जन्माच्या वेळी नाळ पुरण्यासाठी, उपनयनाचे वेळी मंडपदेवता मांडताना, विवाहाचे वेळी मंडपदेवता, गौरीहराची पूजा करताना व निधनाचे वेळी अग्नी नेताना मृत्तिकापात्र वापरले जाते. अर्थात निरनिराळ्या प्रसंगी त्यास मडके, वरूण, संक्रांत, मृत्तिकापात्र, गाडगे अशा विविध संज्ञा आहेत.
जन्म, विवाह, मरण या घटना भावनिक दृष्टिकोनातून आनंदशोकादि विकार निर्माण करणाऱ्या असल्यामुळे त्यांची भिन्नता असली तरी, शास्त्रदृष्ट्या त्या घटना म्हणजे अवस्थांतरे होत. ही अवस्थांतरे एकाच केंद्रीभूत वस्तूच्या बाबतीत घडतात, आणि ती केंद्रीय वस्तू म्हणजे मानवी देह होय.
ज्याप्रमाणे अनंत आकाश एखाद्या घटात सामावले म्हणजे त्याला घटाकाश म्हणतात (घट ही उपाधी होय) त्याप्रमाणे अनंत ब्रम्ह मायेच्या उपाधीमुळे मानवी देहात सामावते. मानवी देहाचे महत्त्व घटाइतकेच आहे. आत्म्याचा निवास संपताच मानवी देहाच्या या घटाची अगदी अल्पकाळातच विल्हेवाट लावतात. येथे मानवी देहाला प्राप्त होणारे महत्त्व केवळ आत्मप्रवेशामुळे असते. या गोष्टीची तीव्र जाणीव रहावी, या उदात्तीकरण हेतूने जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक वेळी या ना त्या नीमित्ताने मृत्तिकापात्र (मडके) समोर ठेवले जाते.
हल्ली वरूणाची पूजा तांब्याच्या कलशावर करतात. पण खरे पहाता रंगीत घटावर वरूण पूजणे हे केव्हाही संयुक्तिक आहे. जर मानवी देहाची नश्वरता सातत्याने नजरेसमोर राहिली नाही, तर त्या देहाचे अनाठायी लाड करून देहपूजा करण्यातच अख्खा जन्म संपून जातो. ज्यासाठी देहप्राप्ती झाली, ती विविध ऋणे फेडून ईश्वराची कास धरण्याचा मुख्य उद्देश सतत डोळ्यासमोर रहावा, देहाची नश्वरता व आत्म्याची अमरता चित्तावर ठसावी, या उद्देशाने शास्त्राने प्रत्येक संस्कारात येनकेनप्रकारेण मृत्तिकापात्राचा समावेश केला आहे.
संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.
No comments:
Post a Comment