Friday, July 1, 2022

महिमा विचित्र पंढरीचा

संत नामदेव अभंग चिंतनिका


पंढरपूर हे भक्तीपीठ तसेच ते संतपीठही आहे. हे संतांचे माहेर आहे. तसेच ते सर्व तीर्थांचेही माहेर
आहे. ही विठुरायाची अनुपम्य नगरी, तसेच ती महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. पंढरपूर वारकऱ्यांचे परम श्रद्धेय तीर्थस्थान आहे. अशा या पावन पंढरीचे दर्शन होताच मनास अतीव आनंद होतो. इथल्या चंद्रभागेत स्नान करताच मनाला अतीव समाधान लाभते. श्रीरखुमादेवीवराच्या दर्शनाने मनाला अतीव हर्ष होतो. नाथ महाराज म्हणतात; "पाहुनिया पंढरपूर । मना आनंद अपार ।। १ ।। करितो चंद्रभागे स्नान । मना होय समाधान ॥ २ ॥ पाहता रखुमादेवीवर । मन होय हर्ष निर्भर ।। ३ ।। पहा गोपाळपूर वेणुनाद । एका जनार्दनी परमानंद ॥ ४ ॥ अशा या पवित्र पंढरीचा महिमा संत नामदेवराय आपल्या अभंगातून गातात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
"पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र । 
महिमा विचित्र त्रिभुवनीं ।। १ ॥
 पाहिलिया क्षणी नासती पातकें ।
 ऐसियासी तुके दुर्जे कोण ॥ २ ॥ 
तृण पक्षी सर्व जाले ऋषिदेव । 
पहाती वैभव पंढरीचें ॥ ३ ॥
 भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी ।
 वैकुंठीची परी सर्व येथे ॥ ४ ॥
 टाळ नृत्य घोष पताकांचे भार ।
 गर्जे भीमातीर सर्वकाळ ॥ ५ ॥
 पुंडलिका साठी ठाके केशीराज ।
 भेटीने सायुज्य त्यास देती ।। ६ ।।
 स्नाने उद्धरती दर्शनें प्रशस्ती । 
वाचे नाम कीर्तीविठोबाची ॥ ७॥ 
नामा म्हणे लाभ थोर हा जोडतो ।
 पंढरिसी येतो प्राणी त्यासी ॥८॥"
 (ना. गा. ३९८)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

संत तथा भक्तशिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरचा महिमा वर्णन करताना म्हणतात, पंढरपूर हे पवित्र,
शुद्ध, निर्मळ, निर्दोष असे क्षेत्र आहे. पवित्र स्थान आहे. त्याचा महिमा, मोठेपणा त्रिभुवनात मोठा विलक्षण
आहे. आश्चर्यकारक आहे. पंढरीचा महिमा विचित्र आहे, कारण पंढरी पाहिल्याबरोबर पातके नष्ट होतात.
अशा या क्षेत्राची तुलना दुसऱ्या कोणाशी होईल? सर्वश्रेष्ठ ऋषी, ऋषीदेव इथे तृण पक्षी होऊन पंढरीचे
वैभव, ऐश्वर्य पाहात आहेत. पंढरपूरची भूमी ही विष्णुचक्रावर उभी असल्याने इथे सर्वकाही वैकुंठा प्रमाणे ऐश्चर्य आहे. पंढरपूरचे भीमातीर सर्वकाळ टाळ, नृत्य घोषाने दुमदुमत आहे. इथे पताकांचे समूह आहेत. त्यामुळे ते शोभून दिसते आहे. भक्त पुंडलिका करिता उभा राहिलेला श्रीकेशीराज तो आपल्या भेटीने भेटणाऱ्या भक्तास सायुज्य नावाची मुक्ती देतो, मोक्ष देतो. चंद्रभागेत स्नान करणाऱ्यांचा उद्धार होतो. त्यांना मुक्ती मिळते.विठुरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. वाणीने या विठुरायाच्या नामसंकीर्तनाचा उच्चार होतो. संत नामदेवराय म्हणतात; जो कोणी या पंढरीस येतो, पंढरीची वारी करतो, त्याला मोठा लाभ होतो. संत नामदेवांनी या अभंगातून मोठा विचित्र, विलक्षण असा पंढरीचा महिमा गायिला आहे.पंढरीच्या दर्शनाचे फळ, चंद्र भागेच्या स्नानाचे फळ सांगून पंढरी वैकुंठ नगरी कशी आहे त्याचे कारणही सांगून संतपीठ तसेच ते मुक्तीपीठ सुद्धा आहे हे दाखवून दिले आहे. नाथ महाराज म्हणतात, "धन्य पंढरीचा संग । एका जनार्दनी अभंग ।।" अशा या पंढरीची वारी करावी व धन्य व्हावे, नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी । चालविती वारी पंढरीची ॥

पंढरपूर सम क्षेत्र नाही धुंडी चारीधाम । श्रीकृष्ण सम देव नाही पांडुरंग इह नाम ।।

पंढरीचा महिमा मोठा पवित्र । दर्शनमात्रे होती पातके नष्ट ।।
 
🙏 पुरूषोत्तम गं.निकते.
       मो..नं.९४२००८८३०९

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...