भीती वाटली, हिंमत संपली की तुझ्या जवळ येतो मी, मी हरलोच नाही पाहिजे असं मागणं नाही माझं, पण हार पचवायची ताकद तू मला दे...
मी केलेल्या कर्माहून मोठं फळ मला दे असं मागणं नाही, मात्र कर्म करत राहण्याची जिद्द मला दे, कर्म करत असताना त्यातली सचोटी कायम राहू दे, कर्म करत असताना त्या मागचा हेतू शुद्ध आणि पवित्र ठेव...
तुझ्या जीवावर मांडलेला डाव उधळला गेला तरी तुला बोल लावणार नाही मी, मात्र डाव उधळला गेला तरी नवा डाव पुन्हा मांडण्याचं सामर्थ्य मला दे...
निराशेच्या गर्तेत अंधारल्या वाटा फिरताना मी माझा प्रकाश स्वतः शोधेल, मात्र त्या अंधारात माझं काळीज अंधारलं जाणार नाही, मी हि त्या अंधाराचा भाग होणार नाही, आणि माझ्या काळजात असणारी आग विझणार नाही याची काळजी तू घे...
मला बाकी काही बनव अशी अपेक्षा नाही, ८४ लक्ष योनीतून मला माणूस बनवलं हेच खूप आहे, माणूस बनून जगताना माझ्यातलं 'माणूसपण' हरवू नये याची काळजी घे...
याहून जास्त काय मागू!!! तुझे हात समर्थ आहेत, माझी झोळी दुबळी आहे...!!
No comments:
Post a Comment