Sunday, June 26, 2022

' विनोद - एक लाइफ लाइन '

सुख-दु:खांच्या भावनेबरोबरच 'आनंद' ही दु:खशामक भावनाही आपल्या सर्वांना जन्मत:च उदंड लाभली असुन तो निर्भेळ आनंद मिळण्यासाठी सुखाबरोबरच विनोदालाही तितकेच महत्व आहे. निराश व एकाकी मनावर तर विनोद हा एक हुकमी उपचार आहे. विनोदाचे आपल्या आयुष्यातील महत्व शब्दातीत आहे व शिवाय तो आपल्या सर्वांच्या अवतीभोवती व्यंगचित्रे, हातवारे, मुकाभिनय, मार्मिक किंवा चपखल शब्दफेक, शाब्दिक चमत्क्रुती, द्व्यर्थी शब्दाचा वापर, अतिशयोक्ती, नकला, हजरजबाबिपणा, वात्रटीका, विडंबन, मस्करी, थट्टा, चेष्टा वगैरे माध्यमातून सतत वावरतही असतो. वेळ, काळ व स्थळाची तमा न बाळगता विनोद त्याला हवा तेंव्हा घडतच असतो. अशा सतत घडणार्या विनोदाला आपण हेरावा लागतो आणि त्यासाठी आपली विनोदबुध्दी सतत जागृत असायला हवी.


शब्दजन्य वा परिस्थितीजन्य विनोद हे एकांतात, दोघातीघात वा मोठ्या समुहातही घडत असतात. आपल्याला कळलेला वा आपण केलेला विनोद इतरांनाही कळला आहे ना याची चाचपणी करणे हा मनुष्यस्वभाव असुन त्यातुनच आनंद द्विगुणीत होत असतो. कितीही गंभीर वातावरण क्षणार्धात हलकफुलक करायची प्रचंड ताकद निकोप विनोदात असुन असा प्रत्यक्ष घडलेला विनोद चटकन मनाला भावतो व आप्तेष्टांशी लगेच शेअरही करावासा वाटतो. निकोप विनोदासाठी काही पथ्ये मात्र कटाक्षाने पाळावी लागतात उदा एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरचे भाष्य, उघड उघड अश्लीलता, तोच तो पणा वगैरे. अशी पथ्य पाळुन केलेले वा झालेले निकोप विनोद चिरंतन आनंद देतात. मराठी विनोदी साहित्यामधे पु ल, व पु, द मा मी यांचे साहित्य त्या दर्जाचे आहे.

विनोदाची जाण ही आयुसापेक्ष असते. दैनंदीन जीवनात हे जाणवते. बोबडे बोल संपायच्या बेतावर शाळेत जाणारी शिशु वर्गातील मुले एकमेकांशी काय बोलतात आपल्याला कळतच अस नाही पण संभाषणात विनोद घडून ती हसत असतात. जेष्ठांच्या बाबतीतही तसेच असते. रोजच्या प्रभात फेरीमधे जेष्ठांचेही बरेच हास्य विनोद चालु असतात. दोन अत्यंत विरळ केस असलेल्या जेष्ठ मित्रांनी तिसर्या जेष्ठ मित्राचा उल्लेख टी व्ही वा टकलु करुन हसताना मी पाहीले आहे. 

चित्रपट वा छोट्या पडद्यावर केवळ विनोदाच्या जोरावर प्रसिध्दी पावलेले बरेच आभिनेते आपल्याला माहीती आहेतच. आजकाल तर बहुतेक टी व्ही चँनेलवरचा स्टँड अप काँमेडी हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. ह्या सर्वातुन आपल्याला आपल्या दैनंदीन जीवनात विनोदाचे किती महत्व आहे हेच कळते.
 
तीस चाळीस वर्षे एकत्र काम केल्यावर सहाजीकच सहकार्याशी मैत्रीचे संबंध निर्माण होउन मस्करीचा अलिखीत हक्क प्राप्त होतो व त्यातुन असंख्य विनोदी प्रसंग निर्माण होउन कामाचा ताण सुसह्य होतो. जागेअभावी काहीं मोजकेच उल्लेखनीय किस्से नमुद करावेसे वाटतात :-

1. रोजच्या रोज कंपनीत कामावर जाउन घरी परतणे या प्रवासात सुमारे पन्नास कर्मचारी एकत्र असायचे. संध्याकाळी परतताना बरेच वेळा गावातल काम उरकण्यासाठी वाटेतल्या स्टाँपला आमच्या पैकी एक दोघे उतरायचे. ते उतरताना हमखास बसमधले तीघ चौघ एकमुखानी आवाज द्यायचे. काय, आज 'दुसरी' कडे का? 

         मलाही एकदा वाटेत उतरताना असा आवाज देण्यात आला. काय, आज 'दुसरी' कडे का? मी उतरता उतरता उत्तर दिले " हो 'पहिली' बरोबर 'दुसरी' कडे चाललोय. " अर्थातच बसमधे खुप हशा पिकला.
 
2. कंपनीच्या कँटीनमधे पूर्ण राईस प्लेटशिवाय, दुध व केळी वेगळ्या कौंटरवर मिळायची. माझ्याशी उगाचच ओळख वाढविणे किंवा कदाचित फिरकी घेण्याच्या निमित्ताने एका सुमार ओळखीच्या मुलाने कँटीनमधेच बाजुला घेउन मला सांगीतले " काल मला एक कुत्र चावलय. नक्की चावलय का दात चाटुन गेलाय, हे कळत नाहीये. तर, मी काय करायला पाहीजे?

         मी त्याला सोपा उपाय सांगितला. दुधाच्या कौंटरपाशी जा. दुध ग्लासमधे घ्यावस वाटल तर ठीक आहे. पण, बशीत घ्याव अस वाटल तर लागण झाली आहे अस समज.

३. जेवणाच्या सुट्टीत जेवण झाल्यावर आम्ही दोघ तिघ गप्पा मारत असताना अजुन एक जण आला आणि त्यानी माझ्याकडे बँकेतुन गृह कर्ज कसे मिळवायचे अशी चौकशी केली. मी त्याला तडक एफ सी रोडवरील बँकेला फोन लाउन दिला. त्याची फोनवर चौकशी चालु असताना मी मधेच त्याला सुचवल की नाँन रीफंडेबल लोन मिळेल का विचार. आणि त्यानी तस विचारल. बँक मँनेजर त्याच्यावर खूपच चिडला आणि आम्ही तीघ हसुन हसुन बेजार झालो.

         हा प्रसंग अजुनही एकांतात जरी आठवला तरी हसु लपउ शकत नाही.

४. व्यसंगचित्रातुनही विनोद चांगला साधतायेतो, सध्यपरिस्थीतीवर रोजच्यारोज मार्मिक र्व्यंगचित्र देउन आर के लक्षम्ण अख्या भारताला चाळीस वर्ष हसवत संदेश देत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शी द फडणीस आदींच्या व्यंगचित्रानी अख्या महाराष्ट्राला किती तरी वर्ष हसवले. भर पावसात बागेतील झाडांना पाणी घालणारा फडणीसांचा माळी आपल्याला आठवत असेल.

         असे अनेक किस्से सांगता येतील.

तात्पर्य

नेहमी भावनाशून्य आणि निर्विकार चेहरा करुन जगाच भवितव्य आपल्या हतात असल्याच दाखवण्यापेक्षा आपण अनुभवलेले वा ऐकलेले अनेक प्रकारचे विनोदी प्रसंग मनासमोर आणावे व शक्य असेल तितक्या समवयस्क लोकांबरोबर शेअर करावे. आपली विनोदबुध्दी सतत जागृत ठेवावी. त्यामुळे आपले मन आनंदी रहातेच व अवतिभोवतीचे आप्तेष्ठही आनंदीत होतात व वातावरण खेळीमेळीचे रहाते.

म्हणूनच म्हणतो विनोद ही एक लाईफ लाईन आहे! तिच्या अधीकाधीक वापराने जीवन अधिकाधीक समृध्द होईल.

प्रकाश तांबे
8600478883

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...