काही गोष्टी आपल्यात उपजत किंवा अनुवंशिक असतात. बोलणं हा त्यातलाच एक प्रकार.
'आधी बोला, मग जमलं तर गोड बोला'. बोलणं संपलंय खरंतर आताशा. भरभरून बोलणारी माणसं कमी झालीत. एखाद्याबद्दल भरभरून बोललं की भाबडेपणाचा, व्यक्तिपूजेचा शिक्का हल्ली लगेच बसतो. अति बोलणं आणि भरभरून बोलणं यात फरक आहे. खोटी स्तुती, मतलबी गोड बोलणं लक्षात येतं.
गुजराथी, मारवाडी लोक मुळातच गोड बोलतात. आपण त्यांना नावं ठेवण्याशिवाय दुसरं काहीही करत नाही. पोटात शिरण्याची कला त्यांच्या डीएनएमधे आहे. धंदा भरभराटीला आणण्यासाठी ते गरजेचं असतं. ते कशी छान साखरेची सुरी करून गळा कापतात दुकानात आणि आपण माहित असूनही मान पुढे करायला वारंवार जातो. हा मानसोपचार आहे. उधारीवर घेऊन सुद्धा तो तुम्हांला 'या, शेठ' म्हणतो, मराठी दुकानात तुमच्याकडे तो कमाल तुच्छ नजरेने बघतो. महाराष्ट्रीयन बाणा या नावाखाली आपण वर्षानुवर्षे माती करत आलोय, करत राहू.
आज म्हणजे संक्रांतीच्या दिवशी व्हाट्सअप आणि फेबूच्या भिंती औपचारिक मेसेजेसनी भरभरून वहातात. प्रत्येक सणाला आपल्याकडे वैशिष्ठ्य आहे. थंडीत उष्णता हवी म्हणून तीळ आणि गुळाच्या पोळीची योजना आहे. आपण खरंतर अर्धवट आहोत. निम्म्या माहितीवर आपण खूप बोलतो. सूर्याचं संक्रमण म्हणजे काय किती जणांना माहित असतं. वाईट झालं की एखाद्यावर संक्रांत आली म्हणतो आणि इकडे हॅप्पी संक्रांत पण म्हणतो. तिळगुळ देणं, सोनं वाटणं यात भेटीगाठी आहेत, थोरांचे आशीर्वाद घेणं आहे, जमण्याचा आनंद आहे, फिल गुड वाटण्याचं नियोजन आहे. वयोमानाने थकलेली, आजारी असलेली माणसं माणसांपासून लांब जाऊ नयेत, घरात नविन कपड्यांचा वाससुद्धा त्यांना उत्साही करतो म्हणून हे सण असतात, एकत्र येण्यासाठी. कॉटवर तासंतास, दिवसेंदिवस पायाची अढी घालून, कमरेत वाकलेली माणसं शून्यात बघत एकटी बसलेली दिसतात आणि त्यांच्या घरातली माणसं व्हाट्सअप आणि फेबूवर मेसेजेस पाठवण्यात दंग असतात. असो!
गोड बोलणं म्हणजे नेमकं काय असतं? खोटी स्तुती? मतलब निघावा म्हणून केलेलं संभाषण? गुडबुक्समधे रहाण्याचा खटाटोप? उगाच कशाला वाईटपणा यासाठी? प्रत्येकाचा अर्थ ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगळा येईल. कारणाने गोड बोलणं वेगळं असतं, नाईलाज म्हणून असतं ते. लहान मुलाचं बोलणं गोड असतं, कुठलाही मतलब न चिकटलेलं असतं. खाऊसाठी, कडेवर घेण्यासाठी, बाहेर चक्कर मारायला नेण्यासाठी असतंही पण ते लोभस असतं. त्यात हेतू असतो, मतलब नसतो. आपल्यालाही ते आवडतं म्हणून आपण त्याचा हेतू लगेच पूर्ण करत नाही.
वयाप्रमाणे गोड बोलण्याचे अर्थ आणि आवाजाचा पोत बदलत जातो माणसाचा. प्रेमात पडला की किंवा पटवायच्या वेळी तो जिभेवर मधाचे स्प्रिंकलर्स लावून बोलतो. नोकरीच्या ठिकाणी पुढच्या प्रगतीसाठी कॅल्क्युलेटेड गोड बोलतो. सरकारी ऑफिसात नाईलाज म्हणून मुखवटेदार गोड बोलतो.
गोड बोलणारी म्हातारी माणसं विरळ असतात. एकतर त्यांचं बोलणं संपलेलं असतं किंवा कसल्यातरी काळीज कुरतडण्या-या काळजीने, व्याधीने त्रस्त असतात. ते पटकन आपण कुणाला दुखावणार तर नाही ना या भीतीपोटी अबोल होत जातात. किरकोळ कामासाठी कायम घाईत असलेल्या नातवंडांशी ते जे बोलतात ते गोडपेक्षा लाचारीचा पदर धरून आलेलं असतं. सुखी, तृप्त माणसाचं बोलणं जास्ती गोड असतं किंवा वाटतं कारण ते मनातून आलेलं असतं. पण हल्ली झालंय काय प्रत्येकाला स्तुती हवीये. किरकोळ टीकाही लोकांना सहन होत नाही त्यामुळे वाद नको म्हणून सोशल मिडियावर लोक एकमेकांशी केवढं तरी नाटकी गोड बोलत असतात. फटकारणारा माणूस आपला हितचिंतक असतो हा आता गैरसमज आहे. पहिल्यांदा खरं बोलणारा माणूस परखड म्हणून ओळखला जायचा. त्याच्यात थोडी वाढ झाली की तो फटकळ असतो आणि त्या स्वभावाची मस्ती आली की माणूस तोंडाळ होतो आणि आपली ती प्रतिमा पुसली जाऊ नये म्हणून सतत गरज असो नसो, वादग्रस्त बोलत रहातो.
मकर संक्रांतीला ( एकदिवसीय ) गोड बोला सांगण्याला फारसा अर्थ नाहीये. प्रथा आहे एवढंच. करा असं सांगावं लागतंय वर्षानुवर्षे यांतच त्यातला फोलपणा आहे. जो आपण चुकत असताना निर्भीडपणे आपण चुकत आहोत असं सांगतो, धर्मराजाचा रथ जसा जमिनीवरून दोन बोटं वर चालायचा तसे आपले जमिनीवरचे पाय सुटालागल्यावर आपले डोळे उघडतो तो माणूस प्रिय असावा खरंतर. प्रत्येकाला कडू गोळी साखरेतून देता येईल असं नाही. सातवी आठवीला एक संस्कृत सुभाषित होतं, 'सत्यम ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियं | प्रियं च नानृतं ब्रूयात एषधर्मः सनातनः'. त्याचा अर्थ लक्षात आहे. सत्य बोला, प्रिय वाटेल असं बोला, पण कटू वाटेल असं सत्य आणि प्रिय वाटेल असं खोटंही बोलू नका. कुणाला वाईट वाटेल असं सत्य बोलू नये ठिक आहे पण पुढे त्याचं नुकसान होणार असेल तर मात्र आत्ता वेळीच बोलावं असो!
गोड की कडू, ते राहू देत, काय आणि कुठे बोलायचं नाही हे एकदा समजलं की माणूस यशस्वी होईल एवढं खरं.
No comments:
Post a Comment