#आद्य_शंकराचार्यांचे हे श्लोक अतिशय अर्थपूर्ण व जीवनविषयक बहुमोल मार्गदर्शन करणारे आहेत..
कुणी एक रक्षक नगराच्या गल्लीबोळातून रात्रीच्या वेळी राखण करण्यासाठी हिंडत असताना "सावधान","जागे रहा"असं ओरडत व मार्गातील भूमीवर आपल्या हातातील दंड आपटीत चालत जात असे.
एका रात्री त्याला परगावी काही कामानिमित्त जायचं होतं म्हणून त्याच्या मुलानं ते काम हाती घेतलं.त्या मुलाला दैववशात् आपल्या पूर्वजन्मातील स्मृति..ज्ञान असल्यानं तो मार्गानं जाताना हे खाली दिलेले श्लोक मोठ्या आवाजात म्हणत जात असे ज्यामधे वारंवार जागे रहा.. सावध व्हा.. असे शब्द येत होते.
दुसर्या दिवशी सकाळीच तिथला राजा राखणदाराची वाट पहात त्याच्या दाराशी उभा असलेला त्यानं पाहिला..आणि आपल्या मुलानं काहीतरी कर्तव्यात कुचराई केली असं वाटून भीतीनं थरथरायला लागला.आता त्या कुचराईचं फळ संपूर्ण परिवाराला भोगावं लागणार आणि राजाच्या रागाला सामोरं जावं लागणार या विचारांनी तो अस्वस्थ झाला..
पण तसं तर घडलं नाहीच उलट त्या राजानं बहुमूल्य भेटवस्तु देऊन त्या परिवाराला सन्मानितही केलं व त्या मुलाचं खूप कौतुकही केलं..त्याची खूप प्रशंसा केली.इतकंच नाही तर त्या मुलाची खूप मोठ्या वेतनावर आपल्या राजप्रासादाच्या रक्षणार्थ नेमणूकही केली..
त्या मुलानं म्हटलेले ते मूळचे आचार्यविरचित श्लोक आणि त्यांचा यथामति पद्यबद्ध मराठीतला स्वैर भावानुवाद खालील प्रमाणे...
१.
माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धुः सहोदरः।
अर्थं नास्ति गृहं नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥
कुणी कुणाची नसते माता नसतो पिता कुणीही
भाऊ सख्खा जुळा चुलत वा नसे कुणास कुणीही
द्रव्य नसे वा घरहि कुणाचे ठसवा निजमनि नित्य
व्हा जागे व्हा जागे सावध जाणुनि अबाध्य सत्य
२.
जन्म दुःखं जरा दुःखं जाया दुःखं पुनः पुनः।
संसारसागरे दुःखं तस्मात् जाग्रत जाग्रत॥
दुःख जन्मता जन्मे,जन्मे वार्धक्यामधि दुःख
पहिली दुसरी असो कोणती पत्नी देई दुःख
अपार दुस्तर संसाराचा सागर भरला दुःखे
म्हणून जागा सावध राही दूर राखण्या दुःखे
३.
कामः क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठन्ति तस्कराः।
ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जाग्रत जाग्रत।।
चोरायास्तव ज्ञानरूप हे तुज जवळी जे रत्न
कामक्रोधलोभांच्या रूपे चोर करिति नित यत्न
नरदेही ते तिघेहि लपती शोधिति अचूक संधी
जागा राही टाक काढुनी देउ नको त्या अवधी
४.
आशया बध्यते जन्तुः कर्मणा बहुचिन्तया।
आयुः क्षीणं न जानाति तस्मात् जाग्रत जाग्रत।।
आशांनी करकचून राही जीव बंधनी विषयांच्या
सकाम कर्मे विषयचिंतने चिंतांनी सुखदुःखांच्या
नकळत जीवन सरते घटते क्षणाकणाने आयुष्य
नकोस दवडू पळही राही जागा ठरवी निजलक्ष्य
५.
सम्पदः स्वप्नसंकाशाः यौवनं कुसुमोपमम्।
विद्युच्चंचलमायुष्यं तस्मात् जाग्रत जाग्रत॥
वैभव लक्ष्मी धन संपत्ती स्वप्नासमची मिथ्या
कोमल पुष्पासम तारुण्यहि टाकी क्षणात काया
क्षणभंगुर आयुष्य विजेसम म्हणून सावध राही
जागा होई सत्वर मनुजा झोप हितावह नाही
६.
क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं जीवितमावयोः।
यमस्य करूणा नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥
क्षणजीवी धन,मनही चंचल,जीवन तवमम तैसे
दावी करुणा दया न यम तो कठोर निष्ठुर बैसे
कणक्षण व्यर्थ नये बा दवडू साधावे हित अपुले
सावध होई जागा राही विषयांनी ना होइ भले
७.
यावत् कालं भवेत् कर्म तावत् तिष्ठन्ति जन्तवः।
तस्मिन् क्षीणे विनश्यन्ति तत्र का परिदेवना॥
जोवरि उरती कर्मभोग वा उरे जोवरी क्रियमाण
तोवरि केवळ जीव राहतो धरतीवर धरुनी प्राण
क्षणात ज्या ते भोग संपती,कर्तव्ये ना मुळि उरती
देह सोडुनी जीव जातसे क्षणीच त्या निजगृहाप्रती
कोण कशास्तव प्रलापशोका करी तयांच्या मागे
व्यर्थ निरर्थक ठरेच बघ ते कुणी कुणाचा नच लागे
- आ. श्री. श्रीपाद केळकर. (कल्याण)
No comments:
Post a Comment