Friday, July 1, 2022

चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्तोत्र-

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा, माणसाला आयुष्यामधे कुठलीही गोष्ट करावयाची असेल तर सर्वप्रथम त्याचे चित्त म्हणजेच मन स्थिर असायला हवे तरच संसाराचा आणि परमार्थाचा देखील प्रवास सुलभ होईल, या गोष्टीवर खूप कटाक्ष होता.

आधुनिक मानसशास्त्र देखील, यशस्वी होण्यासाठी मन एकाग्र असण्याला महत्व देते.
आजकाल अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या नैराश्य, अनामिक भिती, चंचलता, कुठल्याही गोष्टीत मन न लागणे,व्यसनाधीनता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे.
प. प. स्वामी महाराजांनी चंचल चित्त स्थिर होण्यासाठी आम्हा भक्तांच्या हाती हे अलौकिक असे दत्त स्तोत्र दिले आहे.
दत्तगुरू हेच आपले तारणहार आहेत. त्यामुळे अचपल असणारे आपले चित्त एकाग्र करण्यासाठी प्रत्यक्ष दत्तगुरूंनाच या स्तोत्रातून साकडे घातले आहे.प.प.स्वामी महाराजांसारख्या उच्च कोटीच्या अधिकारी सत्पुरुषांनी हे दिव्य स्तोत्र आपल्याला दिलेले असल्याने, निःशंक मनाने, मनोभावे आपण याचे पठण करून संसारातील नानाविध आधिव्याधींमुळे भरकटून गेलेल्या आपल्या चंचल मनाला स्थिर करून जीवनातील आनंद प्राप्त करूयात.

भावार्थासह स्तोत्र-

अनसुयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते
सर्व देवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरी कुरू

अर्थ- हे भगवान दत्तात्रेया, आपण महासती अनसुया व सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या ही पार गेलेल्या अत्रि ऋषींचे पुत्र आहात. आपली बुद्धी अतिशय तिक्ष्ण आहे. आपण सर्व देवांचेही देव आहात. आपण माझ्यावर कृपा करावी व माझे चंचल चित्त स्थिर करावे.

शरणागतदीनार्ततारकाखिलकारक
सर्व चालक देवत्वं मम चित्तं स्थिरीकुरू

अर्थ - हे भगवान दत्तात्रेया, आपण आपल्या आश्रयाला आलेल्या, संसारातील नानाविध तापांनी त्रस्त झालेल्या, आपल्याला आर्ततेने विनवणी करणारया साधक भक्तांचे सदासर्वदा रक्षण करता. आपण या चराचरांतील सर्व गोष्टींचे चालक आहात. आपण माझ्यावर कृपा करावी आणि माझे चित्त स्थिर करावे.

सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज
सर्व संकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरू

अर्थ -हे भगवान दत्तात्रेया आपल्या कृपाशिर्वादाने सर्वत्र मांगल्य येते. आपला कृपाशिर्वाद हेच सर्व व्याधीवरचे औषध आहे.आपण सदैव आपल्या भक्तांवर येणाऱ्या संकटांचा नाश करित असता. आपण माझ्यावर कृपा करावी आणि माझे चित्त स्थिर करावे.

स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः
भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू

अर्थ - हे भगवान दत्तात्रेया, भक्ताने आठवण काढताच धाव घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी जाणारे म्हणून आपला लौकिक आहे. आपण भक्तांच्या योग्य त्या सर्व इच्छा पूर्ण करता. त्यांच्या मध्ये जडणारया काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या भयंकर षड्रिपूंचा आणि व्यवहारिक शत्रूंचा देखील नाश करता. आपण आपल्या भक्तांना योग्य अशा सर्व ऐहिक सुखांचे व मोक्षप्राप्तीचे ज्ञान देणारे आहात. असे सामर्थ्यवान तसेच उदार अंतःकरण असणाऱया दत्तप्रभू, आपण माझे चंचल चित्त स्थिर करावे.

सर्वपापक्षयकरस्तापदैन्य निवारणः
योsभीष्टदा प्रभुः स त्वं ममचित्तंस्थिकीकुरू

अर्थ - हे भगवान दत्तात्रेया, आपण भक्तांच्या सर्व पापांचा नाश करणारे आहात. आपण त्यांचे त्रिविध ताप व सर्व प्रकारच्या दारिद्र्याचे निवारण करता. त्यांना हव्या असलेल्या योग्य गोष्टींचे दान देणारे समर्थ दाता आहात. आपण कृपावंत होऊन माझे चंचल चित्त स्थिर करावे.

य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधी
स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति

अर्थ- जो कुणी बुध्दि मान भक्त या पाच श्लोकांचे पुन्हा पुन्हा पठण करेल त्याचे चित्त स्थिर होईल व त्याचेवर भगवान दत्तात्रेयांची पूर्ण कृपा होईल.

इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती विरचितं दत्तात्रेयं स्तोत्रं संपूर्णम्

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...