एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले.
तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला.
तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले, परंतु शिव हेच ब्रह्मस्वरूप आहेत, असे महामुनींनी सांगितलेले दोन्ही देवांना पटले नाही, मग पुन्हा ते ‘चार वेद’ यांच्याकडे गेले, तेथेही अशाच उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून ओमकार स्वरूपिणी त्रिपदागायत्रीकडे गेले.
या त्रिपदा गायत्रीने हेच उत्तर दिले. त्यानंतर श्री शंकरांनी त्यांचे स्वर्गात असलेले शिर आणि पाताळात असलेले पाय अनुक्रमे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शोधण्यास पाठविले यासाठी दोन्ही देवतांनी अथक प्रयत्न केला.
पाताळात पाय शोधीत असता श्रीविष्णूंना गणपती दिसले. पण ते ध्यानस्त बसले होते. त्यांना श्रीविष्णूंनी पायाबाबत विचारले असता गणपती म्हणाले,
‘आपण एवढी भ्रमंती केल्यावर तुम्हाला कुठे ब्रह्मांड दिसले; तरी अशी अनंत कोटी ब्रह्मांडे श्री शंकराचे चरणी असल्याने त्यांचे असे वेगळे अस्तित्व दिसणार नाही.’
असे सांगितले ते विष्णूंना पटले व मान्यही झाले. मात्र स्वर्गात ब्रह्मदेव शिर शोधण्यासाठी अथक प्रयत्न करताना सतत गुणगुणत होते मीच ब्रह्म आहे व मीच श्रेष्ठ आहे.
दरम्यान, ब्रह्मदेवांना तिथे गाय आणि केतकी (केवडय़ाचे झाड) भेटले. त्यांना ब्रह्मदेवांनी आपल्याकडे वळवून शंकराचे शिर दिसले असे खोटे सांगण्यास प्रवृत्त केले. यानंतर मग स्वर्गात विष्णू, ब्रह्मदेव, गाय व केतकीसह आले.
त्यानंतर विष्णूंनी सांगितले की, ‘मला पाताळात पाय दिसले नाहीत. मात्र ब्रह्मदेवांनी धारिष्टय़ दाखवून खोटेपणाने मला स्वर्गात शिर दिसले आणि यासाठी साक्षीदार म्हणून गाय आणि केतकी यांना आणल्याचे सांगितले.’
यानंतर शंकरांच्या साक्षी तपासणीत गाय व केतकी यांच्या साक्षी खोट्या ठरल्या, मग शंकर क्रोधायमान झाले त्यांनी खोट्या साक्षीबद्दल गायीला शाप दिला की,
‘तुझे मुख नेहमीच अशुद्ध आणि अपवित्र राहील, मात्र तुझे दर्शन पाठीमागून घेतील.
तसेच केतकीला सुद्धा शाप दिला तुझ्या अंगावर पानोपानी काटे असतील तुझ्या केवडय़ाच्या कळीच्या पानांनी माझी पूजा केली जाणार नाही.
तू मला म्हणजे शंकर, महादेव व भैरवनाथ यांना नेहमीच निषिद्ध राहशील.’
याप्रमाणे आजही गायीचे दर्शन मागून घेतात व केवडय़ाच्या कळीचे पान शंकरादी देवांना वाहिले जात नाही.
यानंतर शंकराचे लक्ष्य ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ते पुन्हा अतिक्रोधायमान झाले. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या जटेमधून एक केस उपटला आणि सिद्ध भैरवनाथ प्रकट झाले.
याच दरम्यान ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखातून शंकराची निंदानालस्ती सुरूच होती. याबद्दल ब्रह्मदेवाला शासन व्हावे म्हणून सिद्ध भैरवानी त्वरित तलवार उपसून ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले.
तेव्हापासून ब्रह्मदेवाला चार शिरे राहिली. ब्रह्महत्येचे कालभैरवाकडून पातक घडल्याने ते पापशासन व्हावे म्हणून तो काशीला निघाला.
पाताळात मर्त्यलोकांत- वैकुंठ लोकांत तीर्थयात्रा करून सुद्धा पापक्षालन झाले नाही;
परंतु ब्रह्मदेवाचे तुटलेले शिर कालभैरवाच्या हाताला चिकटलेले होते. मात्र पवित्र काशी गंगेत स्नान केल्यावर ते शिर खाली पडले आणि कालभैरवाची ब्रह्म हत्येच्या पातकामधून मुक्तता झाली आणि मग शंकरांनी त्यांना चौसष्ट गणांचा अधिपती आणि काशीचा रक्षक (कोतवाल) नेमले.
शिवाच्या तेजापासून निघालेली शक्ती ही योगेश्वरी (जोगेश्वरी) ही कालभैरवाची पत्नी मानली जाते.
कुलदैवत, उपास्य दैवत, ग्रामदैवत असे तीन प्रकार कालभैरवाचे असून त्या त्या घराण्यात भैरी भवानी (भैरवनाथ, भवानीमाता) अशी असून त्यांची नित्यनेमाने पूजा-अर्चा होत असते. कालभैरव भूतपिशाच्च करणी इ.पासून तात्काळ मुक्ती देतो. कालभैरवाचे प्रथमदर्शनी विक्राळ रूप पाहिले असता भीतीदायक, भयावह, उग्र, क्रोधदायक वाटते. पण हेच कालभैरव लवकर प्रसन्न पण होतात !
No comments:
Post a Comment