अमृतानुभवाच्या वाटेवर...
*तुमचा चांगल्या आयुष्याचा एकदा निश्चय झाला म्हणजे मधली पापंसुद्धा पुण्यरूप होऊन जातील. असा खर्या अध्यात्माचा अर्थ आहे.* त्याचं कारणच असं आहे की, ज्यावेळेला अंतिमत: पुण्य तुमच्या मनात सतत जागृत राहिलेलं आहे. त्याच्या मध्यंतरीच्या काळात तुमच्या हातून पाप घडूच शकणार नाही. नाहीतर त्या मनाचा मूळचा निष्कर्षच मुळी पुण्याचा निघणार नाही. हे एक मोठं काॅन्ट्रॅडिक्शन आहे, परस्परविरोध आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये, पसायदान प्रार्थनेत लिहिलंय, 'जो जो वांच्छिल तो ते लाहो'. म्हणजे काय? की ज्याला जे हवे असेल ते त्याला मिळो. आणि तिकडे भगवानाने सांगितलं की, 'हो, तुला जे पाहिजे असेल ते मिळेल.' केवढं आश्वासन आहे. अरे, साध्याने साध्याला दिलेलं ते आश्वासन नाहीये. असाध्यानी असाध्याला दिलेलं हे आश्वासन आहे. ही कुणी साधी माणसं नव्हती. आणि ते साधे देवही नव्हते. हा *महादेवांचा महादेव आहे की जो असं म्हणतो, की मी जळेन, पण तुम्हाला तृप्त, शांत ठेवेन.* हा भाग महत्वाचा. संकल्प काय? *तो महादेव कसा आहे? तर तो 'महादेव' भोगून झालेला नाही, त्यागून झालेला आहे.* त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या त्यागाला ज्यावेळेला महात्याग मिळाला, त्यावेळेला काहीही उणं पडलं नाही. ज्ञानेश्वरांनी मागताना असं मागितलं, "हे परमेश्वरा, माझं वाटोळे झालं तरी मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. जगाचं चांगलं झालं पाहिजे. जग जे जे मागेल ते मिळालं पाहिजे." केवढी मोठी गोष्ट होती. यापेक्षा समतेचा आदर्श आणि गरीबांची सेवा करायचा आदर्श कोणचा असेल? जो कोणी जे काही वाईट करत असेल ते त्याच्या नशिबालाच घातक ठरेल. मी एकच मागेन की, त्याचं भलं होवो. हा केवढातरी अध्यात्मात आदर्श आहे. आणि असेच आदर्श या अध्यात्मामध्ये वाट चालत आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, 'भाष्यकाराते वाट पुसती.' ज्यांनी जीवनाचं भाष्य केलं, त्यांची वाट पुसत पुसत मी पुढे जातो आहे. अरे, सोपी गोष्ट नाही. *ज्यांना सबंध आयुष्यभर अश्रू पुसावे लागले, ज्यांना मांडेसुद्धा रडत रडत खावे लागले, असा दुर्दैवी मनुष्य जगासाठी तडफडला, आणि जगाचं भलं होवो असं मागितलं. त्या ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव आपल्या कुशीत दिलेला आहे.*
*— स्वामी विज्ञानानंद*
*'अमृतानुभव (प्रयोग विवेचन)' - पाठ १ मधून*
```Manashakti Research Centre, Lonavla``` 02114234330/ *9923474066*
No comments:
Post a Comment