🚩 भक्ती हा संस्कृत हा शब्द मूळ धातू किंवा क्रियापद 'भज्' वरून आला आहे.
ज्याचा अर्थ आहे,
"विभागणे, वाटणे, सहभागी होणे, भाग घेणे, भाग असणे".
"आत्मीयता, भक्तीभाव, आवड, आदर, विश्वास किंवा प्रेम, पूजा, आध्यात्मिकतेप्रती असलेली पावित्र्याची भावना, धार्मिक मूल्ये किंवा मुक्तीचे मार्ग" असेही या शब्दाचे अर्थ होतात.
🚩 परमेश्वराचे स्वरूप प्रेमाने समजून घेऊन, मन तद्नूरूप करणे यालाच भक्ती असे म्हणतात. पण हे अलोट प्रेम, निष्काम, निरहेतुक, आणि कायमचे असायला हवे, कारण काही तरी म्हणून भक्ती केली की, ती व्यापारी स्वरूपाची, राजस भक्ती होते आणि त्यामुळे पूर्ण चित्तशुद्धी होत नसते.
🚩 श्वेताश्वतर उपनिषदामध्ये भक्तीची व्याख्या सहभाग, समर्पण आणि कोणत्याही प्रयत्नामध्ये असलेली आत्मीयता अशी केली गेली आहे. मोक्ष मिळविण्यासाठी सांगितल्या गेलेल्या तीन आध्यात्मिक मार्गांपैकी एक म्हणून भक्ती योगाची भगवद्गीतेमध्ये सखोल चर्चा केली गेली आहे.
🚩 एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदुःखे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते, असा अर्थ करता येतो.
🚩 भक्ती ही भागवताप्रमाणे नऊ प्रकारची असून, नारद भक्तीसूत्रात तिचे अकरा फरक सांगितले आहेत. भक्ती कोणत्याही प्रकारची असली तरी भगवंतावर निरातिशय, निरहेतुक प्रेम करणे हा त्याचा पाया आहे.
🚩 भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन-पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे.
🚩 कामना मनात ठेवून भक्ती करताना मनुष्य ईश्वराचा वापर फक्त इच्छा पुरी व्हावी याकरिता करतो. म्हणजे, सकाम भक्तीमध्ये ईश्वर साध्य नसून केवळ साधन असतो. त्यामुळे, या प्रकारे ईश्वराची प्राप्ती झाली नाही तर त्यात नवल ते काय?
🚩 मात्र, जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे, त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच, बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा.
🚩 देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात -
‘देव भावाचा भुकेला
दास सेवकाचा झाला ।
पहा महिमा आवडीची
फळे खाय भिल्लिणीची ।।
पोहे सुदामदेवाचे
फके मारी कोरडेची ।
न म्हणे उच्छिष्ट अथवा
थोडें तुका म्हणे भक्तिपुढे ।।’
🚩 थोडक्यात सांगायचं म्हणजे...
🙏 भक्ति हा निष्ठेचाच प्रकार आहे.
🙏 पतिनिष्ठा, राजनिष्ठा, स्वामीनिष्ठा, ही मूल्ये जाणणारेच भक्ति करू जाणतात !
🙏 भक्ति म्हणजे बावळटपणा नव्हे.
🙏 जे लोक भक्ति म्हणजे भित्रेपणा म्हणतील त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !
🙏 ज्यांना निष्ठा माहित नाही त्यांना भक्ति ही प्रयत्नांनी आत्मसात करावी लागते.
🙏 अभ्यासाने प्रयत्नांनी सर्व काही साधते.
🙏 निष्ठेची धार असणाऱ्यांमध्ये भक्ति सहजच खेळते पण तेथे विवेक जागृत हवा, नित्यानित्य, शुद्धाशुध्दतेची जाण हवी.
🙏 भक्ति हा हट्ट आहे पण तो प्रेमाचा हट्ट आहे.
🙏 भक्ति हा लोचटपणा नक्कीच आहे पण तेथे स्वार्थ कदापीही नाही.
🙏 भक्ति हा स्वार्थ आहेच पण अप्पलपोटेपणा म्हणता येणार नाही.
🙏 भक्ति ही निष्ठा आहे पण दगा नाही.
🙏 भक्ति म्हणजे अगदी निस्सीम, निःस्वार्थ परिपूर्ण प्रेम !
आपला दिवस...
आपल्या आराध्याची...
भक्ति करण्यात जाओ...!!
No comments:
Post a Comment