Thursday, December 22, 2022

 कोरोनाच्या साथीला लॉकडाऊन झाल्यापासून अडीच महिने झालेले. सगळेच घरात बसून कंटाळलेले. कधी एकदा हा बंदिवास संपतो असं झालेलं. काहींच्या मनातली भीती अजून तशीच.अशात...  

    अडीच महिने काटेकोरपणे सोवळं पाळल्यानंतरही काही तक्रार नसलेले किंवा आणखीही किती दिवस गैरसोय सोसायची तयारी असलेले माझे भाऊ आणि वाहिनी. आम्ही डॉक्टर मंडळी सुद्धा त्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात नव्हतो. कुणीही त्यांच्या घरी आलं नाही की हे कुठं गेले नाहीत. यांच्या घरी सगळी कामं हेच करतात.घरी मोलकरीण नाही की गडी नाही.
   नाही म्हणायला कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी, किराणा वाल्याकडून किराणा आणि मेडिकल वाल्याकडून कधी औषधं इतकीच त्यांची घराबाहेरची हालचाल. कर्वेनगर परिसर दृष्ट लागण्याइतका कोरोनाच्या लागणीतून वाचलेला. आसपास कोणी परदेशहून आलं नाही की कोणी आजारी नाही.
       असं असतांना एके दिवशी दादाला ताप आला कळत नकळत, फारशी दखल घ्यावी असंही नाही. दोन दिवसांनी माझ्या कानावर आलं. हो म्हणजे फोनवर समजलं. दोन महिने आम्ही भेटतच नव्हतो ना! बाकी तब्बेतीची काहीच तक्रार नाही. विचार केला आत्ता कोरोना हे नाव पण काढायला नको. शंकेनी पण घाबरून जातील. बघू आणखी दोन दिवस. 
पण ताप येतच राहिला. रविवारी पाच दिवसांनी ताप कमी झाला, वाटलं बरं झालं सुंठेवाचून खोकला गेला! पण नाही. एक दिवस सोडून ताप परत आला आणि बरोबर किंचित खोकलाही! आता ताप सहा सहा तासांनी आणि भरपूर येत असे. आणि बोलतांना ठसका लागल्यासारखा खोकला येत असे. नाही म्हटलं तरी आठवडाभराच्या तापामुळं अशक्तपणा आलेला.  
 गेले कित्येक वर्ष त्याची पाठ दुखतेय, आत्ताच्या आजारातही तो पाठ दुखते म्हणत होता. ते जुनंच दुखणं असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण आता तापाचा छडा लावायचा ठरवलं. 
   दोन दिवसापूर्वीच दोघांच्या रुटीन तपासण्या केल्या होत्या. कोणताही आजार नाही, डायबेटीस, हाय बी पी, हार्ट डिसीज, अस्थमा, किडनी चा आजार यातलं काही नाही. सगळ्या तपासण्या नॉर्मल आल्या. पण ताप आणि खोकला चालू राहिल्यानं एक्स रे आणि कोविड १९ ची चाचणी करायची ठरवली. दीनानाथला ओपीडी बेसिस वर तशी तपासणी करून मिळेल असं समजल्यामुळं तिथं न थांबता घरी आलो. दीनानाथ कडून चार वाजतारिपोर्ट आला; एक्स रे वर दोन्ही बाजूला न्यूमोनिया आणि कोरोना पॉझिटिव्ह! आणि धक्काच बसला! सगळ्यांशी फोनवरच चर्चा करून त्याला लगेचच ऍडमिट करायचं ठरलं.
  तो दिवस नेमका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, लोकांचे अभिनंदनाचे फोन येत होते आणि इकडे आमचं भलतंच चाललं होतं. दुसऱ्या दिवशी आदित्यचा वाढदिवस आणि वटपौर्णिमा, आणि आज ही अशी बातमी! कितीही इमोशनल व्हायचं नाही म्हटलं तरी मनात तर येतंच ना? 
   दीनानाथ हॉस्पिटलची जुनी आठ मजली संपूर्ण इमारत आता कोविडची स्पेशल म्हणून नेमली आहे. इथे कोविडची शंका असलेले, नव्यानं त्रास होणारे, आणि सिरीयस अतिदक्षता लागणारे असे सगळेच पेशंट असतात. नेहेमीची गजबज आता नाही. एक प्रकारचं दडपण येईल असं वातावरण आहे. इथली अशी शांतता ओळखीची नाही. सगळे लोक मास्क लावून लांबलांब राहतात. कुठेही जायचं तर परवानगी लागते. जागोजागी सिक्युरिटी. पार्किंग मिळणं आता सहज शक्य झालंय!   
  पण सगळंच धक्कादायक!, नवा जंतू, त्याच्या "खेळी" विषयी कुणालाच काही माहिती नाही. जगभर सगळा अंदाजाचा मामला. त्यामुळं फार चिंता. अनिश्चितता पुरेपूर भरून राहिलेली! 
    पण दीनानाथला गेला दोन महिन्यात दीड एकशे पेशंट ऍडमिट झाले आणि तिथे आता डॉक्टरांना ट्रीटमेंटची अटकळ आली आहे असं समजलं. जगातल्या ५० तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून एक ग्रुप केलाय. त्यात चर्चा करून आराखडे ठरतात. सगळ्या ट्रीटमेन्टचे नियम ठरले असून त्याप्रमाणे काम चालते असं समजलं. एका परीनं बरं ही वाटलं कारण आणखी कुठं यापेक्षा वेगळी ट्रीटमेंट होणार नसल्याचं कळलं. हवी तिथं जागा मिळाली, ओळखीचा फायदा झाला.
   तरी प्रत्यक्ष ऍडमिशनची प्रक्रिया व्हायलाच पाऊण एक तास लागला. मुद्दामच जनरल वॉर्ड मागितला. त्यामुळं तो पहिल्याच रात्री एकटा पडला नाही, माणसात राहिला. रात्री शेजारच्या पेशंटनी चक्क फोनवर गाणी लावली होती! त्याच्याजवळ सेल फोन देऊ शकलो. पाचव्या मजल्यावर नेट कनेक्शनही चांगलं होतं. त्याचा पुढे खूप उपयोग झाला. वेळोवेळी अमेरिकेतल्या मुलांशी आणि बायकोशी, आमच्याशी बोलू शकत होता.
     ऍडमिशन नंतर पेशंटजवळ कोणीही थांबू शकत नाही. व्हिजिटर चालत नाहीत. दिवसातून दोन वेळा १५ मिनिटाचा पास मिळतो तो पेशंटला काही द्यायचं असेल तर वापरायचा. त्याच्या वस्तू घरी नेता येत नाहीत. त्याला भेटताही येत नाही. वॉर्डच्या बाहेर पिशवी ठेवायची, आत सिस्टरला निरोप जातो ती बाहेर येऊन पिशवी आत नेऊन देते.
 आधीच घरी मदतीला कोणी नाही आणि तरुण पिढी हाताशी नाही, आमच्या इथल्या नातेवाईकांच्यात आम्हीच सगळ्यात तरुण (फक्त ६४-६५ वर्षांचे!आणि डॉक्टर),अशा वेळी हॉस्पिटलला चकरा मारणं शक्य नव्हतं. त्यामुळं हॉस्पिटलचंच जेवण खाण मागितलं. आणि ते खूप सोयीचं झालं. वेळेवर डबे,थर्मास पोचवण्यानी सर्वांचे हेलपाटे होतात ते वाचले. अटेंडंट आणि व्हिजिटर्स नसल्यामुळं स्वच्छता आणि शांतता ठेवणं सोपं झालं होतं. हॉस्पिटलचं जेवण चांगलं होतं. सील पॅक येत असे. कप्प्यांचं ताट त्यात भात, आमटी, पोळी भाजी, दही थोडं, कधी खीर, काकडी इ. असे. कधीकधी नियम जाचक वाटले तरी ते पाळल्यावर त्याचे फायदे समजतात.    
जनरल वॉर्डात सोबतीसाठी ऍडमिट केलं खरं, पण नाही म्हटलं तरी काळजी वाटतच होती, हाताला सलाईन लावलेलं तर मदतीला लागतंच - तर कुणीच नाही.पण म्हटलं टॉयलेटला जातांना पडलं लागलं तर कुणाला दिसेल तरी, काहीतरी मदत मिळेल. अशा विचारानं ठेवलेलं. टीव्ही वर बातमी होती, हॉस्पिटलमधून पेशंट हरवली, पोलिसांनी तपास केला तेंव्हा तिची डेड बॉडी टॉयलेटमधे सापडली! असं कुणाचंच होऊ नये!    
   पण ज्या गोष्टीसाठी ऍडमिट केलं ते मॉनिटरिंगचं नाही, कोणी ताप मोजला नाही की ऑक्सिजन. रात्रभर त्याला झोप नाहीच (ते समजू शकते). पहाटे मला सगळं कळवणारे मेसेज आले. तो खूपच अस्वस्थ होता. वाटलं कसं होणार पुढं?
   सकाळी सगळ्या ओळखीच्या लोकांना झाला प्रकार सांगून मदत मागितली. नंतर फरक पडला. हॉस्पिटलने डॉक्टरांना एकेक आठवड्याच्या ड्यूटीज लावल्या आहेत. त्यांच्यावर सिनियर डॉक्टरांची टीम असते. प्रोटोकॉल ठरवलेले आहेत त्यामुळे ट्रीटमेंट ठरलेली आहे. पेशंट जवळ कमीत कमी जातात. साहजिकच आहे, प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे. त्यांच्या घरच्यांना ही आपली माणसं सुरक्षित असावीशी वाटणं बरोबरच आहे. अनेक नर्सेस आणि आया नोकऱ्या सोडून जात आहेत. स्टाफ कमी आहे.
      हॉस्पिटल मॅनेजमेंट, मित्र मंडळी, मुलं माझ्या या निर्णयावर नाखूष होते, पण माझी काळजी मला महत्वाची आणि रास्त वाटली आणि एकूण वॉर्डाची परिस्थिती विडिओ वर पहिली तेंव्हा त्यात तक्रार करण्याजोगं काही नव्हतं. मोठा हवेशीर वॉर्ड, लांब लांब कॉट्स, ऑक्सिजन द्यायची वेळ अली तर तशी सोय, स्वच्छता चांगली, टॉयलेट्स पण स्वच्छ!समोरच नर्सेस ची कामाची जागा. दुसऱ्याच दिवशी तिथले ९ पेशंट एकदम घरी सोडले! ही खूप उमेद देणारी गोष्ट समोरच घडली. एरवी समजलीच नसती. 
   मला वाटतं हॉस्पिटलच्या कामाबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपण त्यांना कशी मदत करू शकतो हे पाहावं. सर्वच जण कामाच्या दडपणाखाली भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. हॉस्पिटलमध्ये राहायची वेळ आली म्हणजे आपली गैरसोय होणार गृहीत धरून आपण त्यात सोय कशी करून घ्यावी याचा विचार करावा, विचारावं आणि तशी ती करून घ्यावी हे चांगलं. 
आता थोडं या आजाराबद्दल.
   करोनाच्या आजारात आपल्याला संसर्ग झालाय हेच कळत नाही. कधी कधी सुरुवातीची लक्षणं लक्षातही येणार नाहीत इतकी सौम्य असतात. ३ ते १४ दिवसानंतर काहींना ताप येऊ लागतो. काहींना सौम्य तर काहींना तीव्र. पहिला आठवडा ताप येतो, मग ताप गेल्यावर त्याची गुंतागुंत त्याचे शरीरावर झालेले परिणाम दिसू लागतात. त्यात रक्त गोठू लागतं, ऑक्सिजन कमी पडू लागतो, त्यामुळं एक एक करून शरीराच्या संस्था निकामी होऊ लागतात. म्हणजे किडनी निकामी झाली तर लघवी कमी होते, किंवा बंद होते, डायलिसिस करावे लागते, लंग काम करेनाशी झाली तर व्हेंटिलेटर वर ठेवावे लागते. पण अशी वेळ आली तर खूप प्रयत्न करूनही उपयोग होत नाही, दहातला एखादाच जगतो! म्हणून अशी वेळ नच यावी. यासाठी ७ ते १० दिवसांत अधिक लक्ष ठेवावं लागतं. आणि काही औषधं वेळीच दिली तर पुढची गुंतागुंत टाळता येते.
        हे सगळं त्याला वेळेत सुरू करता आलं. मॉनिटरिंग महत्वाचं होतं ते त्याचं त्यालाच करायला सांगितलं. एक थर्मामीटर आणि एक पल्स ऑक्सिमीटर त्याला दिला आणि रेकॉर्ड करून ठेवायला सांगितलं. ते तो करत असे आणि मला व्हाट्स अँप वर कळवत असे. 
  करोनाच्या आजाराची आणखी एक विचित्र खोड म्हणजे रक्तातला ऑक्सिजन कमी होतोय हे रुग्णाला उशीरपर्यंत जाणवत नाही. जसा ऑक्सिजन कमी होतो तसं रक्तवाहिनीतलं रक्त गोठू लागतं, त्याच्या गुठळ्या बनतात. यातली एखादी गुठळी जर हृदयाला रक्त पुरवणाऱ्या वाहिनीत गेली तर तात्काळ मृत्यू ओढवतो. काही लक्षात यायच्या आत! अशी गुठळी मेंदूत गेली तर पॅरालिसिसचा ऍटॅक येतो. असे भयानक परिणाम आपण ऐकतो. आत्ता आत्ता बरा असलेला माणूस अचानक मरू शकतो, हे फारच धक्कादायक आहे, पटण्यासारखं नाहीये. पण शास्त्राला हे नवं नाहीये.
   हॉस्पिटल मध्ये भरती होण्याची प्रक्रियाच तासाभराची आहे. आधार कार्ड नंबर, किमान त्याची सॉफ्ट कॉपी किंवा झेरॉक्स, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड जवळ असायला हवं. (गरिबांसाठी रेशन गाईडसुद्धा). त्यामुळं त्रास व्हायला लागल्यावर धावाधाव करून उपयोग नाही. वाहन मिळून जागेवर पोचून उपचार मिळायला खूप उशीर होईल.आणि आपण हेच अनेकांच्या बाबतीत झालेलं ऐकतो. पेशंट जवळ कमीत कमी सामान द्यावं. एक स्मार्ट फोननी खूप सोय होते.   
   बरेचसे पेशंट काहीच न त्रास होता निसटून बरेच होतात. काहींना सौम्य त्रास होतो, आपल्याआपण बरे पण होऊन सुटतात. काहींना जाणवण्याइतका आजार होतो, त्यातल्या काहींना वेळेवर ट्रीटमेंट मिळाली तर रक्ताच्या गुठळ्या होणं टाळता येतं. किंवा न्यूमोनियासारख्या आजारात व्हेंटीलेटरवर पोचणं टाळता येतं. हे फार ट्रिकी आहे. 
   प्रत्यक्ष फारसा त्रास होत नसतांना रुग्णाला भरती करून हे सगळं टाळण्यासाठी ट्रीटमेंट देणं, ती वेळेवर मिळणं हे फार मोठा चान्स आहे. व्हेंटिलेटरवर पोचलेल्या रुग्णाची जगण्याची शक्यता कमी कमी होत जाते. शिवाय अतोनात खर्च करावा लागतो ते वेगळंच.
त्याचं आणि आपलं नशीब थोर म्हणून हे जुळून आलंय. त्याला रक्त गोठू नये यासाठी, न्यूमोनिया बरा होण्यासाठी, ऑक्सिजन कमी न होण्यासाठी औषधं वेळेवर सुरू करता आली. त्याचा उपयोगही झाला!   
    ऍडमिट झाल्या रात्री त्याला भरपूर ताप होता पण त्यानंतर ताप आला नाही. नंतरच्या रात्री गोळ्या दिल्यामुळं झोप चांगली लागली, थोडं थोडं खाल्लं, हॉस्पिटलचंच जेवण खाण घेतलं. त्याचे खाण्याचे नखरे नाहीत. मुळात अति संकोची स्वभाव आहे. नर्स लोकांचं काम बरोबर होतंय ना हे तो पाहायचा, न झाल्यास त्याच्यातला क्वालिटी कंट्रोल वाला इंजिनियर जागा व्हायचा, त्याचा त्याला त्रास व्हायचा पण त्यावर तो मधे पडून त्यांना काही सुचवत नसे. माझ्याकडे तक्रार करत असे (आणखी कुणाकडे करणार?). स्वतःच्या आरामासाठी काही मागण्या केल्या नाहीत. अतिशय मोल्डेबल फ्लेक्सिबल संत प्रवृत्तीचा सदाचरणी सोपा पेशंट.  
  जर आणखी चार दिवस असेच निघाले तर तो घरी जाऊ शकेल असा झाला. 
 पहिले ३ दिवस बरे गेले. पण नंतर त्याला उचकी लागू लागली. आजारात उचकी ही गोष्ट बरी नाही. पण एका बाजूला तो तितकासा आजारी नसतांना हे काय नवंच? काही औषधांमुळं असं होऊ शकतं, तर ऍसिडिटी मुळे पण, कधी न्यूमोनिया च्या केसमध्ये पण. तर कधी नुसत्या स्ट्रेसमुळं पण! आम्ही शोध घेत होतो आणि उपचारही करत होतो, पण उचकी काही थांबेचनात !
   एव्हाना ताप सुरु झाल्याला १४ दिवस झाले. खरं तर घरी पाठवायची वेळ झाली पण उचकी थांबल्याशिवाय कसं घरी आणावं असा प्रश्न पडला. आपल्याला पाच मिनिटं सुद्धा उचकी सहन होत नाही, मग अशा अशक्त झालेल्या पेशंटांनी ते कसं सोसायचं? 
   आम्हा डॉक्टरांना अशा सिरिअस पेशंटचा जीव धोक्याबाहेर आला असला की बाकीच्या गोष्टी फारश्या महत्वाच्या वाटत नाहीत. 'हत्ती गेला आणि शेपूट राहिलं' असं वाटतं. इतर पेशंटांची काळजी मनात असते म्हणून म्हणा, तेवढी कळ पेशंटांनी काढावी अशी अपेक्षा असते म्हणून म्हणा, पण जसा जीवाचा धोका कमी होतो तसं पेशंटांचं इतर गोष्टींच्याकडे लक्ष जाऊ लागतं. आणि पेशन्स संपल्यामुळं आणि सहनशक्ती संपल्यामुळं तो त्रास अति व्हायला लागतो. त्यात भरीला समजूत काढायला नातेवाईक असले की अशा तक्रारी जास्तच त्रासदायक होतात. दुर्लक्ष केलं तर कमी होतो असा अनुभव आहे. जीव वाचला याचं अप्रूप किंवा समाधान अशा तक्रारींनी नाहीसं होतं. 
    पण ही तक्रार इतकी किरकोळ नव्हती. पण त्यावर रामबाण उपाय मिळत नव्हता. कुणाकुणाचे सल्ले येत होते. कुणाची उचकी पंधरा दिवस त्रास देत होती, तर कुणाची चक्क महिनाभर! त्या लोकांनी सगळे उपचार करून झाले होते. अश्या बातम्यांनी बरं वाटण्याच्या आशा मावळत. काहीतरी करा आणि माझी उचकी थांबवा असं म्हणू लागला. 
    माझ्या मैत्रिणीनी एक होमिओपॅथीचं औषध आणून हातात ठेवलं आणि त्याचा गुण येतो का ते पहा म्हणाली. इतर अनेक औषधं चालूच होती. मात्र ते दिलं आणि लागू पडलं! एक मोठा प्रॉब्लेम सुटला! तेंव्हाच आता डिस्चार्ज मागावा न लागता तो मिळेल असं झालं. कारण डिस्चार्ज कोणाला कधी द्यायचा याबद्दल केंद्राच्या, स्टेटच्या, म्युनिसिपाल्टीच्या आणि हॉस्पिटलच्या नियमावलीचा मेळ बसवावा लागत होता. शेवटी तो मिळेल असं झालं. त्यामुळंही मूड बरा झाला. स्ट्रेस कमी झाला.
      दरम्यानच्या काळात मी सर्व नातेवाईक आणि हितचिंतकांना थोडक्यात दैनंदिन प्रगती मेसेजनी कळवत होते. कुणीही त्याला फोन करू नये असे सांगितलं होतं.आणि ते सर्वांनी पाळलं. सगळ्यांचंच कौतुक! या फोन माध्यमामुळं काम किती सोपं झालंय!  
   डिस्चार्ज मिळेल म्हणून पेशंटला सांगितलं की त्याची घाई सुरु होते. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि विशेष करून कोरोनाच्या पेशंटची ऍडमिशन आणि डिस्चार्ज सोपं काम नाही. बरेच सोपस्कार असतात. दुपारी सुरू केलेलं काम व्हायला सात तास लागले. अनेक टेबलावरून पेपर, म्हणजे ई पेपर फिरतो. डॉक्टरांच्या नोट्स, नर्सेसच्या नोट्स, समरी, रेकॉर्ड साठी समरी, औषधांच्या दुकानाची बाकी नाही अशी नोट, आणखी काही काही, बिलिंग करणारी व्यक्ती वेगळी. पेपर पाहून त्यावरून बिल ठरवणे, मग बँकेत किती भरलेत, इन्शुअरन्स असेल तर आणखी हिशोब... अजिबात झटपट होणं शक्य नाही, पण सामान्य माणसांना हे लक्षात येत नाही. चिडचिड करतात, दबाव आणतात. वातावरण गढुळते. डिस्चार्जचा आनंद घालवतात. हे समजून घेणं गरजेचं आहे. 
  आता घरी गेल्यावरही काही इमर्जन्सी होऊ शकते. रक्त गोठण्याची क्रिया पुढे महिनाभर असते, हळूहळू ठिकाणावर येते. त्यासाठी औषध इकोस्प्रिन चालू ठेवतात. अशक्तपणा प्रचंड असतो, तो जायलाही महिना लागतो. 
     मनावर झालेला परिणाम ऍडमिट असतांना जाणवत नाही. तिथे माणूस वेगळ्या मोडमध्ये असतो, त्याचं मनोधैर्य, उसनं अवसान तात्पुरतं का होईना चांगलं असतं (बऱ्या होणाऱ्या पेशंटचं) पण घरी आल्यावरही, आयसोलेशन मधेच आठवडाभर तरी राहावं लागतं. तसा अमुक तारखेपर्यंत आयसोलेशन असा हातावर शिक्का मारूनच घरी सोडतात. 
    रात्री एकटं वाटतं, वाईट स्वप्नं पडतात, जीव घाबरतो, भीतीनं थरकांप होतो, घाम येतो, कशात लक्ष लागत नाही. भीतीची रात्र संपता संपत नाही. यासाठी मानसोपचार घ्यावे लागतात. औषधंही घ्यावी लागतात. हा काळ काही महिन्यांचाही असू शकतो.
     आता तो घरी आलाय. मोठ्या घरात दोघंच लांब लांब राहतायत. बायको कोरोना नेगेटिव्ह आहे, ती कशी वाचलीय आणि ह्यालाच कसं असं झालंय याला थोडं लॉजिक आहे. पुरुषांमध्ये हा आजार जास्त दिसतोय, त्यांच्या हॉर्मोन्समुळे असं समजलंय.
     या सगळ्या प्रसंगात सुषमानी दाखवलेला समजूतदारपणा आणि धैर्य कौतुकास्पद आहे. 
    तो ऍडमिट झाल्यापासून कोविड हेल्पलाईनचे, पोलिसांचे, म्युन्सिपाल्टीचे फोन येताहेत. चौकशा करताहेत. घराचा पत्ता काढून फवारणी करताहेत. आजपर्यंत त्यांचा फॉलोअप चालू आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. डिजिटल क्रांतीचा प्रत्यय यातून येत आहे.  
   आता थोडं खर्चाबद्दल. पेशंटला जर आय सी यु मध्ये ऍडमिट करायची वेळ आली तर किती खर्च करावा लागेल ते आधी सांगता येत नाही. येणार पण नाही. जर त्या हॉस्पिटलमध्ये ती सोयअसेल तर त्याचा विचार तरी करता येईल. आयत्यावेळी शिफ्ट करता येईल का जागा मिळेल का, हे सांगता येत नाही. अशा वेळी कोणीच खर्चाची चौकशी करत नाही आणि कुणाकडे करायची हे माहित नसतं. साधारणपणे व्हेंटिलेटरवर पेशंट असेल तर दिवसाला २०-२५००० पर्यंत खर्च येतो, त्यात आत्ताची कोव्हिडची समस्या आणखी २५% वाढ मागत आहे. मोठ्या हॉस्पिटलमधले डॉक्टर त्यात पडत नाहीत, नर्सेस आया मामा, मावश्या पण त्यात नसतात, त्यामुळं गैरसमज होतात. कोरोनाच्या बाबतीत तर पेशंटजवळ कोणालाही थांबायची परवानगी नाही. त्यामुळे असे निर्णय घेणं आणखीच अवघड असणार आहे. 
  एक समजून घेण्यासारखं आहे ते म्हणजे, अशी वेळ आली आहे का आणि काय काय नादुरुस्त झालंय याची माहिती डॉक्टरांकडून समजून घ्यावी. पेशंट नक्की बरा होईल का हे पण ते सांगू शकणार नसतात.
   आय सी यु त पेशंट म्हणजे भूकंपात पडझड झालेलं किंवा आगीत जळलेलं घर असं समजावं. आय सी युत काय करतात?
महत्वाचे तीन घटक, जसे घराचे तसे शरीराचे. इलेक्ट्रिसिटी( मेंदूचं काम), ड्रेनेज(किडनीचं काम), अन्नपाणी, शक्ती (हृदयाचं,लंग्जचं आणि पोटाचं काम) या गोष्टी कसं घर "चालू" ठेवायसाठी लागतात; तशाच आपल्या शरीराला "जगण्यासाठी" लागतात. ढासळलेल्या शरीरातलं काय काय काम करतंय ते बघत जे काही कमी, निकामी ते ते कृत्रिम रित्या चालू ठेवायचं काम आय सी यु त चालतं, जोपर्यंत पेशंटचं शरीर आजाराच्या धक्क्यातून सावरून आपल्याआपण सगळी मूलभूत कामं करू लागत नाही तोपर्यंत. 
   आता हा काळ प्रत्येकाचा निरनिराळा असतो. 
   आजाराला आटोक्यात आणतांना शरीर ढासळू लागलं तर अशी मदत द्यावी लागते. जसजशी सुधारणा होईल तसतशी एक एक करून मदत काढून घेतली जाते आणि डॉक्टर म्हणतात, आता पेशंट ला आय सी यु बाहेर रूम मध्ये ठेवायला हरकत नाही. म्हणजे, पेशंट चांगला शुद्धीवर आला, औषधांशिवाय यंत्रांशिवाय त्याचं हृदय, लंग्ज काम करू लागले, लघवी होऊ लागली, पोटाचं काम सुधारून अन्नपाणी टिकू लागलं पचू लागलं की. 
   मुळात जर यापैकी कोणते अवयव अधू असतील तर ते निकामी होण्याची शक्यता जास्तच. म्हातारपण (सगळंच जुनं झालेलं! थोडं निमित्त पुरतं कधीपण बंद पडायला, अशा स्थितीत), त्यातही डायबेटीस, हाय बी पी, हार्ट डिसीज, अस्थमा, टीबी अशा आजारांची उपस्थिती असेल तर यांना अधिक धोका का ते आता समजलं असेल. 
    या सपोर्ट सिस्टीम साठी प्रचंड खर्च येतो. किती दिवस त्यावर गुणाकारानं खर्च होतो. इन्शुरन्स कंपन्या किती मदत करू शकतील शंका आहे. पैशाच्या पाठबळाशिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. पेशंटनी स्वतः किंवा सरकारनी किंवा इंश्युरन्स कंपनीनं खर्च केला नाही तर कसं चालेल? सध्या हॉस्पिटलांवर प्रचंड खर्चाचा ताण आहे. लोकांना बिलं भरतांना नाकी नऊ येतंय. डॉक्टर कसे लुटतायत अशा भडकावणाऱ्या बातम्या येतायत. आणि लोकांना खरी परिस्थितीच ठाऊक नाही.   
   हॉस्पिटलमध्ये असे बेड शक्यतो तरुणांसाठी वापरले जावेत असा अलिखित संकेत आहे. पण जगायला कोणाला नकोय? पैसे असले की श्रीमंत नव्वदीतल्या वृद्धांवर दीर्घकाळ ट्रीटमेंट केली जाते, परिणामी बेड कमी पडतात. तसेच नुसते बेड असून उपयोग नाही. आय सी युतली कामं सगळ्या डॉक्टरांना जमत नाहीत. व्हेंटिलेटर लावला म्हणजे दिवा किंवा पंखा लावण्याइतकं साधं काम नाहीये. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरच हवेत आणि ते मोजकेच आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे.
'ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं' असं म्हणतात. पण मी फक्त त्यासाठी नाही तर सर्व गोष्टींसाठी या अवघड काळात दीनानाथ हॉस्पिटलनी अगदी जनरल वॉर्डातल्या पेशंटसाठी जी व्यवस्था केलीय त्याचं मनापासून कौतुक करते. सर्व मंडळींनी वेळोवेळी जी मदत केली त्यांचे मनापासून आभार मानते.  
    थोडक्यात, कोरोना किंवा कोणताही आजार आत्ता झाला आणि आयसीयूत जायची वेळ आली तर हा काळ चांगला नाहीये. कोणावरही ती वेळ येऊ नये एवढं नक्की. जमेल तेवढं सर्वांनी स्वतःला जपा आणि हे दिवस लवकरच संपून जावोत अशी प्रार्थना करा.

 डॉ ज्योत्स्ना पडळकर 
  ९०४९२३१२७३

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...