1 मे "महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन". त्या निमित्ताने आपल्या मराठीचे आजचे स्टेटस पाहुया ....
संगणकीकरण व माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक संवाद माध्यमे इंग्रजीतूनच असल्यामुळे इंग्रजी हे अर्थार्जनाचे एक साधन झाले आहे. जागतिक स्तरावर ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचे महत्व अजुनही वाढत आहे. परिणामत: मराठीचा विकास अडखळला. खासगी शाळा कॉलेजात सध्या मराठी कशीबशी तग धरून आहे. मराठीचे स्थान राज्यातील व देशातील सर्व माध्यमात मजबूत करणे जरुरीचे आहे. अर्थातच त्यामुळे मराठीची इंग्रजीशी जोरदार स्पर्धा सुरु आहे.
अ) मराठी भाषा ही ९व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. या दोन राज्यात गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी व जगात 4थ्या क्रमांकाचे शहर आहे. मराठी बोलणाऱ्याच्या लोकसंख्येनुसार भारतातील प्रमुख भाषांत मराठी तिस-या क्रमांकावर आहे.
मराठी भाषा लिहायला ४८ मुळाक्षरे/वर्ण (Marathi Alphabets ) आहेत. त्यात तीन प्रकार आहेत :-
□ व्यंजने 34, □ -हस्व + दीर्घ स्वर 12 □ दीर्घादी 2
मराठीतील साहित्य व ग्रंथसंपदा मुख्यतः ज्ञानेश्वरी, दासबोध व तुकाराम महाराजांच्या गाथा/अभंगवाणी यांना जगप्रसिद्ध वाङमयाचे स्थान आहे. मान्यवर लेखक अत्रे, फडके, खांडेकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पुल देशपांडे, विन्दा करंदीकर, वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज आदींनी त्यात बहुमोल साहित्याची भर घातली आहे. संत ज्ञानेश्वरांनी "अमृतापेक्षाही गोड" असे मराठी भाषेचे कौतुक ही केले आहे.
तथापि मराठीला काही मर्यादा आहेत. इंग्रजी ही जागतिक भाषांत तिस-या क्रमांकावर आहे तर मराठी पंधराव्या क्रमांकावर. दर प्रांता नुसार मराठीचा हेल, लकब व शब्दांचे उच्चार बदलतात. यात मुख्यत: पुणेरी, कोल्हापुरी बंबईया, व-हाडी, खानदेशी, कोंकणी, मालवणी. आणि नागपुरकर तर बहुतांशी हिन्दी मिश्रित मराठीत बोलतात.
ब) इंग्रजी ही "ज्या राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही" असा भूतकाळ असलेल्या इंग्रजांची भाषा आहे. ती चौदाव्या शतकापासून प्रचलित आहे. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपीयर(एप्रिल 1564) यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 एप्रिल हा 'इंग्रजी भाषा दिन' म्हणुन सर्व जगात साजरा होतो. गेल्या पाचशे वर्षापासून शेक्सपीयर व त्यांच्या नाट्यसाहित्याची जगात वाहवा होत राहिली आहे.
केवळ 21 व्यंजने व 5 स्वर अशा 26 मुळाक्षरात बंदिस्त असलेली ही भाषा लिहायला खूप सोपी व टाइप करायला सुटसुटित आहे. जागतिक स्तरावर जास्त बोलल्या जाणा-या भाषांत चिनी प्रथम, स्पॅनिश द्वितीय तर तृतीय क्रमांकावर इंग्रजी आहे. अधिकृत दुसरी भाषा इंग्रजी असणा-या देशात प्रथम अमेरिका तर दुसरा भारत.
पण पण...
नोबेल पारितोषिक विजेता जॉर्ज बर्नार्ड शॉ याच्या मते : England and America are two countries separated by the same language' असा एक ठपका इंग्रजी भाषेवर पडला आहे. खेळीमेळीच्या वादात पुणेरी मराठी हीच शुद्ध मराठी असा मुद्दा असतो अगदी तसच इंग्लंडवासीयांचीच इंग्रजी शुद्ध असा मुद्दा अनेक पुस्तके व भाषणातुन अजुनही मांडला जातो.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ? ....
यासाठी संशोधन करायला 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. 2013 साली या समितीने आपला अहवाल केंद्राकडे सुपूर्त केला. आपली भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.
आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भारतीय भाषा..
तामिळ (2004)
संस्कृत (2005)
कन्नड (2008)
तेलुगु (2008)
मल्याळम (2013)
ओडिया (2014)
मराठी ही ज्ञानभाषा पण व्हायला हवी..
मराठी ग्रंथवाङमय हे अध्यात्मिक ज्ञाना बरोबर हजार-एक वर्षापासून भौतिक ज्ञानाची मौल्यवान खाण आहे. विशेषत: संत ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम महाराज, व समर्थ रामदास (दासबोध व मनाचे श्लोक) यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेल्या दृष्टांतात अध्यात्माला विज्ञानाचा पाया दिलेला आढळतो. मुख्यत:
1. पृथ्वी गोल आहे.
2. ग्रह तारे यांची अंतरे व गती (पंचांग व ज्योतिष).. खगोलशास्त्र
3. पदार्थ व अणू रचना.. फ़िजिक्स
4. ढग व पाऊस-वारे झाडे हे सृष्टीविज्ञान
5. अध्यात्मामधून मानसशास्त्र
समर्थ रामदास स्वामी म्हणतात ..
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे
“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
No comments:
Post a Comment