Monday, January 9, 2023

वटवृक्ष तोडल्याचे परिणाम


( 'भवताल' च्या जानेवारी २०२१ च्या अंकातील लेख)

वरवर पाहता वडांच्या झाडांची तोड आणि पिकांचे नुकसान यांचा काही परस्परसंबंध असू शकेल असे सांगितल्यास कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या काही घटना या असा परस्परसंबंध आहे हे दाखवून देण्यास निश्चितच कारणीभूत ठरतात. इसवी सन २०१९ आणि २०२० या वर्षात, सांगली जिल्ह्याच्या काही भागात द्राक्ष, चिक्कू, डाळिंब अशा फळबागांवर वटवाघळांचे हल्ले झाले. रात्रीच्या अंधारात एखाद्या टोळधाडीप्रमाणे छापा मारून निम्म्याच्या आसपास फळे फस्त केली गेली. बरं, यात फळं खाणं कमी आणि नासाडी जास्त असाच प्रकार होता. उभ्या पिकांवर आलेल्या या अनपेक्षित संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले. या घटनेची टीव्ही, वृत्तपत्रे यांनी तर दखल घेतलीच, पण समाजमाध्यमांवरही याची बरीच चर्चा रंगली. नेहेमीप्रमाणे, याबाबतीत वनखात्याने काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी ओरड होऊ लागली. अर्थात, वनखात्याने तातडीने करण्यासारखा काहीही उपाय उपलब्ध नव्हताच ! मग काही शेतकऱ्यांनी एखाद-दुसऱ्या वटवाघळाची चाहूल लागताच शेतात पक्षीप्रतिरोधक जाळी बसविणे, तीव्र प्रकाशझोताचे दिवे लावणे असे उपाय केले. सर्व वटवाघळे निशाचर असल्याने आणि त्यांना अंधारातच संचार करण्याची सवय असल्याने, प्रखर प्रकाशझोतामुळे काही अंशी वटवाघळांना दूर ठेवण्यास मदत झाली. परंतु , काही ठिकाणी लावलेल्या पक्षीरोधक जाळ्यांमध्ये अडकून अनेक वटवाघळे मृत्युमुखी पडली. त्यामुळे हे उपाय महागडे तर आहेतच, पण ते शाश्वतही नाहीत असे दिसून आले. भळभळत्या खोल जखमेवर वरवर मलमपट्टी करत बसण्यासारखेच या उपायांचे स्वरूप आहे. या सर्व गदारोळात, वटवाघळांचे हल्ले अचानक वाढण्यामागचे खरे कारण काय असू शकेल हे शोधण्याचा प्रयत्न मात्र कोणीही करताना दिसले नाही. काय असू शकतील यामागची खरी कारणं ? 

वटवाघूळ अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांच्या अभ्यासानुसार जगभरात वटवाघळांच्या १०१३ प्रजाती आढळतात. यापैकी सुमारे १२३ प्रजाती भारतात, तर ५० प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. यातील सुमारे ८०% प्रजाती किटकभक्षी तर २०% प्रजाती फलाहारी असतात. म्हणजेच वटवाघळांच्या एकूण प्रजातींपैकी खूप कमी प्रजाती फळे खाणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात सहजपणे दिसणारी फलाहारी वटवाघळांची जात म्हणजे इंडियन फ्लाईंग फॉक्स (Pteropus giganteus). ही वटवाघळे मुख्यतः फळे आणि फुलातील मध यावर उपजीविका करतात. यांच्या आहारात झाडांच्या सुमारे ३०० विविध जातींची फळे, फुले, खोड, शेंगा, मध यांचा समावेश असतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पांचट चवीमुळे माणसाला न आवडणारी वड, पिंपळ, उंबर अशा अंजीरवर्गीय झाडांची फळे वटवाघळांना मात्र फार आवडतात. हिवाळ्याच्या काळात या झाडांना लागलेल्या फळांवर वटवाघळांची अगदी झुंबड उडते. वंदन एस.इ. आणि कालीश्वरन बी. या संशोधकांनी २०११ साली मदुराई इथे केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वटवाघळांच्या विष्टेतील फळांच्या बियांपैकी ७०% बिया या वडाच्या झाडाच्या असतात. 

वड ही भारतीय परिसंस्थांमधील अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. त्याची फळं वटवाघळांबरोबरच अनेक प्रजातीचे पक्षी, माकडं यांचंही खाद्य आहे. वडाच्या भरपूर पसरलेल्या फांद्या आणि त्याच्या पानांची सावली यामुळे पक्ष्यांना घरटी करायला आदर्श जागा मिळते. तसेच वटवाघळांसाठी सुद्धा विश्रांती घेण्याचे हे उत्तम ठिकाण असते. रात्रभर अन्नाच्या शोधत भटकणारी वटवाघळे सकाळ होताच गुहा, कडेकपारी, जुन्या इमारतींच्या वळचणी इथे विश्रांतीसाठी एकत्र येतात आणि उलटी लटकून राहतात. इंडियन फ्लाईंग फॉक्स आकाराने खूप मोठी असल्याने त्यांना लटकण्यासाठी दाट सावली देणारी आणि खूप फांद्या असलेली मोठी झाडे लागतात. वड, पिंपळ, अर्जुन, खोटा अशोक ही झाडे अशा प्रकारच्या निवाऱ्याकरिता खूप उपयुक्त असतात. म्हणजे वडाची झाडे वटवाघळांना नुसते खाद्यच पुरवत नाहीत तर निवाराही पुरवतात. मग या बदल्यात वडाच्या झाडांना काय मिळतं ? तर वडाच्या झाडांचं पुनरुत्पादन हे सर्वस्वी पक्षी आणि वटवाघळं यांच्यामुळे होतं. वडा-पिंपळाच्या बिया नुसत्या जमिनीवर पडल्या तर रुजत नाहीत. पक्षी आणि वटवाघळं त्याची फळं खातात आणि त्यांच्या पोटात या फळांच्या बियांवरील कठीण आवरण विरघळतं. मग त्यांच्या विष्टेतून या बिया जिथे कुठे पडतात तिथे वडा-पिंपळाची नवीन रोपे उगवतात. थोडक्यात काय तर वड आणि वटवाघूळ यांच्यातील नातं परस्परपूरक सहजीवन (Symbiotic association) या स्वरूपाचं असतं. पण अशा या वडाच्या झाडांची सगळीकडची सद्यस्थिती मात्र फारशी चांगली नाही, सांगली जिल्ह्यात तर नाहीच नाही ! 

वडाची झाडे ही शक्यतो गाव-शहरातील मोकळ्या जागी, गावच्या वेशीवर, मंदिरांच्या आवारात किंवा रस्त्याच्या बाजूने आढळतात. यातील बरीच झाडे आपोआप उगवून आलेली असतात, तर काही झाडे माणसांकडून लावली गेलेली असतात. हिंदू समाजात या झाडाला धार्मिक महत्व असल्यामुळे एके काळी या झाडांची लागवड व जपणूक केली जायची. पूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे मोठ्या संख्येने दिसायची. यांच्या फांद्या व पारंब्या यांचा विस्तार प्रचंड प्रमाणात होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निर्माण होणाऱ्या छत्र्या रस्त्याच्या वर मधोमध एकमेकांत मिसळून जायच्या व त्याखालून जाणाऱ्या ट्रक, एसटी बस अशा मोठ्या वाहनांना घासून घासून वरच्या पारंब्यांना गोलाकार आकार प्राप्त व्हायचा. अशा प्रकारे निर्माण झालेल्या पारंब्यांच्या कमानी आणि बोगद्यातून गाडी जाताना आपल्याला किती आल्हाददायक वाटते हे जुन्या काळी या रस्त्यावरून प्रवास केलेल्या लोकांना विचारल्यास सहज समजू शकते. रस्ते हे माणसाचे दळणवळण सुकर करत असले तरी ते मोठ्या प्रमाणात सूर्याची उष्णता शोषून घेऊन बाहेर टाकतात व तापमानवाढीस कारणीभूत होतात. पण त्यावर झाडांचे आच्छादन असल्यास या तापमानवाढीला आळा बसतो. 

दुर्दैवाने, गेल्या १०-१५ वर्षात या वडाच्या झाडांवर अचानक संक्रांत आली. वाढत्या वाहतुकीमुळे रस्ते अपुरे पडू लागल्याने सर्वत्र रस्ता रुंदीकारणाची जी कामे जोमाने सुरू झाली त्यात या वडाच्या झाडांची प्रचंड कत्तल झाली. फक्त सांगली-मिरज शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मिरज-सांगली रस्ता, मिरज-पंढरपूर रस्ता, सांगली-माधवनगर रस्ता, सांगली-कोल्हापूर रस्ता इथे एके काळी अशी पुष्कळ वडाची झाडे होती. यातील एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व झाडे गायब झाली आहेत. सध्या जोरात काम सुरू असलेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन कवठेमहांकाळकडे जाणाऱ्या फाट्यावरून आत वळले की लगेचच वडाच्या झाडाच्या कमानी लागतात. पण लवकरच त्याही रस्ता रुंदीकारणात तोडल्या जाणार आहेत असं कळलं. खरंतर हे काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या करारानुसार, एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात पाच झाडं लावणं कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, हा करार पाळला जातो की नाही याची शहानिशा बहुतांश वेळा होतच नाही. एखाद्याने खरोखरीच एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावली तरी तोडलेल्या वड-पिंपळाच्या बदल्यात रेनट्री, गुलमोहर, टॅबुबिया असली परदेशी, स्थानिक पर्यावरणासाठी पूर्णतः कुचकामी झाडे लावली जातात. आणि अगदी एखाद्याने पुन्हा वडा-पिंपळाची झाडे लावलीच तरीही ती झाडे मोठी होऊन त्याचा पक्षी व वटवाघळे यांना उपयोग होईपर्यंत किमान २०-२५ वर्षे जातात. म्हणजे या काळात पर्यावरणाचं किमान पाव शतकाचं नुकसान होतं. वडाच्या झाडाची मुळे खूप दूरवर पसरून इमारतीच्या भिंतींना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे गावात,शहरात वडाची झाडे लोक फारशी लावत नाहीत. तसेच जुनी, मोठी वडाची झाडे तोडून टाकण्याकडेही लोकांचा कल आहे. शेतकरी लोक शेताच्या बांधावर वडाचे झाड लावत नाहीत, कारण त्याच्या सावलीमुळे पिकांचं नुकसान होतं असं त्यांचं म्हणणं असतं. मग अशा परिस्थितीत वडाच्या झाडांनी कुठे आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं ? आणि त्यावर अवलंबून असलेल्या पशुपक्ष्यांनी कुठे जायचं ? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. 

माणसाने वडा-पिंपळाची झाडे तोडून वटवाघळांच्या अन्नाचे आणि निवाऱ्याचे हक्काचे स्रोत उद्ध्वस्त केले. हे स्रोत पुन्हा निर्माण करण्याचीही माणसाची मानसिकता नाही. मग या वटवाघळांनी जगण्यासाठी काय करायचं ? निसर्ग नियमानुसार, कोणताही प्राणी अथवा पक्षी अस्तित्वाच्या लढाईत सहजासहजी हार मानत नाही. तो प्रथम बदलत्या भौतिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. वन्यजीवांनी मानवी शहरांशी जुळवून घेणे याला जीवशास्त्रात 'सिनअर्बनायजेशन' असे म्हणतात, तर त्यांनी माणसाने निर्माण केलेल्या अनैसर्गिक भौतिक परिस्थितीनुसार स्वतःची जीवनशैली विकसित करणे याला 'सिनअँथ्रोपायजेशन' अशी संज्ञा आहे. वटवाघळे देखील नेमके हेच करत आहेत. त्यांना विश्रांतीच्या जागा मिळेनाशा झाल्यावर त्यांनी दिसतील तिथे उंचावर निवारा शोधायला सुरुवात केली. सांगलीच्या आयर्विन पुलाचा सांगलीवाडीकडचा भाग आणि मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे निलगिरीच्या झाडाला वटवाघळे लटकलेली दिसतात. वास्तविकतः , निलगिरी हे स्थानिक पर्यावरणासाठी अगदी कुचकामी असे परदेशी झाड आहे. तिथे वटवाघळांना लटकायला मजबूत फांद्याही नसतात, खायला फळेही नसतात आणि लपायला दाट सावलीही नसते. कुठेतरी उंचावर, अन्य प्राण्यांपासून सुरक्षित जागा मिळते आहे म्हणून वटवाघळांनी त्या झाडांशी जुळवून घेतलंय. पण याचा अर्थ निलगिरीचे झाड पर्यावरणपूरक झाले असा होत नाही. त्याचे स्थानिक पर्यावरणाला असंख्य तोटे आहेत. वटवाघळांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत देखील असाच बदल केला आहे. वडा-पिंपळाची फळे पुरेशी मिळत नाहीत म्हणून मग माणसाने पिकविलेल्या आयत्या फळांकडे ते मोर्चा वळवितात. पूर्वीही एखाद-दुसरं वटवाघूळ फळबागांमध्ये आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण टोळधाडीप्रमाणे झुंडीने फळबागांवर हल्ले करण्याचे प्रमाण आता वाढले आहे. वरील घटना पाहिल्यावर, वड आणि वटवाघूळ यांचा परस्परसंबंध कोणालाही सहज लक्षात येईल. 

प्राचीन काळापासून मानवी समाजात वटवाघूळ हा एक बदनाम झालेला जीव आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वटवाघळे करीत असलेला कर्कश्श गोंगाट आणि त्यांच्या वस्तीजवळ येणारा घाण वास ! भुताखेतांच्या कथा, कादंबऱ्या, चित्रपट यात भीतीदायक वातावरण निर्मितीसाठी हमखास वटवाघळे दाखविली जातात. अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनानुसार असे दिसून आले आहे की वटवाघळे ही रेबीज, सार्स, हेंड्रा, मारबर्ग, निपाह, कोरोना अशा माणसाला प्राणघातक आजार निर्माण करू शकणाऱ्या अनेक विषाणूंचे वाहक असतात. पण खरी गोष्ट अशी की वटवाघळांनी स्वतःहून हे आजार माणसांपर्यंत पोहोचविलेले नाहीत. त्यांचे मांस खाण्यासाठी किंवा केवळ छंद म्हणून माणसे यांची शिकार करतात आणि त्याच्या संपर्कात येतात म्हणून हे आजार पसरले. पण एक रेबीज वगळता भारतीय वटवाघळांमुळे यातील कोणतेही आजार पसरल्याचे सिद्ध झालेले नाही. 

वटवाघळे ही सुमारे ३०० प्रजातींच्या वनस्पतींना भेट देत असल्यामुळे त्या झाडांचा बीजप्रसार आणि फुलांचे परागीभवन यात महत्त्वाची भूमिका बजावतात. किटकभक्षी वटवाघळे प्रचंड प्रमाणात किडे खात असल्याने शेतीला उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पडतो. कीटकभक्षी वटवाघळांची विष्टा म्हणजेच ग्वानो ही नायट्रोजन या पोषकद्रव्याने परिपूर्ण असते. त्यामुळे दक्षिण अमेरिका आणि भारतातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान या राज्यात शेतीसाठी खत म्हणून त्याचा वापर केला जातो. राजस्थानी स्वयंपाकातील प्रसिद्ध मठनिया मिरच्या या खास वटवाघळांच्या विष्टेचे खत घालून वाढविल्या जातात. असे असताना आपण मात्र निसर्गाला व पर्यायाने माणसाला भरभरून मदत देणाऱ्या वडाच्या आणि वटवाघळांच्या जीवावर उठलो आहोत. 

माणूस आणि वन्यजीव यांच्यातील या लढाईत वन्यजीवांची हार होणार हे निश्चित आहे. कारण माणूस आणि त्याची यंत्रे यांच्या राक्षसी ताकदीसमोर वन्यजीवांचा फार काळ निभाव लागणे शक्य नाही. पण या लढाया जिंकताना निसर्गाबरोबर नकळत सुरू केलेले युद्ध मात्र माणूस हरत चालला आहे याची त्याला जाणीव नाही. निसर्ग छोट्या-मोठ्या घटनांमधून वारंवार माणसाला धोक्याचे इशारे देत असतो. वाघ-बिबट्यांचे किंवा मगरींचे माणसावरील हल्ले, लांडग्यांचे शेळ्यांवरील हल्ले, वटवाघळांचे फळबागांवरील हल्ले हे असेच छोटे छोटे धोक्याचे इशारे आहेत. ते वेळीच ओळखून पावले उचलली नाहीत तर सर्वनाश अटळ आहे. अशा घटनांवर वरवरची मलमपट्टी करण्याऐवजी शाश्वत उपाय करुन, पृथ्वीवरील अन्य प्राण्यांसोबत सहजीवन व्यतीत करण्यातच माणसाचे खरे हीत आहे ! 

© डॉ. हर्षद दिवेकर 

नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली. 

 विनामूल्य किंवा वर्गणीसह नाव नोंदवून, 'भवताल' च्या अंकाची पीडीएफ प्रत मिळविण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा आणि आपले नाव जरूर नोंदवा. 
[07/02, 8:16 PM] PANDITRAO MILIND M (DFO): वटवाघूळ हे नावच वटवृक्षाशी साधर्म्य असणारे आहे. 

सोयाबीन, ऑलिव्ह, पिझ्झा, पास्ता, धान्यांचे परदेशी वाण, फुलांच्या परदेशी जाती इतकेच नाही तर परदेशी कुत्री मांजरे छानछोकी खातर आणून आपण आपल्या पर्यावरणाचा, इकोसिस्टीमचा नकळत ऱ्हास घडवून आणत आहोत याचे भानही आपल्याला उरलेले नाही. 

पारंपरिक जीवनपद्धती सोडून आपण काय गमावतोय हे कळेल तेंव्हा उशीर झालेला असेल.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...