Sunday, June 26, 2022

मी दासबोधच का वाचायचा?

एका मित्राने परवा हा प्रश्न विचारला, की मी दासबोधच का वाचायचा?

त्याला हा प्रश्न पडणे अनपेक्षित होते तेंव्हा अधिक खोदून विचारल्यावर कळले की त्याला हा प्रश्न एका आजोबासदृश काकांनी विचारलेला होता, मग शंका दूर झाली, कारण ते अपेक्षितच होतं...असो

असं आहे, की दासबोध हा असा एकमेव भारतीय अध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, अशी पठडीतली (टिपिकल) न होता, एका स्वभावसुलभ प्रश्नाने होते (obvious question). 
कोणताही ग्रंथ हाती घेताना आपल्या मनात सर्वप्रथम काय येते हो? किंवा काय यावे? तर या ग्रंथाचे नाव काय? यात काय विषय मांडलेले आहेत? याचे सार काय? मी हा ग्रंथ का वाचावा?

वाचकांची हीच मनोवृत्ती ध्यानात घेऊन समर्थ दासबोधाची सुरुवात, दासबोध लिहून घेणा-या कल्याणस्वामींच्या अर्थात प्रातिनिधिक श्रोत्यांच्या एका प्रश्नाने करतात. 

श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें
जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१||
हा कोणता ग्रंथ आहे? याचे नाव काय? यात प्रामुख्याने काय सांगितले आहे? हे ऐकुन मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात! की बाबारे,
ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |
येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||२||

या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे! हा ग्रंथ गुरु-शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे, आणि यात मुख्यत्वेकरून भक्तीमार्गाचे विस्तृत विवेचन मी केलेले आहे!
काय दूरदृष्टी आहे पहा लेखकाची! पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे! ग्रंथाची सुरुवातच इतकी Logical व विवेकपूर्ण आहे , याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या २ ओव्यांतच पटते! आणि तो पुढे मोठ्या उत्कंठेने वाचू लागतो!
नवविधा भक्ती म्हणजे काय? खरे ज्ञान म्हणजे काय? वैराग्य कसे असते? अध्यात्म म्हणजे काय या सर्वाचा उहापोह मी इथुन पुढे केलेला आहे असे सांगत श्रीसमर्थ पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादीच सादर करतात! (Reference books/appendix), व या ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचे असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारुन ठेवतात!
दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याल स्पर्श करणारे अक्षरश: शेकडो विषय येऊन जातात!
पण तो वाचण्याचा सर्वात महत्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला, जन्मापासून पडणा-या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात!
१) मी कोण आहे? 
२) मी इथे जन्माला का व कसा आलो?
३) माझ्या जन्माचा हेतु काय?
४) देव म्हणजे काय?
५) देव कसा आहे व काय करतो?
६) मूर्तीपूजा खरी आहे का? देव खरच दर्शन देतो का?
७) आत्मा म्हणजे काय? 
८) मृत्यूनंतर जीवाचे काय होते?
९) ही सृष्टी निर्माण कशी झाली?
१०) मुक्ती म्हणजे काय?
ही यादी न संपणारी आहे! फ़ार दूर कशाला जायचे, दासबोधाची नुसती अनुक्रमणिका जरी पाहिली ना तरी त्यात आलेल्या सर्व विषयांची ब-यापैकी कल्पना येते!
राजकारण, समाजकराण, अर्थकारण,राष्ट्रकारण, अध्यात्म,लोकस्वभाव,सृष्टीरचना,साहित्य, संगीत, व्यक्तीमत्व विकास, व्यवस्थापन, प्रयत्नवाद, ध्येयनिष्ठा, ज्ञानवाद, धर्म, विवेकवाद, चातुर्यलक्षणे, धूर्तपणा, दिनचर्या, साधनेची मूलभूत तत्त्वे, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र, वनस्पती विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल अहो इतकेच काय अगदी तत्कालिन लोक देत असलेल्या शिव्यांचीही नोंद या ग्रंथात समर्थांनी करून ठेवलेली आहे! 

दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.
मूळ ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेतच असल्याने, मराठी बोली भाषा येणा-या कुणालाही तो सहज समजेल असा आहे. विषेशत: समर्थकालीन अन्य पत्रव्यवहार व ग्रंथरचना पहाता समर्थांनी मुद्दाम काळाच्या पुढे जाणा-या सोप्या भाषेत ग्रंथ लिहून आपला द्रष्टेपणाच अधोरेखीत केलेला आहे.असो. 

एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना,साधकांना,निस्पृहांना,विरक्तांना,सर्व-सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोधातील एक एक समास म्हणजे जणु काही एकेका मनुष्य जन्माच्या अनुभवांची शिदोरी ठरावी,इतका ओतप्रोत कल्याण संदेश त्यात भरलेला आहे.
दासबोधाची रचना समर्थांनी मोठ्या कल्पकतेने केलेली आहे. यातील २०० समास म्हणजे जणु काही २०० वेगवेगळे प्रबंधच असून दासबोध हा त्यांचा संग्रहमात्र आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना, क्रमाने न जाता मध्येच कोणतेही पान उघडले तरी नक्की काहीतरी वेगळा विषय अभ्यासावयास मिळतो. त्यामुळे एकाच बैठकीत संपूर्ण ग्रंथ वाचलाच पाहीजे असे बंधनच उरत नाही. (अर्थात अभ्यासकांसाठी सक्रम वाचन हे कधीही अधीक श्रेयस्करच!)

या ग्रंथाचे पारायण देखील करतात.हा ग्रंथ वाचणारास "रोकडी प्रचिती" येणारच असा समर्थांचा खणखणीत विश्वास व आशीर्वाद आहे.

अनायासे आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला आहे...तोही या भारतवर्षात...तोही महाराष्ट्र देशात...
मराठी भाषेचे ज्ञान काही विशेष कष्ट न घेता आपणास झालेले आहे...मग मागे का रहा?
हा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या उभ्या हयातीत निदान एकदा तरी संपूर्ण वाचावाच!दासबोध एकदा वाचलेला

मनुष्य मिळतच नाही...कारण तो एकदा वाचला की पुन्हा पुन्हा वाचत रहावा असा मोह कुणालाही
होतो...

समर्थांच्याच शब्दात सांगायचे तर...

भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।
समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥

वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।
मननकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥

वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।
विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥

ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।
येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...