*स्तोत्राची एकापेक्षा जास्त आवर्तने का करावीत?*
ठराविक काळात त्या ईश देवतेचे स्तोत्र विशिष्ट संख्येत म्हणायची पद्धत असते. उदा. गणपतीच्या १० दिवसांत द्वादशनाम गणपती स्तोत्र १२ वेळा म्हणतात किंवा लक्ष्मीपुजनाच्या दिवशी महालक्ष्म्यष्टकम् ११ वेळा म्हणतात. अशी साधना करण्याचे कारण,ह्या पवित्र दिवसांत संबंधित 'ईश'तत्व भरपुर प्रमाणात असते. स्तोत्र एकदा न म्हणता त्याची ९,११,१२,१६,२१,किंवा १०८ अशी आवर्तने केली तर हे तत्व आपल्याकडे खेचुन घेता येते,आकर्षित करुन घेता येते. त्याचा लाभ आपल्याला मनोवांच्छित कामना पुर्ण करण्यासाठी होतो. मग देवाला एकदा स्तोत्र म्हणुन कळणार नाही का? सारखं,सारखं का म्हणायचं? हे प्रश्न बहुतेकांच्या मनात येत असतील. यात जिज्ञासा कमी,कंटाळाच जास्त आहे. मी जेव्हा लोकांना साधना सांगताना अमुक स्तोत्र ईतक्या संख्येत म्हणा,असं सांगते,तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो,'एकदा म्हणु का? वेळ नाही हो तेवढा!' मान्य आहे,स्तोत्र ठराविक संख्येत म्हणण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. तसा वेळ काढता येत असेल तरच साधना करावी,अन्यथा करु नये.
स्तोत्र म्हणताना सुरुवातीला बहुतेक वेळा 'वैखरी' वाणीने म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणतात. स्तोत्राची जसजशी आवर्तने होत जातील,तसतसा जप हळुहळु पुढच्या वाणीकडे सरकु लागतो. 'वैखरी'तुन 'मध्यमा'कडे' तिकडुन 'परा'कडे आणि शेवटी 'पश्यन्ती' वाणीत झिरपतो. जितकी पुढची वाणी,तेवढे स्तोत्र सुक्ष्म होत जाते. हे एकदा स्तोत्र म्हणुन होत नाही,तर आवर्तनानेच शक्य होते. जेवढे स्तोत्र सुक्ष्म,तेवढ्या त्याच्या लहरी अंतर्मनात तयार होवु लागतात. अंतर्मनातल्या लहरी आपला ईच्छित संकल्प पुर्ण करत असतात. यामुळेच स्तोत्र एकदा म्हणुन चालत नाही,तर ते वारंवार सलगतेने म्हणणे आवश्यक ठरते. स्तोत्राची रचना ही भाषाशास्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.यातले स्वर/व्यंजनांचे उच्चार हे ओष्ठ्य,तालव्य अशा सगळ्या प्रकारचे असतात. ते जसे आहेत,तसेच त्यांचे उच्चार व्हायला हवेत. त्यासाठी
आपले उच्चार सुस्पष्ट आणि स्वच्छ हवेत.
आवर्तनाने ज्या लहरी निर्माण होतात,त्या खंडीत होवु नयेत म्हणुन साधनशुचिता पाळणे महत्त्वाचे आहे.
मद्यपान,धुम्रपान,मांसाहार न करणे.
परान्न ( हाॅटेलचे,दुस-यांच्या घरातले ) न खाणे.
जास्तीत जास्त सात्विक आहार घेणे.
एकाच ठिकाणी (घराच्या देवघरात) साधना करणे.
कमीत कमी बोलणे.
इतरांची निंदा न करणे,समोरच्याला लागट न बोलणे.
पैशाचे व्यवहार सचोटीने करणे.
अश्या काही गोष्टी सांभाळाव्या लागतील.
काही जणांना साधना करायची इच्छा तर असते,पण करण्यासाठी सवड मिळत नाही. अश्यावेळी ते मध्यममार्ग निवडतात. सगळी स्तोत्रे रोज सकाळी देवपुजा झाल्यावर एकदा म्हणतात. ते ठराविक दिवशी नाही,तर कायमच हा नेम पाळतात. असे केल्याने त्यांना स्तोत्रे तर पाठ होतातच शिवाय त्याच्या अगदी सुक्ष्म लहरी अंतर्मनात कायम निर्माण होत रहातात. मानसिक समाधानही लाभते.
दर संकष्टीला २१ वेळा अथर्वशीर्ष म्हणणारी मंडळी मला माहीत आहेत. दर बुधवारी ४ वेळा 'विष्णुसहस्रनाम' म्हणणारे आहेत. श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्षाची सामुहिक आवर्तने होतात. विचार करा,त्या स्थानी,वातावरणात किती लहरी निर्माण होत असतील!
तर मंडळी,यापुढे साधना करताना स्तोत्राची आवर्तने करण्यासाठी मी वेळ काढेनच,हा निश्चय तुम्ही केलाच असेल. आजच्या लेखाचे हेच उद्दिष्ट आहे!
- वैद्य.वर्षा लाड.
No comments:
Post a Comment