कोकणातील सिंधुदुर्ग पासून गोव्यापर्यंत,कालच्या होळीनंतर आजपासून सुरू झालेला *" शिगमोत्सव*" म्हणजे, एका महत्वाच्या,अविभाज्य,सांस्कृतिक परंपरेतील एक प्रकार म्हणजे आपल्या पुराणातील,मिथकातीलच विविध वेशभुषा साकारणे ज्याला, "सोंगं" आणणे, असे म्हणतात.गावात प्रत्येकाच्या घरोघरी फिरून ही कला साकारण्याच्या ह्या एकूणच प्रकाराला " *रोंबाट* " असे म्हणण्याची प्रथा आहे.
आज काळ खूप बदललाय,पुढे सरकलाय पण जुन्या काळी सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती बेतास बात,ओढाताणीची होती,मनोरंजनाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना,मनाच्या काही काळ विरंगुळ्यासाठी,कष्टकऱ्यांच्या शिथिलतेसाठी हे अत्यावश्यकच होते त्यामुळे सहजी हाताशी लागणारे साहित्य वापरून ही कला सादर केली जायची आणि त्यातून घरोघरी फिरताना लोकही आपापल्या परीने हाताशी असलेले काही पैसे स्वरूपात सादर करणाऱ्यांना दिले जाते ज्याला " *" शबय* " असे रूढार्थाने म्हटले जाते,तेव्हढेच कलेला प्रतिसाद म्हणून दिल्याघेतल्याचे समाधान,जे खूप मोठे होते,ज्याचे मोल पैशात होणार नव्हते.
सिंधुदुर्ग आणि संबंध गोवा प्रांताची जडणघडण,संस्कृती,खाद्यपदार्थ, भाषेतील साधर्म्य,पोशाख इत्यादी अनेक बाबतीत बरेचसे सारखेपणा असल्याने ही प्रथा तेथेच आढळते,आजही जपली जाते.त्यामुळेच इतर ठिकाणी होळी-शिमगा असे उच्चारताना केवळ याच प्रांतात तो उच्चार " *शिगमा* " असा केला जातो. ह्यात नवीन पिढीतील शिकले सवरलेले, आंग्लाळलेले,उच्चविद्या विभूषित अभिमानाने स्वभुमीची,इथल्या तांबड्या मातीची परंपरा सांभाळताना दिसतात तेव्हा ती पुढे वाटचाल करत असताना, याची डोळा पाहणे,यापेक्षा अधिक समाधान ते काय असणार आहे.
*शिगम्याच्या शुभेच्छा,शबय,शबय_*

प्रदीप धुरी
No comments:
Post a Comment