Thursday, June 30, 2022

तीर्थयात्रा करण्यामागे उद्देश काय ? तीर्थयात्रेचा विधी कोणता ?

 तीर्थयात्रा करण्यामागे उद्देश काय ? तीर्थयात्रेचा विधी कोणता ?

 सामान्यतः कोणकोणत्या यात्रा महत्वाच्या आहेत ? 


           काहीजण सोमनाथ, मल्लिकार्जुन (श्रीशैल), महाकाल (उज्जैन), ओंकारेश्वर, वैद्यनाथ (परळी), भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ (औंढ्या), विश्वेश्वर (वाराणशी), त्र्यंबकेश्वर (नाशिक), केदारेश्वर, घ्रूष्णेश्वर अशा बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात. काही देवीभक्त साडेतीन शक्तिपीठांची यात्रा करतात. महाराष्ट्रातील रेणुका (माहुरगड), महालक्ष्मी (करवीर), सप्तश्रूंगनिवासिनी (वणी), व भवानी (तुळजापूर) व महाराष्ट्राबाहेरील काली (कलकत्ता), वैष्णोदेवी (हिमालय), कामाक्षी (आसाम), गोव्यातील शांतादुर्गा, आर्यादुर्गा, महालसा, महाकाली, इत्यादी शक्तिस्थाने, दक्षिणेतील मीनाक्षी (मदुराई), अन्नपूर्णा (वाराणशी), अशा शक्तिस्थानांची यात्रा करतात. भारतातील शक्तिस्थानांची जंत्री करणे अत्यंत अवघड काम असून त्या सर्वांचे दर्शन करणे कठीण आहे. म्हणून महत्त्वाची शक्तिस्थाने घेतली जातात.

           काही लोक वेंकटगिरी, गुरुवायूर, मंत्रालय, रायरी, पंढरपूर अशी विष्णूस्थानांची यात्रा करतात. काही दत्त पंथी व गुरुमार्गी लोक गिरनार, पीठापूर, कुरवपूर, कारंजा, औदु़बर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट इत्यादी दत्तक्षेत्रांची यात्रा करतात, तर काहीजण आधुनिक काळात होऊन गेलेल्या सत्पुरुषांच्या स्थानास जाऊन येतात. काही गणेशभक्त आपापल्या प्रांतातील अष्टविनायक यात्रा यथाशक्ती व भारतातील अष्टविनायक यात्रा करतात. काहीजण अयोद्या, मथुरा, गया, काशी, कांची, अवंतिका व द्वारावती अशा मोक्षपुऱ्यांची यात्रा करतात. काही कृष्णभक्त मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ या कृष्णस्थानांची यात्रा करतात.

           हल्ली यात्रा व सहली आयोजित करणारी अनेक मंडळे असतात. इच्छेनुसार कमीत कमी व जास्तीत जास्त तीर्थस्थळांचा समावेश होईल, अशा यात्रा आयोजित केल्या जातात. पण अशा यात्रांमध्ये धार्मिक वातावरण कमी असते आणि मनोरंजन व पर्यटन हाच मुख्य उद्देश असतो. म्हणून यात्रेचा खरा अर्थ व महत्त्व जाणून घेऊन वैयक्तिक यात्रा केल्यास त्या परमार्थास अधिक लाभदायक होतात. यात्रेस निघण्यापूर्वी एक दोन दिवस अगोदर आपल्या घरी घ्रुतश्राध्द करावे. श्रीपरमेश्वरप्रीतिकामः (पितृमुक्तिकामो वा) (अमुकप्रायश्चितार्थ वा) अमुकतीर्थयात्रा करिष्ये । असा संकल्प करून गणेश, ब्राम्हण, साधुसंतांचे पूजन करून वडील माणसांची अनुज्ञा घेऊन यात्रेस प्रारंभ करावा.

           घराच्या बाहेर पडल्यावर जसेजसे दूर जावे, तसेतसे आचारपालनात अडथळे अधिकाधिक येऊ लागतात. म्हणून सवलती जरूर घ्याव्यात, पण आचारभ्रष्टता न येईल याची खबरदारी घ्यावी. दररोजचे आन्हिक करणे कठीण जाते, पण कमीतकमी आवश्यक ते आन्हिक अवश्य करावे.

           यात्रेच्या प्रवासाच्या वेळी कळत नकळत दोष घडणे अपरिहार्य असते. अशा वेळी विवेकबुध्दी ठेवून कमीतकमी दोष घडण्याकडे प्रवृत्ती ठेवावी. यात्रेहून आल्यावर दधिश्राध्द करावे. गंगापूजन, मावंदे, ब्राम्हणसुवासिनीभोजनादि विधी करावेत. त्याचबरोबर यात्रेत घडलेल्या दोषांच्या परिहारार्थ पंचगव्यप्रान, सर्वप्रायश्चितार्थ गायत्र्यादि मंत्रांचा जप अवश्य करावा.

           अशाप्रकारे व धर्मबुध्दी मनी बाळगून जाणतेपणाने तीर्थयात्रा केल्यास त्या निश्चितपणे फलदायी ठरतात. पण केवळ पर्यटन म्हणून केलेल्या व नेणतेपणाने केलेल्या यात्रा परमार्थास उपयुक्त ठरण्याऐवजी वृथाभिमान वाढविण्यास कारणीभूत ठरतात. (पूर्ण)

संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.


0000


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...