उजेडाच्या वाटा दाखवणार्या स्रियांची गोष्ट...
( दै.सकाळ, 'अवतरण' पुरवणी, 'अंतरंग' सदर, लेख क्र.१, लेखिका:सोनाली लोहार)
परवा एका बारावीतल्या मुलाचा फोन आला. माझ्या वर्तमानपत्रातील एका लेखाविषयी अगदी भरभरून बोलला. संभाषण संपवता संपवता म्हणाला,"माझी आपल्याला एक विनंती आहे, आपण आम्हा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी प्रेरणादायी लिहा. आयुष्य कसं असावं याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा."
एका सोळा-सतरा वर्षाच्या मुलाच्या तोंडून ते जड शब्द ऐकताना एकीकडे मला पु.लं. चा 'गटने'ही आठवत होता आणि दुसरीकडे नकळत कौतुकही वाटत होतं. 'तरुण पिढी भरकटली आहे, उन्मत्त आहे' वगरै म्हणताना आपण विसरतो कि हि मनंही कुठेतरी आधार शोधत असतात.
या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी मला प्रभावशाली वाटणाऱ्या तीन स्त्रियांच्या प्रवासाविषयी आज थोडसं:
१)मा.द्रौपदी मुर्मू- सध्या चर्चेत असलेलं हे नाव, भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार. आदिवासी क्षेत्रातील एका छोट्या खेडेगावापासून सुरू झालेला द्रोपदी यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. वंचित घटकातील असूनही धडपडत शिक्षणाची कास पकडली, ओडीसा सरकारच्या वीज विभागात ज्युनिअर असिस्टंट म्हणून नोकरी व त्यानंतर शिक्षिकेची नोकरी करत असतानाच समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी अव्याहत समाजकार्य. पुढचा नगर पंचायतसमिती सदस्य ते आमदार, मंत्री,राज्यपाल व आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार हा प्रवास प्रेरणादायी आहे. ६४ वर्षीय द्रौपदी यांनी या प्रवासात स्वतःची दोन तरुण मुलं गमावण्याचं प्रचंड दुःखही अनुभवलं आहे.वैयक्तिक,सामाजिक,आर्थिक, राजकीय या सगळ्याच आघाड्यांवर एक खंबीर स्त्री किती समर्थपणे टक्कर देऊ शकते याचं एक उदाहरण म्हणजे द्रौपदी मुर्मू.
२)बिजयशांती टोंगब्राम: कमळाच्या देठापासून बनणाऱ्या कापडाविषयी तुम्ही ऐकलंय? २०१८ पर्यंत असं कापड फक्त म्यानमार या देशामध्येच बनायचं. मणिपूर राज्यातील एका छोट्याशा गावातील बिजयशांती या २७ वर्षीय तरुणीला वाटलं की आपणही हे करू शकतो. वनस्पतीशास्त्रात पदवी घेतलेल्या बिजयशांतीला इच्छा असूनही आर्थिक कारणाने पुढील शिक्षण घेणं शक्य नव्हतं. मात्र स्वतःचा व्यवसाय असावा आणि गावातल्या इतर महिलांनाही काही रोजगार उपलब्ध करून देता यावा हे तिचं स्वप्न होतं. मग धाडसाने आणि जिद्दीने २०१८ ला या कामाला सुरुवात केली. गावाशेजारच्या तळ्यात हजारोंनी कमळ फुलायची. फुलं उमलून गेल्यानंतर त्याची देठं तोडून होडीत घालून घरी आणायची. त्याच्या चिकाची सुखाई,चरख्यावर कताई होऊन मग हातमागावर हे कापड विणायचं.अतिशय मेहनतीच्या या कामात साधा एक स्कार्फ बनवायलाही एक महिना लागतो, म्हणूनच त्याची किंमतही जास्त असते.आज त्या गावातल्या ६० स्रियांना रोजगार मिळालाय आणि कित्येक तरूणींना प्रशिक्षण. जगाच्या नकाशात कमळापासून कापड बनवणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचेही नाव आले आहे,आणि यासाठी स्वतः पंतप्रधानांनी या तरुणीचं जाहीर कौतुक केलंय.
३)मालविका अय्यर: घराशेजारच्या बंद पडलेल्या दारूगोळा कारखान्यातला जमिनीवर पडलेला एक गोळा तेरा वर्षीय मालविकाने निरागसपणे उचलला..तो जिवंत हातबॉम्ब होता.मालविकाचे मनगटापासून दोन्ही हात कापले गेले.दोन्ही पायांना असंख्य फ्रॅक्चर्स आणि नर्व्ह डॅमेजही झालं. पुढील दोन वर्ष मालविका रुग्णालयात असह्य वेदनेत तळमळत पडली होती. गेलेले हात परत येणार नाहीत हे सत्य या लहान मुलीने स्वीकारलं आणि शारीरिक आणि मानसिक वेदनेला नवीन अर्थ देण्याचं आव्हानही. मदतनिसाच्या सहाय्याने दहावीची परीक्षा देऊन ९७% मार्कांनी पास झाली. आज ३३ वर्षीय विवाहित मालविका एमफिल,पीएचडी होल्डर आहे,आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्रेरक वक्ता , दिव्यांग अधिकार चळवळीची प्रतिनिधी आणि प्रेरणादायी फॅशन मॉडेलही आहे.माननीय पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'वूमन अचिव्हर' म्हणून खास आमंत्रित केली गेलेली ही तरूणी समस्त तरुणाईसाठी एक आदर्श आहे. आजही कमकुवत नसांमुळे प्रचंड वेदनांचा सामना करणारी मालविका आयुष्याप्रती मात्र तितकीच सकारात्मक आणि आशादायी आहे.
या तीन महिलांविषयी मी जेव्हा माझ्या २१ वर्षीय लेकाला सांगितलं तेव्हा तो थोडा भावनाविवश झाला.. म्हणाला ,"ममा ,मला हे ऐकण्याची गरज होती".
आशा करते की माझ्या सगळ्याच तरुण वाचक मित्रमंडळींनाही या महिलांच्या प्रवासातून एखादा तरी आशेचा किरण सापडेल आणि कदाचित स्वतःच्या पुढील प्रवासाची दिशाही.
-सोनाली लोहार
(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)
No comments:
Post a Comment