'दसरा' किंवा 'विजयादशमीचं महत्व आणि प्रथेविषयी जाणून घ्या सोप्या भाषेत !
आश्विन शुद्ध दशमीला 'दसरा' किंवा 'विजयादशमी'चा सण साजरा करतात. सूराचा असूरावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो.
'दसरा' साजरा करण्याची प्रथा- देवीने महिषासुर नावाच्या दुष्ट राक्षसाशी सलग 9 दिवस युद्ध करुन दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' या नावाने ओळखला जातो. रामाने रावणाचा वधही याच दिवशी केला म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याच्या दिवशी देशातील विविध भागांत करण्यात येते.
शस्त्र-पूजनाच्या प्रथेची पार्श्वभूमी-
दसऱ्याच्या दिवशी पुस्तके, पोथ्या, वाद्य, शस्त्र यांची पूजा करण्याचा प्रथा आहे. पाटी, वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक रुप काढून पूजन केले जाते.*
अज्ञातवासाचा कालावधी संपत असताना कौरवांनी विराट राजाच्या गाई पळवून नेल्या. त्यावेळी अर्जुनाने झाडाखालील शस्त्रं काढून घेतली आणि गाईंचे रक्षण करण्यासाठी कौरवांशी युद्ध केले. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते.
सोने लुटण्याची परंपरा: कौत्स नावाचा शिष्य वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेत होता. शिक्षण संपल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून कौत्साने फारच आग्रह केल्याने वरतंतू ऋषींनी त्याला शिकवलेल्या चौदा विद्यांसाठी प्रत्येकी 1 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली. गुरुदक्षिणेसाठी दान मागण्यासाठी कौत्स रघुराजाकडे गेला. रघुराजाने इंद्रावर स्वारी करुन सुवर्णमुद्रा कौत्साला देण्याचे ठरवले. मग इंद्राने कुबेराच्या मदतीने एका आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. रघुराजाने कौत्सला सगळ्या मुद्रा घेण्यास सांगितले. तर कौत्सकडून ठरल्याप्रमाणेच वरतंतूंनी केवळ 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि कौत्सने उरलेल्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना लुटण्यास सांगितले. तेव्हापासून दसऱ्याला आपट्याच्या पानांच्या रुपात सोने लुटण्याची परंपरा सुरु झाली.
No comments:
Post a Comment