकारलेल्या कचखाऊ धोरणामुळे गोवा मुक्ती चौदा वर्षे लांबणीवर पडली होती. गोवा मुक्तीसाठी डॉ. टी. बी. कुन्हा या राष्ट्रवादी चळवळीच्या नेत्याला आठ वर्षे गोव्याच्या तुरुंगात खितपत पडावं लागलं होतं. सुधीर फडके, मोहन रानडे यांच्यासारखे कलाकारही गोवा मुक्तीसाठी तुरुंगात गेले होते. पुण्यात गोवा विमोचन समिती स्थापन करण्यात आली होती.महादेवशास्त्री जोशी, वसंतराव तुळपुळे, मधु दंडवते, हिरवे गुरूजी, जयवंत टिळक, सेनापती बापट, एसेम जोशी, नानासाहेब गोरे, केशवराव जेधे, शिरुभाऊ लिमये असे अनेक दिग्गज त्यामध्ये सहभागी झाले होते. अखेर त्यांच्या श्रमाचं फळ गोवा मुक्त होऊन मिळालं. पोर्तुगीज आणि सालाझारच्या उर्मंट सत्तेचं जोखड गोव्याच्या मानेवरुन भिरकावून दिलं गेलं. पोर्तुगीज गव्हर्नर वासाल डिसिल्वा यानं करारावर स्वाक्षरी केली आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी रात्री दहा वाजता गोवा मुक्त झाला. पोर्तुगीजांच्य तब्बल साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त करण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं होतं. गोव्यासाठी रक्त ओकेपर्यंत मार खाणारे समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे, हे त्यानंतर गोव्यात प्रचारासाठी गेले होते. त्याचा राग तिथल्या मुख्यमंत्री शशीकला काकोडकर यांना आला होता.त्या नानासाहेबा गोरे यांना उद्देशून म्हणाल्या की "बाहेरचे लोक गोव्यात येऊन आम्हाला देशभक्ती शिकवतात" हा अपमान केवळ नानासाहेबांचा नव्हता तर समस्त गोवामुक्ती सैनिकांचा होता.

१८ जून रस्त्याबद्दल आमचे दिवंगत मित्र गोव्याचे माहिती अधिकारी सुर्यकांत जोग यांना विचारलं तर त्यांना तो रस्ता माहिती होता.पण इतिहास ठाऊक नव्हता. विशेष म्हणजे ते पी आय बी मध्ये, नोकरी करीत होते, तरीही अज्ञात होते. मात्र सुर्यकांत जोग यांना इतिहास सांगितल्यावर त्यांनीही माझ्यासोबत फेरफटका मारला होता. रस्त्यावरुन जाताना लोहियांच्या पावलांची धूळ आम्ही शोधत होतो. पण नव्या पिढीने कॉंक्रीटखाली लोहियांच्या पावलांबरोबरच त्यांचे विचारही दफन केले आहेत. दिवस मावळताना मी त्या रस्त्याच्या नावाच्या पाटीकडं तोंड फिरवून मनातल्या मनात सर्वच मुक्ती योध्यांना सॅल्युट केला. सर्व गोवा मुक्ती योध्यांना क्रांतिकारी सलाम. 

सौजन्य व आभार -मुकेश बामणे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...