असंही होऊ शकतंच ना...?
सोड ना सखे... सोड ना...
पांढ-या झालेल्या बटेची चिंता
अणि, गळणा-या केसांच्या विचारांचा
तुझ्या, मनात झालेला गुंता...
कुणीतरी मरत असेल
याच तुझ्या पांढ-या बटेवर...!!!
असंही होऊ शकतंच ना...?
...
सोड ना सखे... सोड ना...
तू फिकीर करुच नकोस
तुझ्या वाढत्या वजनाची...
कुणीतरी असेल तुझ्या वजनापेक्षाही
तुझ्या निर्मळ मनाची
अगदी मनापासून दखल घेणारं...!!!
असंही होऊ शकतंच ना...?
...
सोड ना सखे... सोड ना...
नको ना करु तू चिंता
तुझ्या चेह-यावर नव्याने आलेल्या
काही सुरकुत्यांची...
कुणीतरी असेलच ना
त्या सुरकुत्यांच्या मागे दडलेल्या
तुझ्या सुंदर खळीत अडकलेलं....!!!
असंही होऊ शकतंच ना...?
...
सोड ना सखे... सोड ना...
आपला एक दात गळून पडलाय
हा वारंवार मनात येणारा विचार...
कुणीतरी असेलंच ना
दातांना फारसं महत्त्व न देता
तुझ्या निखळ हास्यात हरवून जाणारं...!!!
असंही होऊ शकतंच ना...?
...
सोड ना सखे... सोड ना...
तुझं ते डायट-बायट...
आवडत्या पदार्थांकडे तुझं
नुसतं रोखून बघणं
पण प्रत्यक्षात मात्र
आपलं मन मारुन जगणं
आणि, आनंदाला तिलांजली देऊन
आतल्या आत कुढणं...!!!
कुणीतरी असेलंच ना
तू डायट करत मलूल होण्यापेक्षा
तुझ्या चेह-यावरचा आनंद
मनात भरुन घेणारं...!!!
असंही होऊ शकतंच ना...?
...
म्हणूनच सखे, विचार कर
आनंदाने जगण्याचा
आणि, आयुष्याकडे पुन्हा पुन्हा
सकारात्मकपणानं बघण्याचा...!!!
कारण,
कुणीतरी नक्की असेलंच
तुझ्यातला हा बदल
समजून घेणारं
आणि तुझ्या ओंजळीत भरभरुन
सुखाचं दान देणारं...!!!
...
पटतंय ना....?
- महेश घाटपांडे
==============================================
*आमच्या आया। तुमच्या आया*
आश्चर्य वाटते मला माझ्या आईसारख्या 70 तल्या बायका इतक्या कशा छान जगल्या....
कर्तव्य संसाराच्या जंजाळात हि किती या संयमी वागल्या....
माझी आजी कष्ट करायची पण ती असायची घरी...
यांनी मात्र संसार सांभाळला आणि केली उच्चपदस्थ नोकरी..
बहुतेक सगळ्या जणी होत्या सुगरण, कुणाला काय आवडते कशा ठेवायच्या आठवण....
सर्वांना तृप्त करण्यातच रमल्या अन्नपूर्णा..
गोठ्यातील गाय दारातले कुत्रे सर्वांबद्दल यांना करुणा...
स्विगी झोमॅटो यांच्या हातात काहीच नव्हते..
अचानक येणारे दीर जावा मस्त जेवून जात होते...
माणसेच नाहीतर देव-देवता यायची पाहुणी...
गणपती भाऊ आणि गौराई यांच्या माहेरवाशिणी.....
गौरींच्या स्वागताची आठ आठ दिवस तयारी..
कितीही दमल्या तरी रांगोळी हवीच दारी...
लाडू करंज्या मिठाया आणि पाच पक्वान्ने...
हळदीकुंकवाला शालू नेसून स्वागत हसतमुखाने...
उपासतापास व्रतवैकल्ये करूनही नव्हत्या अंधश्रद्धाळू..
कठोर निर्णयही घ्यायच्या पण आतून कनवाळू...
यांची सारी धडपड घरासाठी मुलांसाठी...
थकलेल्या दिसल्याच नाही जरी उलटली साठी..
छोटे छोटे आनंद होते अपेक्षा नव्हत्याच फारशा..
स्त्री-स्वातंत्र्य स्पेस हवी माहितीच नव्हत्या दिशा..
पन्नाशी पर्यंत त्यांच्या एखादा वृद्ध असायचा घरात...
पण कोणी चौकशीला दिसला नाही वृद्धाश्रमाच्या दारात..
रिटायर झाल्यावरही यांचा मजेत जातो वेळ...
नातवंडांबरोबर कुठलाही खेळतात खेळ...
गरज असेल तर आकंठ बुडतील चटकन होतील अलिप्त...
परदेश किंवा पंढरपुर वारी दोन्हीकडे रमतात मस्त...
पार्ट्या करतात ट्रिपा काढतात तरी जगण्याला एक आहे शिस्त...
म्हणूनच आमच्या पेक्षा यांचे आयुष्य आहे निवांत आणि स्वस्थ ..
- सौ वंदना कुंभोजकर
No comments:
Post a Comment