वडिलांची सेवा करण्याचे परमभाग्य ज्यांना लाभले ते भाग्यवान ! सांप्रत कलियुगात माणसे परस्परापासून दूर जात आहेत. नातेसंबंध विरळ होत आहेत. वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळी सांभाळणे हा विचार मागे पडत आहे. नातवंडात रमण्यात आजोबांना मिळणारा आनंद नष्ट होत आहे. कारण पोटची मुलेच त्यांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत. ज्यावेळी त्यांना आधाराची गरज असते त्याचवेळी ते निराधार होत आहेत. पितृभक्ती पाहणे दुर्मीळ झाले आहे. पण भक्त पुंडलिकास आपल्या वडिलांची सेवा करण्याचे परमभाग्य लाभले. पुंडलिकाच्या पितृभक्तीने प्रसन्न होऊन देव वैकुंठ सोडून पंढरीत विटेवर उभे राहिले.पितृभक्तीचा केवढा प्रभाव आहे! याचे वर्णन संत नामदेवराय करतात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
'पुंडलिकालागुनी म्हणे पांडुरंग ।
सखा जिवलग तूंचि माझा ॥ १ ॥
न पाहसी वास बोलसी उदास ।
सांडोनियां आस सर्वस्वाची ॥ २ ॥
वैकुंठ सांडोनि आलों तुजपाशीं ।
कां गा न बोनसी भक्तराया ।। ३ ।।
पितृभजनाचा जालासी अधिकारी ।
केली बा पायरी वैकुंठासी ।। ४ ।।
माग बापा काही आवडे ते घेई ।
मज वाटें हृदयीं घालावाची ॥५॥
नामा म्हणे देवा स्वामी मुगुटमणी ।
उभा कर ठेवुनी कटीवरी ।। ६ ।।"
(ना. गा. ३८९)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संत तथा भक्तशिरोमणी नामदेव महाराज या अभंगातून भक्त पुंडलिकाच्या पितृभक्तीचा प्रभाव कथन करतात. भक्त पुंडलिकास पांडुरंग परमात्मा म्हणाले, तूच माझा अत्यंत प्रिय सखा आहेस.अरे! तू सर्वस्वाची इच्छा सोडून कोणाची वाट पाहात नाहीस आणि उदासपणे बोलत आहेस. अरे! पुंडलिका! तुझ्याकरिता वैकुंठ सोडून मी तुझ्याजवळ आलो आहे आणि हे भक्तराया! तू मात्र का बरे माझ्याशी बोलत नाहीस? हे पुंडलिका! पितृभक्तीचा तू अधिकारी झालास आणि वैकुंठाची पायरी प्राप्त केलीस. हे पुंडलिका! माग तुला हवे ते, आवडेल ते मागून घे. मी तुझ्यावर कृपावंत आहे. मला तर वाटते तुला हृदयात साठवून ठेवावे. संत नामदेवराय म्हणतात ; हा माझा स्वामी मुकुटधारण केलेला, कटीवर हात ठेवून उभा आहे.
हा अभंग म्हणजे पितृभक्तीचा महिमा वर्णन करणारा आहे. पितृभक्तीचा केवढा मोठा लाभ पुंडलिकास प्राप्त झाला त्याचे वर्णन यात आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, “भक्तीचे भूषण मस्तकी धारण । करी नारायण स्वामी म्हणे ॥”
पितृभक्तीच्या सेवेने कृपावंत होऊन देव वैकुंठाचा त्याग करून भक्तीचे भूषण असणाऱ्या पुंडलिका साठी पंढरीत आला व जगताचे कल्याण करू लागला. “साधिती कल्याण जगताचें ॥" नमस्कार करणारा व नित्य वृद्धांची सेवा करणाऱ्याच्या चार गोष्टी वाढतात. आयुष्य, ज्ञान, यश, बल. "अभिवादनशीलस्थ नित्यं वृद्धोपसेविनः । चत्वारी तस्थ वर्धन्त आयुर्विद्या यशो बलम् ॥" याकरिता वृद्धसेवा सदैव करावी. पितृभक्ती करावी. “नामयाचा स्वामी भक्तीसी भुलला । पुंडलिक राहविला पंढरीये ।।" नाथ महाराज म्हणतात;
"विठ्ठल पुंडलिकासाठी । उभा राहिला वाळवंटी । कर ठेवूनिया कटी । भक्तासाठी अद्याप ।।"
पुंडलिकाने केली पितृभक्ती त्याने हरी प्रसन्न झाला । वैकुंठ सोडूनी आला पंढरीस विटेवरी स्थिरावला ॥
🙏 पुरूषोत्तम गं.निकते.
मो..नं.९४२००८८३०९
No comments:
Post a Comment