Friday, July 1, 2022

पंढरीची युग संख्या

  युग म्हणजे दीर्घकाळ, युग म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली.युगाच्या प्रारंभीच्या संध्याकाळाला व अंतिम काळाला अंश (भाग, खंड) म्हणतात. या दोन्हींसह चार युगांचे चक्र पूर्ण होण्यास देवांक १२००० वर्षे लागतात. देवांच्या वर्षाप्रमाणे कृत (सत्य) ४८०० वर्षे, त्रेता ३६०० वर्षे, द्वापर २४०० वा

   कली १२०० वर्षे लागतात. यामध्ये १०० वर्षांच्या संख्येत असणारा जो संधीकाळ त्यालाच युग म्हणतात.
मनुष्याचे १ वर्ष देवतांचा १ दिवस म्हणून व देवतांचे १ वर्ष मनुष्याच्या ३६० वर्षांबरोबर आहे. याप्रमाणे
मानवीय कालगणनेनुसार कलीयुगात ४३२०००वर्षे याच्या दुप्पट द्वापर, तिप्पट त्रेता व चौपट कृत युग अशी
चार युगे व त्यांची संख्या आहे. नामदेवराय पंढरीची युग संख्या व ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे वर्णन करतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
"कृत त्रेता द्वापर कली । ऐसा चौयुगांचा मेळीं । ते महायुग शब्द आढळी । वेदांतशास्त्री ॥ १ ॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर । तैसीच रात्र एक सहस्र । तीसा दिवसांचा प्रखर । एक मास ।। २ ।। ऐसे बारा मास । त्याचे एक वरुष । शतभरी आयुष्य । ब्रह्मयाचें ॥३॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनांत शत वरुषे गणीत | ज्या प्रळयीं पोहत । मार्कडेय उदकीं ॥ ४ ॥ ऐसी अठ्ठावीस युगे जाण । पंढरपुरासी जालीं पूर्ण । जो की ब्रह्मयाचा दिन । प्रळय काळ ॥ ५॥ नामा म्हणे पंढरीची संख्या । सांगितली संत महंत लोकां । लसूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥"
(ना. गा. - ४१५)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संत तथा भक्तशिरोमणी नामदेवराय पंढरीची युग संख्या सांगताना म्हणतात; कृत, त्रेता, द्वापर व कली अशी ही चार युगे असून यालाच वेद शास्त्रात 'महायुग' असा शब्द आहे. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे सहस्र महायुगे व तेवढीच रात्र होय. अशा तीस दिवसांचा प्रकाशमान असा एक महिना होय. असे बारा महिने म्हणजे त्याचे एक वर्ष. अशी शंभर वर्षे ब्रह्मदेवाचे आयुष्य होय. अशा या ब्रह्मदेवाच्या दिवसाचे सहस्र युगांचे गणित केले असता त्याचा प्रलयकाळ होतो. त्या प्रलयाच्या उदकात मार्कंडेय महामुनी पोहतात. ब्रह्मदेवाच्या दिवसापासून ते प्रलयकाळापर्यंत अठ्ठावीस युगे पंढरपूरला पूर्ण झाली आहेत.
 संत नामदेवराय म्हणतात, मी श्रीपांडुरंगाच्या पादुकांना पाहून, साक्ष ठेवून पंढरीची युग संख्या संत महंतांना
सांगितली. हा अभंग भागवतातील मन्वन्तरादी कालगणना तसेच ब्रह्मदेवाचा दिवस त्याचे स्वरूप स्पष्ट करणारा आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारणीभूत असणाऱ्या श्रीमहाविष्णूच्या नाभिकमला पासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे. चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनु होतात. एका मनुत एक्काहत्तर महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे ४३ लक्ष २० हजार आहेत. सध्या सातवे वैवस्वत मन्वन्तर आहे. त्यातील २७ महायुगे जाऊन २८ वे महायुग सुरू आहे. “युगे अठ्ठवीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।" :युगे अठ्ठावीस कटीवर हात ठेवून विटेवर उभे असणाऱ्या श्रीपांडुरंगाचे दर्शन घेऊन आपण कृतार्थ होऊ या.
पंढरीची युग संख्या आहे जरी । सखा पांडुरंग उभा विटेवरी ।।
🙏 पुरूषोत्तम गं.निकते.
       मो..नं.९४२००८८३०९
🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿
आपल्या आवडत्या . . . 
समुहावर पाठवा ही पोस्ट
ईशसेवा घडेल सुपरफास्ट

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...