श्री गुरुदेव दत्त
" जे आपण दुस-यांना देतो, तेचं आपल्याला परतं मिळतं. मग ते प्रेम...आदर असो किंवा दुःख ". खरं पहाता, हा एक सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. जे आपण देतं असतो, तेचं आपल्याला परतं मिळतं असतं, तसं पाहिलं तर हा सृष्टीचा नियम आपल्याला कळून येतं नाही, समजतंही नाही.
आपल्या मनात येणारे विचार, त्या विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन, जशी दृष्टी तशीच आपल्याकडून कृती घडतं असते, घडून येतं असते. आपण जसं पेरुं, तसंच उगवतं असते, आपली चांगली कृती आपणाला आनंद-समाधान देते तर वाईट कृती आपल्यावर अपमानास्पद वेळ आणते, भय देते-दुःख देते. चांगल्या विचारांची माणसं नेहमी दुस-यांसाठी जगतं असतात, त्यांच्या चेह-यावर नेहमी एक आनंदाचं-समाधानाचं तेज दिसून येतं, कारण ते स्वतःसाठी जगतांना प्रथम दुस-यांचा विचार करतात, म्हणूनच सृष्टी त्यांना सर्वकाही कळतं नकळतं देतं असते. मात्र आपण स्वतःसाठी जगलो, दुस-यांचा विचार केला नाही तर आपणाला आनंद-समाधान न मिळता दुःखचं भोगावं लागतं, दुस-यांसाठी जगणारी नी दुस-यांसाठी न जगणारी माणसे समाजात पाहिली की, सृष्टीच्या नियमांचा अर्थ आपल्याला समजून येतो. काही श्रीमंत माणसे स्वतःसाठी जगतात, त्यांच्या आयुष्यातलं दुःख पाहिलं तर आपल्या वाटतं की, ही श्रीमंती काही कामाची नाही, त्यापेक्षा गरीबी बरी, गरिबी दुस-यांकडे पहाण्यास शिकविते. जो माणूस दुस-यांसाठी जगतो, तो कसं जगतो याचं एक उदाहरण कालच पहावयास मिळालं, ते असं - एक गरिब मुलगा, घर नसलेला, रस्त्याचा आसरा घेवून आई-वडिलांसमवेत लहान मुलांसाठी असलेले फुगे विकणा-या कुटुंबातील या मुलाने वडापाव घेतला आणि वडा स्वतः खाल्ला नी पाव भुकेल्या कुत्र्याला खायला दिला. निश्चितच कुत्र्याचे आशीर्वाद लाभले ते आशीर्वाद त्या मुलाच्या चेह-यावर समाधानाच्या हास्याने दिसतं होते, त्या मुलाच्या चेह-यावरचं हास्य, समाधान हे महत्वाचं आहे, याचा विचार करावयास, वर्तमानात कष्ट करुन जगतांना दुस-यासाठीही जगता यावयास हवं.
आपल्या श्रीसद्गुरुंच कार्य पहाता, ते सतत दुस-यांचा विचार करतांना दिसतात. स्वतःसाठी - त्यांच्या कुटुंबियांसाठी जगतांना कधीही दिसतं नाहीत, सतत दुस-यांच्या हितासाठीचं कार्य सुरु असतं. अशा श्रीसद्गुरुंचे आपण शिष्य आहोत, त्यांच्यासोबत राहून आपण त्यांची शिकवणं अंगिकारुन स्वतःसाठी जगतांना प्रथम दुस-यांचा, त्यांच्या हिताचा विचार करावयास हवा, आपला हा विचार श्रीसद्गुरुंना निश्चितच आवडेल, या कार्यासाठी त्यांचा कृपाशीर्वादही लाभेल.
दुस-यांसाठी जगलात तरच त्या जगण्याला अर्थ आहे. म्हणूनच निस्वार्थी मनानं गरजूंना मदत करावी, सृष्टी तिच्या नियमानुसार परतं देईल, तेही आपल्यासाठी काही प्रमाणात ठेवून दुस-यांसाठी असलेला त्यांचा हिस्सा त्यांना द्यावा, आपल्या उत्पन्नात दुस-यांचा हिस्सा असतो याची जाणीव ठेवावी. हे सारं आपण मनापासून करायचं आहेच, हे करतांना आपल्या मुखी नाम हे हवंच, चला तर मग, श्रीसद्गुरुंच्या स्मरणात-जाणीवेत नाम घेवू या.
No comments:
Post a Comment