Many will start fast, few will finish strong!..
------------------------------ ------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – श्रद्धांजली!
------------------------------ ------------------------
आमच्या जिल्ह्यातल्या एका सैनिकाला दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आले.
काल भारतमातेच्या या थोर सुपुत्राला निरोप देण्यासाठी, त्यांच्या बलिदानाला सॅल्युट करण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गेलो होतो.
त्या शहिदाला वंदन करण्यासाठी हजारो लोक जमले होते,
जिकडे तिकडे शेकडो तिरंगी झेंडे आणि आभाळ भेदुन टाकेल अशा ‘भारतमाता की जय’!..च्या गर्जना!...
मनाच्या एका कोपऱ्यात गर्व, आणि दुसऱ्या कोपऱ्यात आक्रोश!..
तो जवान, आपल्या देशाचे रक्षण करताना गेला, तो आपल्यासाठीच गेला, ही प्रत्येकाच्या मनातली भावना!..
देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातला भारतीय सैनिक जातो, कोट्यावधी लोकांना चटका लावुन जातो, अगदी घरातलं कोणीतरी गेल्याची आपली भावना असते,
रोज किड्यामूंगीसारखी हजारो माणसं मरतात, पण एवढं प्रेम नशिबानेच, क्वचितच, कोणाच्या वाट्याला येतं!
का?
कारण ज्यांच्या जगण्याला अर्थ असतो, त्यांच्याच मरण्याला अर्थ असतो!
काही दिवसांखाली अटलबिहारी वाजपेयी आपल्याला सोडुन गेले, सगळा देश रडला.
लाखो करोडो लोक हेलावुन गेले.
जेव्हा ‘कलाम’ गेले, तेव्हाही सगळा देश शोकाकुल झाला होता.
असंच बाळासाहेब ठाकरे गेले, तेव्हा बघायला भेटलं होतं!
काही माणसं आयुष्य एवढं सॉलीड जगतात, की त्यांचं जगणं एक उत्सव असतं, ते इतकं उत्तुंग जीवन जगतात की आपल्या नकळत आपण त्यांच्या प्रेमात पडतो,
आणि शेवटी कायमचं जाता जाताही ते साधंसुधं निघुन जात नाहीत, मनाला चटका लागतो, डोळे पाणावतात, जीवाला हुरहुर लागते.
अशा वेळी प्रश्ण पडतो,
लाखो करोडो लोकं रोजचं गांडुळासारखी जगतात आणि किड्यामुंग्यासारखी रोज ढिगाने बेभाव मरतात. मग असे असामान्य लोक कोणत्या रसायनांनी घडतात?
अटलबिहारी जेव्हा तरुण होते तेव्हाच त्यांनी आपल्या आयूष्याची दिशा ठरवुन टाकली होती, मग आपोआपच त्यांच्या अंगी बळ आलं, त्यांनी सभा गाजवल्या, माणसं जोडली, जिंकली, कविता आणि भाषणातुन जबरदस्त व्यक्त झाले.
अशातच मी त्याचं चरित्र वाचलं, त्यात एक आगळावेगळा प्रसंग लिहला आहे,
१९८० मध्ये मुंबईत अटलबिहारींनी भाजप स्थापन केला,
पण ८४ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्या, त्यांच्या उजव्या समाजवादी विचारांना लोकांनी नाकरले होते, ते स्वतःही निवडणुक हरले.
पक्षाला जिवंत ठेवायचं असेल, वाढवायचं असेल तर काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे, लोकांचं लक्ष वेधुन घेतलं पाहिजे, अशी रणनिती ठरवली गेली.
राममंदिराचा मुद्दा तापु लागला होता.
आणि मग अडवाणींनी रथयात्रा काढुन, लोकांमध्ये उघडपणे हिंदुत्व जागवायलास सुरु केलं.
अटलबिहारी त्यापासुन लांब होते, पण भाजप मजबुत झाला. बाबरी मस्जीद पाडल्यानंतर १९९३ पासुन ९६ पर्यंत अटलबिहारींना स्वतःच्याच भाजप पक्षात साईडलाईन केलं गेलं होतं.
जास्त कोणी भेटायला यायचे नाही, कोणी विचारायचे नाही, जवळचे लोक सांगतात, की त्या काळात ते निराश झाले होते, फारशे सक्रियही नव्हते.
पण अचानक एक अनपेक्षित घटना घडली, ज्याने पुढचा इतिहास घडला, ९६च्या निवडणुका लागल्या, मुंबईत सभा होती, अडवांणीनी स्टेजवर अनपेक्षित घोषणा केली,
देशाचे पुढचे पंतप्रधान अटलबिहारी होतील! “अबकी बारी, अटलबिहारी!” लोकांनी सभा घोषणा देऊन दणाणुन टाकली.
स्वतः अटलबिहारींना हा धक्का होता.
मित्रांनो, हा चमत्कार कसा घडला?
‘अटलबिहारी’ यांनी आयुष्यभर केलेली तपःश्चर्या एवढी मोठी होती की पक्षाला, सत्तेसाठी इतर नेत्यांना, त्यांची, त्यांच्या नावाची आणि ब्रॅंडची गरज पडली.
अटलबिहारी भारताचे एकदा, दोनदा नव्हे, तीनदा पंतप्रधान झाले.
कारण, शेवट मनात ठेवुन त्यांनी आयुष्याची सुरुवात केली होती. भारत देशाचं नेतृत्व करीन असं त्यांनी रोज कितीदा स्वतःला बजावलं असेल.
लोकांनी त्यांना नेता मानन्याआधीच त्यांनी आपण नेता आहोत, हे स्वतःच ठरवुन टाकलं होतं!
तेच बाळासाहेब ठाकरे यांचं!
प्रथम त्यांनी स्वतःला सांगितलं की मी ह्या मुंबईचा, महाराष्ट्राचा अनाभिषिक्त सम्राट आहे,
आणि आयुष्यभर त्या थाटात जगले, की ते गेले तेव्हा लाखो लोकांना वाटलं, आपला सेनापती गेला.
जे ह्या मोठ्या माणसांना जमलं ते आपल्याला जमेल का?
आपण स्वतःचं आयुष्य कसं जगायचंय,
याचं उत्तर “आपण मेल्यानंतर, लोकांनी आपल्याला कोणत्या शब्दांत श्रद्धांजली द्यावी?” असं आपल्याला वाटतं?” ह्या प्रश्णात लपलं आहे.
आपल्या मृत्युचा उल्लेख केला की आपण अस्वस्थ होतो, अभद्र, अमंगळ वाटतं, पण खरं सांगतो, मृत्यु आहे म्हणुन तर जगण्याला खरी चव आहे.
आयुष्य ‘थोडकं’ आहे, हे जो विसरत नाही, तोच आपलं आयुष्य ‘नेटकं’ जगतो.
“शेवट मनात ठेवुन सुरुवात करा”, हेही यशाचं बहुमुल्य सुत्र स्टीफन कॉवे ने परिणामकारक सात सवयीमध्ये सर्वात महत्वाचं आहे, असं सांगितलयं!
स्टीव्ह जॉब्जनेही त्याच्या यशाचं रहस्य सांगितलं की तो रोज स्वतःला सांगतो की आज माझा शेवटचा दिवस असेल तर! आणि मग त्याची कामे पेंडीग राहायची नाहीत.
एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांनाच हे जग सोडून जायचं आहे, हे तर पक्कं आहे!
मग उरलेल्या प्रत्येक दिवसाची दिशा निश्चित आजच निश्चित करु की!
आणि मित्रांनो,
विचार करायच तर तो छोटासा कशाला? भव्यदिव्य करायचा. ज्यापण क्षेत्रात राहु, टॉपलाच पोहचायचे, जगावर छाप सोडुन जायचे.
तुम्हाला असं भव्यदिव्य आयुष्य जगायला आवडेल का?
मग आपल्या अंतिम संस्काराच्या वेळी लोक कोणत्या शब्दांत आपल्याला श्रद्धांजली देतील, हे आपण प्रत्येकाने लिहुन काढायला पाहीजे. महीन्यातुन एखाद्या वेळी त्याचे वाचन करायला पाहीजे,
म्हणजे आपोआपच आयुष्याला एक आकार येत जातो.
कारण आपण स्वतःशी जो संवाद करतो तोच प्रत्यक्षात येतो.
स्वतःच स्वताःला श्रद्धांजली द्यायला शिकल्याचे चार फायदे सांगतो,
- हे जीवन नश्वर आहे, याची जाणीव होवुन प्रत्येक क्षण किती बहुमुल्य आहे, याची जाणीव होते.
- आपण मेल्यावर सोबत फक्त चांगले कर्म येणार आहेत, हे मनावर पक्कं ठसतं, राग लोभ, गिले शिकवे, चोऱ्या, कपटीपणा सगळे दोष गळुन पडतात.
- आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींची किंमत कळते आणि सुखाचे क्षण आठवुन सुंदर आयुष्य दिल्याबद्द्ल कृतज्ञतेने उर भरुन येतो.
- स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा वेग दुप्पट होतो, आळशीपणा आणि चालढकलपणा गळुन पडतो.
आज आत्ता हा लेख वाचल्याबरोबर तुम्ही काय करणार आहात?
- गेल्या सात दिवसात घडलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीबद्द्ल मनापासुन कृतज्ञता व्यक्त करा!
- आपण ज्या दिवशी हे जग सोडून जाऊ तेव्हा कोणत्या शब्दात हे जग आपल्याला श्रद्धांजली अर्पण करेल, हे ताबडतोब लिहुन काढा!
आपल्या सर्वांचे आयुष्य, आपला एकेक दिवस आणि एकेक क्षण, सार्थकी लागो, या एकाच प्रार्थनेसह,
आभार आणि मनःपुर्वक शुभेच्छा!..
(२०१८ मध्ये लिहलेला एक लेख)
No comments:
Post a Comment