सामर्थ्याची उपासना 
आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना! श्रीभगवतीचे शारदीय नवरात्र सुरू होत आहे. यानिमित्ताने घरोघरी नवरात्राचे घट बसतील आणि रोज सकाळ सायंकाळ भक्तिमय वातावरणात श्रीभगवती आदिशक्तीची आरती गायली जाईल. यात मुख्यत्वे सर्वांच्या घरोघरी आवर्जून गायली जाते ती नवरात्रनिवासिनीची आरती! फक्त नवरात्रातच; पण घरातील सर्वांना कंठस्थ असणारी आणि गायला, ऐकायला आवडणारी आरती म्हणजेच 'आश्विन शुद्ध पक्षी अंबा' ही नवरात्रातील देवीची आरती. पण तुम्हाला ही आरती कोणाची रचना आहे ते माहिती आहे का? ही रचना आहे सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराजांची!
श्रीरामराय, श्रीमारुतीराय यांसह समर्थ देवीचेही निस्सीम उपासक होते. करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिरात त्यांची अनेकदा कीर्तनेही झाली आहेत. याच ठिकाणी कीर्तनाप्रसंगी श्रीसमर्थांना आपला सर्वात लाडका शिष्य पहिल्यांदा भेटला. तो शिष्य म्हणजेच अंबाजी, जो पुढे योगीराज कल्याणस्वामी या नावे प्रसिद्धी पावला. चाफळची राममूर्ती जेव्हा श्रीसमर्थांनी कृष्णेच्या अंगापूरच्या डोहातून बाहेर काढली, त्याच वेळी त्यांना श्रीमहिषासुरमर्दिनी देवीची ही मूर्ती सापडली. तिची स्थापना समर्थांनी सज्जनगडावर केली. तीच गडावरची श्रीअंगाईदेवी! त्याचसोबत समर्थांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी देखील श्रीरामवरदायिनी देवीची स्थापना केली आहे.
समर्थांनी श्रीरामराय, श्री महारुद्र मारुतीराया यांवर जशा अनेक स्तवनांची, काव्यपदांची रचना केली तशीच श्रीआदिशक्ति देवीवर हि केली. तुळजापूरनिवासिनी श्रीतुळजाभवानी देवी समर्थांची कुळदेवता. मारुतीवर रचलेल्या अकरा भीमरूपी स्तोत्रांप्रमाणेच समर्थांनी तुळजाभवानी देवीचे हि अनेक स्तोत्र रचले आहेत. ती सुप्रसिद्ध आहेत. तुळजापुरात प्रत्यक्ष देवीचे दर्शन झाल्यावर त्यांनी रचलेली 'सुरवरवरदायिनी मुरहरसुखसदना' ही देवीचे वर्णन करणारी खूपच रसाळ आणि त्याच बरोबर त्यांच्या काव्यप्रतिभेने नटलेली आरती रचली. अनेक देवीभक्तांकडे व विशेषतः समर्थ सांप्रदायिकांकडे ही आरती आजही नित्य गायली जाते.
या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment