Friday, July 1, 2022

विवाहकार्य जमवताना मंगळ पाहणे कितपत संयुक्तिक आहे ?

 विवाहकार्य जमवताना मंगळ पाहणे कितपत संयुक्तिक आहे ?(१)

           *विवाहकार्यात वधुवरांच्या पत्रिकांचे मेलन करताना पाहिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये मंगळ आणि नाडी यांचा आवर्जून विचार केला जातो. ज्योतिषशास्त्रावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांत मंगळाचा प्रकर्षाने उल्लेख केलेला आढळतो. जन्मकुंडलीत १, ४, ७, ८ व १२ या पाच स्थानात मंगळ ग्रह आल्यास ती मंगळाची कुंडली ठरते. एवढे सांगून झाल्यावर ज्योतिषशास्त्र थांबले असते, तरी बराच गुंता कमी झाला असता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरील एका नियमास सुमारे चारशे पन्नास अपवाद सांगून त्या मंगळाचा जाब देण्यात येतो. इतके करूनही एखादी कुंडली मंगळाची राहिलीच तर "गोदावरी दक्षिणतीर वासिनां भौमस्य दोषो न हि विद्यते खलु ।" असे देशतः अनेक अपवाद सांगून उरल्या सुरल्या कुंडल्यांचीही सोडवणूक केली आहे. असे असताना हे मंगळाचे शास्त्र कुणी कधी व कसे निर्माण केले, याचा पत्ता लागत नाही.*

           *वास्तविक मंगळापेक्षाही राहू, केतू, शनी इत्यादी एकाहून एक बलवान ग्रह असताना एकट्या मंगळाचा संबंध वैवाहिक जीवनाशी जोडून त्याची तथाकथित स्थानेही निश्चित करून ती स्थाने वैवाहिक जीवनास संघर्षकारक किंवा वैधव्यकारक म्हणूनही सांगून ठेवले आहे. मंगळाच्या अपवादातून एखादी कुंडली सुटलीच, तर वैधव्यकारक असे विधी सांगितलेले आहेत. आता प्रश्न असा उद्भवतो की, या सर्व व्यापातून सहिसलामत सुटल्यावर तरी निर्वेध वैवाहिक जीवनाची खात्री मिळते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे.*

            *कारण प्रखर, कडक मंगळ म्हणून वर्णन केलेल्या कुंडल्यांच्या काही वधुवरांचे संसार अगदी सुखाने चाललेले दिसतात. उलट मंगळाचा यत्किंचितही दोष नसताना व दोन्ही कुंडल्या एकमेकांशी पूर्णतया जुळलेल्या असूनही काही दिवसांच्या आतच काहींना वैधव्य किंवा विधुरत्व प्राप्त झालेले किंवा त्यांचा घटस्फोट झालेले दिसून येते. यावरून एक गोष्ट निर्विवाद ठरते की, ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र पाहण्याची पध्दत यामध्ये कुठेतरी मोठा घोटाळा किंवा त्रुटी असणे अपरिहार्य आहे. या सर्वांतून एक निष्कर्ष ठामपणे निघू शकतो की, वधु व वर यांचा विवाह जमविताना अन्य सर्व गोष्टींचा विचार होऊन सर्व गोष्टी जुळून आल्यावर खात्रीचा ज्योतिषी भेटला तरच पत्रिका दाखवाव्यात. अन्यथा वधुकडून उमाशंकरपूजनविधी व वैधव्यपरिहारक कुंभविवाहविधी करून घ्यावेत. विवाहापूर्वी दोन्ही पक्षांनी ग्रहयज्ञ करून घ्यावेत. त्यानंतर अवश्य विवाह करावा. पण केवळ पंचांगातील कोष्टकावरून गुणांची बेरीज करून, मूळ कुंडल्या न पाहताच, पत्रिका जमतात असे सांगणाऱ्या ज्योतिषाकडे जाऊन चांगली जमणारी स्थळे सोडून पश्चात्तापाचे धनी होऊ नये. (अपूर्ण)*

----------------------------------------------------------------------------------------


*🏵 विवाहकार्य जमवताना मंगळ पाहणे कितपत संयुक्तिक आहे ?(२)

           *हल्ली कुंडल्या पाहून तंतोतंत भविष्यसूचना देणाऱ्या ज्योतिषांची संख्या अगदी नगण्य झाली आहे. तशात जे काही थोडे ज्योतिषी बरोबर सांगतात, ते ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग न करता केवळ तर्क, व्यवहारज्ञान आणि थोडी अंर्ज्ञानसिध्दी या त्रयींचा उपयोग करतात. पण ते लोक जर पैशाच्या मागे लागून ज्योतिषशास्त्राचा धंदा म्हणून उपयोग करू लागले, तर ती सिध्दीही निघून जाते. अशावेळी मंगळाप्रमाणे नाडीचाही विचार करण्यात यावा. कारण एक नाडीमुळे संताननिर्माणक्षमता कमी होते असा ज्योतिषशास्त्राचा दावा आहे.*

           *अशा वेळी दोघांचीही प्रजनन क्षमता तपासून त्यांचा रक्तगट एकमेकांशी जुळणारा आहे किंवा नाही, हे सांगणे आता वैद्यकीय शास्त्राच्या कक्षेत बसणारे आहे. तेव्हा केवळ "एकनाडी" या दोषामुळे पत्रिका जुळत नाहीत, असे म्हणून ती गोष्ट निकालात काढण्यापेक्षा उपलब्ध आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा सल्ला घेणे कितीतरी फायद्याचे ठरते. पण याबाबतीत एखादी त्रिकालदर्शी महनीय व्यक्ती सल्ला देत असेल, तर तो प्रथम ऐकावा. पण हल्ली त्रिकालदर्शी तर नाहीच पण निरपेक्ष, वास्तव व शास्त्राधिष्ठित सल्ला देणाऱ्या व्यक्तींची संख्याही रोडावत चाललेली आहे.*

           *अशा वेळी नाडी आणि मंगळ या गोष्टींचा फाजिल बाऊ करून वैवाहिक कार्यात अनाठायी अडथळा आणणे म्हणजे या शास्त्रावरील विश्वास उडण्यास कारणीभूत होण्यासारखे आहे. शिवाय महत्प्रयासांनी जुळून आलेले विवाह मोडल्यामुळे अनेक अनर्थ व गुंतागुंती होणे अटळ आहे. जी गोष्ट नाडी व मंगळ यांच्या बाबतीत, तीच षडष्टकाच्या बाबतीतही लागू पडते. कारण ज्या राशी एकमेकांपासून सहा व आठ क्रमांकाच्या असतात ती षडष्टके होत. पण या जन्मराशी की चंद्रराशी याबद्दल अजूनतरी निश्चित अनुमान निघालेले नाही. शिवाय काही वेळा निरयन राशी तर काही वेळा सायन राशींच्या बाबतीत षडष्टकांचे नियम व संकेत लागू पडतात. त्यासाठी उत्कृष्ट उपाय म्हणजे वधुवरांनी निःसंकोचपणे संस्कृती, धर्म, सामाजिक बंधने, फँशन, आहार-विहार, नाती-गोती इत्यादी बाबतीत प्रश्नावली तयार करून एकमेकांशी किती प्रमाणात समझोता करावा लागेल याचा अंदाज घेऊन मगच पुढील पाऊल टाकावे. (पूर्ण)*

*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*

*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...