Covid 19 आणि वसंत ऋतु*



*भाग 6*
काही वर्षापूर्वी
दूरदर्शनवर लागणाऱ्या एका मालिकेचे शीर्षकगीत मला खूप आवडायचं
*कसं जगायचं ?कसं वागायचं ?*
*कुणी सांगेल का मला?*
*माझ्या आयुष्याचा,हीरो व्हायचयं मला*
एका छोट्या मुलाला पडलेले हे प्रश्न , सध्या बहुतेक प्रत्येकालाच पडलेले आहेत,
नाही का ?
कसं जगायचं पैकी सर्वात महत्वाचं म्हणजे,
काय खायचं?
याविषयी आतापर्यंत आपण जाणून घेतले .
*कसं वागायचं* यालाच आयुर्वेदात म्हटले आहे, *विहार*
झोपणे,उठणे ,व्यायाम
स्नान,कपडे ,आभूषणं,
दैनंदिन कर्मे , नित्य व्यवसाय (profession)
या सर्वांविषयी आयुर्वेदाने *विहार* या नावाने मार्गदर्शन केलेले आहे .
सध्या चालू असणाऱ्या वसंत ऋतूमध्ये कफदोषाचा प्रकोप झालेला आहे , शरीराचे बल कमी झालेले आहे आणि रोगप्रतिकारक क्षमताही कमी झालेली आहे .या सर्व पार्श्वभूमीवर विहाराविषयी काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे उत्तम, जेणेकरून कफदोष शरीरामध्ये अधिक वाढणार नाही. कारण सकाळचा 8 नंतरचा काळ हा कफकाळ असतो, त्यानंतरही झोपून राहिल्यास शरीरात कफाचा प्रकोप होतो. सूर्योदयापूर्वी उठून मलमूत्रविसर्जन इत्यादी कर्मे करावी , नंतर
आपल्या शरीर बलानुसार व्यायाम करणे अपेक्षित आहे . वाढलेला उन्हाळा आणि शरीरात आलेलं दौर्बल्य लक्षात घेता, ज्यांचे बल उत्तम आहे व ज्यांना सवय आहे त्यांनीचं फक्त उत्तम प्रकारचा व्यायाम (heavy exercise) करावा .अन्य लोकांनी सध्याच्या ऋतूत *योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चालणे* यासारखे व्यायामप्रकार करावे. *अनुलोम-विलोम भस्रिका, भ्रामरी यासारखे प्राणायाम* , योग्य पद्धतीने केल्यामुळे , श्वसन मार्गाची उत्तम पद्धतीने शुद्धी होते , तसेच आपल्या फुफ्फुसांची क्षमता चांगल्या प्रकारे वाढते. सध्या वातावरणातले प्रदूषण कमी झाल्यामुळे प्राणायामाचा उत्तम फायदा ,सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी केल्यास आपल्याला मिळू शकतो.
स्नान करण्यासाठी एकदम थंड पाणी वापरायला सुरवात न करता, आधी कोमट पाणी वापरावे .
ज्यांच्याकडे ऊन येते त्यानी उन्हामध्ये तांब्याचे घंगाळ किंवा धातूची एखादी बादली भरून ठेवून ,उन्हाने गरम झालेले पाणी आंघोळीसाठी वापरल्यास उत्तम ! या पाण्याला पूर्वी *झळवणीचे पाणी* असे म्हणत असत .
या पाण्यामध्ये उपलब्ध असल्यास *कडुलिंबाचा पाला,करंजाचा पाला किंवा लिंबाचा रस ,तुरटी ,भीमसेनी कापूर* यासारखे एखादे औषधी द्रव्य घालून स्नान केल्यास , शरीराची स्वच्छताही उत्तम होते आणि प्रसन्न वाटते. साबणाऐवजी *चंदन ,वाळा, नागरमोथा, त्रिफळा,शिकेकाई* यापैकी जी औषधे उपलब्ध असतील ती, काहीच न मिळाल्यास *मसुराच्या डाळीचे वा चण्याच्या डाळीचे पीठ,लिंबू ,संत्र्याच्या वाळवलेल्या सालिंचे चूर्ण,आवळा चूर्ण* यापैकी जे उपलब्ध असेल , ते अंगाला चोळून त्यानंतर अंघोळ करावी.
उन्हाळ्यामुळे अधिक घाम येतो, त्यामुळे घाम शोषून घेणारे *सुती,सैलसर आणि फिक्या रंगाचे कपडे* वापरावे .सध्याच्या काळात आपल्याकडे गरजेपेक्षा खूप जास्त कपडे असल्याची जाणीव जवळजवळ प्रत्येकाला झालेली आहे. रोज वापरण्याचे दोन जोड वगळता, कपाटात असलेले सर्व कपडे म्हणजे , मोठी अडगळ वाटायला लागली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर शक्यतो पडूचं नये, परंतु काही अत्यावश्यक कामानिमित्त उन्हात जाण्याची वेळ आल्यास *छत्री, टोपी,गॉगल, रुमाल* अशा वस्तूंचा वापर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जरुर करावा.
*दुपारच्या भोजनानंतर थोडी बसून विश्रांती घ्यावी . भोजनानंतर लगेच झोपणे टाळावे. दिवसा सहसा झोपूचं नये, परंतु ज्यांना अधिक थकवा जाणवतो अशा लोकांनी भोजनानंतर दोन अडीच तासानंतर थोडावेळ झोप घेण्यास हरकत नाही*
.
पंख्याखाली किंवा कुलर समोर सतत बसणे,
एसीचा सातत्याने वापर टाळावा.
सध्याचा काळामध्ये तसेच कोविद19 साथीच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदातील काही उपक्रम *रोग प्रतिबंधासाठी व आरोग्य रक्षणासाठी* निश्चितपणे करण्यासारखे आहेत.
*नस्य* -
रोज सकाळी आंघोळीनंतर तसेच
संध्याकाळी व रात्री झोपताना नाकाला आतून *तिळाचे तेल ,गावठी खोबरेल तेल* किंवा गाईचे तूप यापैकी जे उपलब्ध असेल त्याचे बोट फिरवणे किंवा नाकामध्ये 2- 2 थेंब तेल टाकणे याला *प्रतिमर्ष नस्य* असे आयुर्वेदामध्ये म्हटले आहे . नस्यामुळे नाकाच्या आतील त्वचेचे (mucus membrane) चे नस्यामुळे संरक्षण होते, त्याची प्रतिकारक्षमता वाढते, तसेच बाहेरून येणाऱ्या धूळ ,केरकचरा, जंतू यांना ,आत जाण्यापासून अटकाव केला जातो .
*गंडूष*-
*गंडूष म्हणजे गुळण्या करणे* .सध्याच्या कोविद19 च्या साथीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, सर्वांनी रोज गंडूष करणे फारच महत्वाचे आहे.
सकाळी व रात्री दात साफ केल्यावर गंडूष करावे .त्यासाठी *कोमट पाण्यात थोडी हळद, मीठ व थेंबभर साजूक तूप किंवा तिळाचे तेल* टाकुन गुळण्या कराव्या .गंडुषामुळे घसा, तोंड ,जीभ यांची शुद्धी होते , त्यांना आतून असणारा कफाचा चिकटा नाहीसा होतो व तिथे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते .ज्यांना सर्दी, घसदुखी ,खवखव ,
घशात अडकल्यासारखे वाटणे असे त्रास आहेत, त्यांनी तर गरजेनुसार दिवसातून 2 ते 3 वेळा गंडुष करावे.
*धूमपान व धूपन*-
*धूमपान म्हणजे औषधी धूर नाकाने ओढून तोंडाने बाहेर काढणे* यासाठी *वेखंड, सुंठ, ओवा, त्रिकटु* यासारखी औषधे वापरली जातात. वारंवार सर्दी होणे, नाक गळत राहणे, डोके कफ साठून जड होणे आणि घशामध्ये अडकल्यासारखे होणे, यासारख्या तक्रारी मध्ये धूमपानाचा उत्तम उपयोग होतो. कोरड्या खोकल्यावर, कोरड्या सर्दीमध्ये मात्र धूमपान करू नये .
आयुर्वेदात औषधे देण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत, जिथे पाणी,तेल,तूप,चूर्ण यातले काही पोहोचू शकत नाही , तिथे धूर पोचू शकतो. त्यामुळे
डोक्यामधील सूक्ष्मातिसूक्ष्म पोकळ्यात असलेले दूषित दोष काढून टाकण्यासाठी धूमपान केले जाते. यासाठी घरच्याघरी *धूमवर्ती* (धूर घेण्यासाठी वात) बनवता येते. ती कशी बनवावी यासाठी सुप्रसिध्द वैद्य सुविनय दामले, कुडाळ यांचा युट्युबवर असलेला व्हिडिओ अवश्य पहावा.
घरात घातला जाणारा धूप हा सामूहिक धूमपानाचाचं प्रकार आहे. औषधी वनस्पतींचा धूर घरामध्ये केल्यामुळे डास, चिलटे,रोगजंतू इत्यादी पळून जातात. घरातील सर्वांना त्याचा लाभ होतो.
भारतीय परंपरेतील यज्ञविधी, देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, तांदूळ आणि गाईचे तूप वापरून केले जाणारे अग्निहोत्र, किंवा मीठ ,मोहऱ्या ,मिरची यासारखी तीक्ष्ण द्रव्ये जाळून दृष्ट काढण्याची काढण्याच्या पारंपारिक पद्धतीतही, *वातावरण शुद्धी आणि आरोग्यरक्षणाचा* विचार प्रामुख्याने केलेला आहे.
सध्याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर घरात,कार्यालयात ,
सार्वजनिक ठिकाणी सकाळ ,संध्याकाळ कडुनिंब,करंज ,
भीमसेनी कापूर ,
ओवा ,वेखंड ,
हळद, लवंग ,मिरे अशा औषधी वनस्पतीनी धूपन करणे, वातावरण शुद्धीसाठी अतिशय उपयोगी ठरेल.
विहाराबद्दल अजूनही काही मुद्दे जाणून घेऊया *covid 19 आणि वसंत ऋतू* या लेख मालेतील पुढच्या शेवटच्या लेखात.
*वैद्य उर्मिला पिटकर*
मुंबई
MD.Ph D (Ayurved)
आयुर्वेद व्यासपीठ
कोकण विभाग अध्यक्ष
9820339548
No comments:
Post a Comment