*नाम माझा मित्र...*
*उत्तम मित्र मिळणे हे फार मोठे भाग्य होय.*
*खरा मित्र तोच की,*
*जो सुखाच्या व दु:खाच्या दोन्ही प्रसंगी आपणाला साथ करतो.*
*नाहीतर सुखाच्या समयी जवळ असणारे मित्र,*
*दुःखाच्या प्रसंगी मात्र आपले तोंड लपवितात,*
*असाच सामान्य अनुभव असतो.*
*म्हणूनच इंग्रजीत एक उत्कृष्ट म्हण आहे की,*
*Friend in need is a friend indeed.*
*नामस्मरण करणाऱ्या साधकाला,*
*भगवन्नाम हा एक उत्कृष्ट मित्र आहे,*
*असा अनुभव येतो.*
*पृथ्वीच्या पाठीवर कोठेही,*
*अगदी निर्जन अशा प्रदेशात जरी असला तरी,*
*नामधारकाला एकलेपणा जाणवत नाही.*
*कारण...*
*नाम हा मित्र आपणाला सर्व काळी,*
*व सर्व स्थळी सतत साथ करीत असतो.*
*जेथे जातो तेथें तू माझा सांगाती ।*
*धरूनी हाती चालविसी।।*
*नामस्मरण करताना,*
*आपण एकटे आहोत असे जरासुद्धा वाटत नाही.*
*परीक्षित राजाला,*
*दंश करणारा भला मोठा तक्षक सर्प,*
*सूक्ष्म रूप धारण करून,*
*लहानशा बोरात बसून होता,*
*त्याप्रमाणे सर्वव्यापक परमात्मा,*
*अत्यंत सूक्ष्म स्वरूपात,*
*नामात वास करून राहतो.*
*चौदा भुवनें जया पोटीं।*
*तो राहे भक्ताचिये कंठी।।*
*नामाचा सहवास जसाजसा वाढू लागतो,*
*तसातसा नामात प्रभुचा वास आहे,*
*याची नामधारकाला अधिकाधिक प्रचीती येऊ लागते.*
*त्याचप्रमाणे नामस्मरण जसे जसे अधिक होऊ लागते,*
*तसे तसे नामाचे सान्निध्य गोड वाटू लागते.*
*नामाशी चाललेला हा एकांत,*
*मोडूच नये असे साधकाला तीव्रतेने वाटते.*
*लोकांचा सहवास टाळण्याकडे वृत्ती होऊन,*
*नामाचा सहवास वाढविण्याकडे प्रवृत्ती बळावू लागते.*
*जन्मभर नाम साथ देते इतकेच नव्हे,*
*तर मृत्यूच्या बांक्या समयी सुद्धा,*
*ते नामधारकाचा त्याग करीत नाही.*
*किंबहुना नामाचे खरे महत्त्व,*
*आणि माहात्म्य त्याच वेळेस अनुभवास येते.*
*याचसाठी केला होता अट्टाहास।*
*शेवटचा दिवस गोड व्हावा।।*
*ज्याचे सर्व आयुष्य गोड असते,*
*त्याचा शेवटचा दिवस सुद्धा गोडच होतो;*
*परंतु ज्याचे आयुष्य रडण्यात,*
*दुखण्यात,काळजीत किंवा चिंतेत गेले,*
*त्याचा शेवटचा दिवस गोड होणेच शक्य नाही.*
*अखंड नामस्मरण करणारा नामधारक,*
*हा सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन,*
*स्वरूपी स्थिर झालेला असतो.*
*आनंदस्वरूप अशा नामाच्या सहवासात,*
*तो आनंदाची दीपावली नित्य साजरी करीत असतो.*
*विठोबाचे राज्य आम्हां नित्य दीपवाळी।।*
*देहावर जरी मृत्यूची सावली पडली,*
*तरी सुद्धा हा शांत असतो.*
*याचे कारण नामरूपाने राम जवळ असतो,*
*व साधकाला मृत्यूचा जरासुद्धा,*
*उपसर्ग होणार नाही,*
*याची पूर्ण काळजी घेतो.*
*इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर सुद्धा,*
*नाम साधकाला सोडीत नाही.*
*एका जनार्दनी सर्व नाशिवंत।*
*एकची शाश्वत हरिनाम।।*



No comments:
Post a Comment