
*बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल|*
*करावा विठ्ठल जीवेभावे||१||*
*येणे सोसे मन झाले हांवभरी|*
*परत माघारी येत नाही||धृ||*
*बंधनापासून उकळल्या गाठी|*
*देता आली मिठी सावकाश||३||*
*तुका म्हणे देह भरिला विठ्ठल|*
*काम क्रोध घर केले रिते||४||*
प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा,नाम प्रकरणातील आहे.मनुष्य दैनंदिन व्यवहारात बोलण्या वाचून राहू शकत नाही,हे अगदीच खरे आहे.बोलून आपले विचार,मत व्यक्त करण्यात मनुष्य स्वतंत्र आहे.मनुष्याला या नरदेहात या घोर कलियुगात आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर संत वचनाला नेहमीच जागले पाहिजे.संत वचनानूसार आपले आचरण आहे काय? याविषयी दक्ष राहणे आवश्यक आहे.संत आपणास काय करावे असे सांगतात?हे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात:
*बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल|*
*करावा विठ्ठल जीवेभावे||१||*
बोलायचे आहे तर विठ्ठल बोला.विठ्ठलाविषयी बोला.विठ्ठलाचे नाम घेणे अत्यावश्यक आहे. कारण विठ्ठलाचे नाम घेतले तर जीवाचे परमकल्याण होते,परमात्मा प्राप्ती होते.
_घेता नाम विठोबाचे|_
_पर्वत जळतील पापाचे||_
संत सेना महाराज म्हणतात: की-विठोबाचे नाम घेतले तर पापाचे पर्वत जळतील. हरिपाठात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात:
_हरि उच्चारणी अनंत पापराशी|_
_जळतील पापे जन्मांतरीची||_
नामस्मरण केल्याने अनंत पापराशी जळून जातात, जन्मोजन्मीची पापे जळून जातात. नाम मुखाने घेणे हे जड जीवाला तसेच सर्वच जीवांना आवश्यक आहे.त्यामुळे मनुष्य निष्पाप होतो.डोळे,जिव्हा,कान,नाक,त्वचा या पंच ज्ञानेंद्रियातील जिव्हा व डोळे ही खूप महत्त्वाची आहेत.जिव्हेने बोलणे व डोळ्याने पाहणे,मनुष्य सहजच घडते.व्यवहारात या दोन ज्ञानेंद्रियाशिवाय मनुष्य राहणे अतिशय अवघड आहे.मग डोळ्याने काय पाहायचे?काहीही पाहिले तर चालेल का?... नाही!!
_डोळे तुम्ही घ्या रे सुख|_
_माझ्या विठोबाचे रूप||_
पाहायचेच आहे ना तर विठोबाचे रूप पाहावे, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. आणखीन काय? तर कोणतेही काम करीत विठ्ठलाचे नाम मुखाने घ्यावे,ते जीवाभावाने अगदी आवडीने घ्यावे.हाच अभ्यास अखंड नामस्मरण करीत राहिले तर मग मनाची अवस्था कशी होते तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात:
*येणे सोसे मन झाले हांवभरी|*
*परत माघारी येत नाही||धृ||*
मनाला एकदा नामस्मरणाची गोडी लागली की भौतिक,मायिक विषयाकडे धाव कमी होत जाते. _मन हा मोगरा अर्पुनि ईश्वरा| पुनरपि संसारा येत नाही||_
पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये तसेच अकरावे मन.यात मनच प्रधान आहे.म्हणून मन विठ्ठलाचे नामात रंगले की जीवात्मा जन्म-मृत्युच्या फेर्यातून बाहेर पडतो.आणखीन काय होते,हेच तुकाराम महाराज अभंगाच्या तिसर्या चरणात सांगत आहेत:
*बंधनापासून उकळल्या गाठी|*
*देता आली मिठी सावकाश||३||*
मन विठ्ठलाचे नामात रंगले मग ते विषयी,विकारी या दोषातून मुक्त होते.मनाला नाम आवडू लागत असल्याने त्याला खूप खूप सवड मिळते.काही वेळा सवड मिळाली नाही कामाच्या गराड्यात अडकून राहिला तरी नामस्मरणाचे अनुसंधान साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सोडत नाही. _नाम चांगले चांगले| माझे कंठी राहो भले||_
_कपी कुळी उद्धरिले|मुक्त केले राक्षसा||_
नामधारकाला नामस्मरणाचे महत्व कळाल्यामुळे तो रिकामा अर्ध घडी राहत नाही.त्याचे सर्व शरीर त्याला भगवंतमय वाटत असते,त्यामुळे काय परिणाम होतो,तेच तुकाराम महाराज चौथ्या व शेवटच्या चरणात सांगत आहेत:
*तुका म्हणे देह भरिला विठ्ठल|*
*काम क्रोध घर केले रिते||४||*
अखंड नामस्मरणाने मनुष्याला भगवंताशिवाय दुसरे काहीच सुचत नाही,तो कामातही राम आठवत असल्याने त्याला देव अगदी समीप,जवळचा होतो.त्यामुळे काम,क्रोध हे भयानक विकार देहातून निघून जातात.म्हणूनच बोलावा विठ्ठल,पहावा विठ्ठल अशी दमदार सुरूवात करून देह भरिला विठ्ठले...
इथंपर्यंत झेप घेण्याची,
सर्व वारकरी बांधवांना विठ्ठलाने प्रेरणा देवो,
संतांची कृपा नित्य राहावी,
हीच माझी प्रार्थना...
*
रामकृष्णहरि
*

रामकृष्णहरि
*
No comments:
Post a Comment