सुंदर कविता
वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ,
We are ,40+, 50+, 60+,
सो व्हॉट???



अब्दुल कलाम सांगून गेले,
'स्वप्न पहा मोठी'..
स्वप्ननगरीत जागा ठेवा
माधुरी दीक्षित साठी..!



सकाळी जॉगिंगला जाताना
पी टी उषा मनात ठेवा,
वय विसरून बॅडमिंटन खेळा,
'सिंधूलाही' वाटेल हेवा..!



मनोमनी 'सचिन' होऊन ,
ठोकावा एक षटकार ,
घ्यावी एखादी सुंदर तान,
काळजात रुतावी कट्यार..!



मन कधीही थकत नसते,
थकते ते केवळ शरीर असते,
मनात फुलवा बाग बगीचा,
मनाला वयाचे बंधन नसते...!



फेस उसळू द्या चैतन्याचा,
फुलपात्र भरू द्या काठोकाठ,
द्या बंधन झुगारून वयाचे,
वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ...!



*We are , 40+, 50+, 60+,*
*so what..?* 













==================================
नमस्कार,
पुणे आणि पुणेकर ह्यांना अनेक जण नावे ठेवताना आढळतात. ह्याचे कारणच मला अद्याप आढळले नाही..
पण तरी त्या नावे ठेवणाऱ्यांना एक उत्तर द्यावे असे मात्र आज ठरवले आहे.. ही कविता समस्त पुणेकरांनी अगदी अभिमानाने पुढे पाठवावी अशी इच्छा आहे.. आणि पुणेतरांचे तर स्वागत पहिल्या कडव्यातच केलेले आहे !!! 

*पुण्यवान पुणेकर !!!*पुण्यवान किती आम्ही खरोखर
नागरिक हो पुण्याचे
विद्येच्या माहेरी करितो
स्वागत साऱ्या साऱ्यांचे || १ ||
शुद्ध भाषा आम्ही बोलतो
चोखंदळ हो भलतेच
इथून पावती घेऊन मिरवती
तरी पुणे ह्यांना सलतेच... || २ ||
जन्मापासून आम्हीच पेशवे
रुबाब का आम्ही करू नये ?
पाट्या वाचून हसणा-यांनी
पाऊलच पुण्यात ठेऊ नये || ३ ||
मिसळ पुणेरी, अन चितळ्यांची
करू नका कुणी बरोबरी
आमच्या इकडे अन्नपूर्णा हो
पाणी भरते घरोघरी... || ४ ||
असे बिघडले, तसे बिघडले
कशास करता तक्रारी
जगभरातले लोक नांदती
ही पुण्यभूमीची जादूगरी || ५ ||
पुण्यवान हो आम्ही पुणेकर
गुण अजून मी काय गावे?
इथे जन्मण्यासाठी ऐका
शतशत जन्माचे पुण्य हवे || ६ ||
शेवटचे एकच सांगून ठेवते
ठेवलीत जर नावे पुण्याला
दुर्लक्ष करूनि हेच म्हणू आम्ही
द्राक्षे आंबट कोल्ह्याला !! || ७ ||
अश्विनी देशपांडे
२२/०९/२०२०
( पुणेकर )
*******************************************
लेकी कडून दुःख मला
कधीच नाही मिळालं
चिमणी कधी मोठी झाली
काहीच नाही कळालं........
पोरगी जाणार म्हणलं की
पोटात उठतो गोळा
अंथरुणावर पडतो पण
लागत नाही डोळा.. .......
खरंच माझी लेक आता
मला सोडून जाईल
अंगण , वसरी , गोठा सारं
सूनसून होईल......
दारी सजतो मांडव
पण उरात भरते धडकी
आता मला सोडून जाणार
माझी चिमणी लाड़की.........
सूर सनई चे पडता कानी
डोळा येते पाणी
आठवत राहातात छकुलीची
बोबडी बोबडी गाणी...........
भरलेल्या मांडवात बाबा
कहाणी सांगत असतात
कल्याण झालं म्हणत-म्हणत
सारखे डोळे पुसतात.........
पुन्हा पुन्हा लेकी कडे
बाबा पहातात चोरून
कितीही समजूत घातली तरी
डोळे येतात भरून...........
हुंदके म्हणजे काय असतात
पहिल्यांदाच कळतं
कौलारूच्या छपरावनी
बापाचं मन गळतं.......
सरी मागून सरी येऊन
डोळे वाहात राहतात
चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत
चिमण्या उडून जातात..
लेकीचा सांभाळ करा म्हणून
बाप हात जोडीत राहतो
डोळ्या मधे पाणी आणून
केविलवाणे पहात रहातो........
लेक लावतो वाटी पण
बाप जातो तुटून
हुंदका जरी दाबला तरी
काळीज जातं फुटून..........
पोटचा गोळा दिल्या नंतर
पापणी काही मिटत नाही
कितीही डोळे पुसले तरी
पाणी काही आटत नाही.......

आई बापाच्या पोटचा गोळा #
आई-बाबा #
वडील आणि मुलगी #बाप आणि मुलगी
आई-बाबा #
वडील आणि मुलगी #बाप आणि मुलगी
No comments:
Post a Comment