*लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)*
*रक्तपांढरीग्रस्त मूल माती खाते, भूक मंदावते. चेहरा फिका, डोळे (पापणीची आतील बाजू) फिके-पांढरे, नखांवर पांढरेपणा आढळतो. सिकलपेशी व थॅलॅसीमिया या विकारांत पाणथरी (पांथरी) व यकृत हे अवयव मोठे आणि निबर लागतात. रक्तपांढरीमुळे मूल वारंवार आजारी पडते.*
*प्रतिबंधक उपाय.*
*मुलाला चार महिन्यांनंतर वरचे अन्न (पूरक) सुरू करावे. गरोदरपणात आईने फेरस (लोहक्षार) गोळया खाणे गरजेचे असते. आहारात हिरव्या भाज्या, जमेल ते फळ, शक्य असल्यास प्राणिज पदार्थ (उदा. अंडी, मासे, मटण) शक्य तेवढे असावेत. जेवणात लिंबू असावा. जेवणानंतरच चहा घेऊ नये.*
*जंत होऊ नयेत म्हणून सर्वांनी स्वच्छ संडासाचा वापर करावा. जेथे संडासाची सोय नाही तेथे ती करून घेण्याचा प्रयत्न करावा. संडास व पाण्याची सोय ही प्राथमिक सुविधा सर्वत्र व्हायला पाहिजे.*
*जंताची अंडी मातीतून नखांत आणि मग तोंडावाटे पचनसंस्थेत असा प्रवास करतात. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी नखे बारीक कापावीत. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे महत्त्वाचे असते.*
*आकडेकृमी पायाच्या त्त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. ज्या भागात आकडेकृमीचा प्रादुर्भाव आहे (उदा. बागायती शेतीच्या भागात) तेथे बाहेर जाताना मुलांच्या पायात चप्पल किंवा बूट असावेत.*
*उपचार.*
*आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मांसाहारी पदार्थ वाढवणे. लोहक्षारांचे पातळ औषध, छोटया गोळया मिळतात. एक वर्षाच्या आत फेरसचे पातळ औषध, एक चमचा, रोज एकदा असे तीन महिने द्यावे. एक वर्षापुढे रोज एक गोळी तीन महिने द्यावी.*
*स्वच्छता, पुरेसा योग्य आहार, रोगप्रतिबंधक लसटोचणी, नियमित तपासणी व आजारांमध्ये त्त्वरित योग्य उपचार हे मुलांना निरोगी ठेवण्याचे मुख्य उपाय आहेत.*
No comments:
Post a Comment