Saturday, December 10, 2022

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

              *🔸श्री क्षेत्र पंढरपूर.🔸*


*पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव 'पंडरगे' असे आहे.*

*पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.*

*पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितांत पंडरिगे-पंडरगे-पौंड्रीकपूर- पुंडरिकपूर- पंढरपूर - पंढरी अशा विविध नावांनी ओळखले जाते.*

*पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो. डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते. शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. 'स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा 'लानमडू' हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली, आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास झाला.*

*विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशीही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त, तसेच इतर जातिधर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’ विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे.*

*चंद्रभागा.*
*भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.*

*भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड पासून ते पंढरपूरपर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 'नमामि चंद्रभागा अभियान' हाती घेतले आहे. यामध्ये भीमाशंकरपासून ते रायचूरपर्यत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वछता, नदीकाठी वृक्ष लागवड अश्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न आहे, अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे.*

*नमामि चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे २०१५ साली सुरू करण्यात आली पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुरवस्था नीट होईल.*

*पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.*

*विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा सांधला जातो. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती होय.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

                   *🔸चंद्रभागा.🔸*


*श्रीक्षेत्र पंढरपूर हे भिमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे.*

*याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकाचे मते भागवताच्या स्कंद ५ अध्याय १९ मधील १८ व्या श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या भीष्मपर्वात अध्याय ९ मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढऴतो. आनंद रामायणातदेखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो.*

*प्रभु रामचंद्रांनी सीताशोधार्थ लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग वर्णिला आहे.*
    
*धन्य धन्य भिवरातट | चंद्रभागा वाहे निकट |*
*धन्य धन्य वाळुवंट | मुक्तिपेठ पंढरी |*
*असे चंद्रभागेचे महत्व सांगितले आहे.*

*पंढरीचा वास चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे ||*
*उभे राहुनि दर्शन मंडपी | कृतार्थ करील जगजेठी ||*

*ज्या वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले त्या तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनाच्या मनी निर्माण होते.*
*कोटी कोटी जन्माचे पातक | नासे केलेया देख ||*
*एवढे क्षेत्र अलौकिक | पांडुरंग भीवरा ||*

*अशी या तीर्थस्नानाची ख्याती आहे. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधी स्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे.*
*स्त्रोत: आंतरजाल.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

              *🔸पालखी सोहळा.🔸*

*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*

*हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते . हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.*

*ज्ञानदेवांची पालखी: हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.*

*श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.*

*तुकोबांची पालखी: तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.*

*एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.*

*महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकाराम च्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.*
*स्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...