व्रतांचे प्रकार कोणते आहेत ? त्यातील किती व्रते अत्यावश्यक आहेत व किती ऐच्छिक आहेत ?
हिंदू धर्माचा गाभा हाच मुळी व्रतवैकल्यात्मक आहे. वर्षाचे बाराही महिने व त्यातीर ऐंशी प्रतिशत तीथ्या व्रतांशी निगडित आहेत. या व्रतवैकल्यामागे धर्यशास्त्रकारांचा प्रधान हेतू म्हणजे व्रत आचरण करणाऱ्या व्यक्तीचे, म्हणजे व्रतीचे निसर्गाशी येनकेनप्रकारेण नाते जोडले जावे. निसर्गाप्रमाणेच समाज, कुटुंब आणि ईश्वर या घटकांशीही जवळीक साधून संसारकर्तव्य करता करताच आत्मोध्दार साधता यावा, यासाठी वर्षातील सर्व व्रतवैकल्ये एका विशिष्ट पध्दतीने बसविलेली आहेत.
व्रतांचे ढोबळ मानाने नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन प्रकार पडतात. नित्य व्रतांना पर्याय नसतो. गृहस्थाश्रमास शुध्दपक्षातील एकादशी हे नित्य व्रत आहे. संकष्टचतुर्दशी प्रदोष इत्यादी नैसर्गिक व्रते होत. अनंत, रामनाम, ऋषिपंचमी इत्यादी काम्य व्रते होत.
काम्यव्रतांमध्येही धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थावर आधारित चार प्रकार पडतात. केवळ पुण्यसंपादन करून चित्तशुध्दीसाठी केलेली व्रते धर्मसंपादन करून देतात.
रामनाम व्रत ग्रहण हे असेच धर्मपुरुषार्थ प्राप्त करून देणारे नैसर्गिक व्रत आहे. याखेरीज भागवत सप्ताह, चातुर्मासातील अन्य काही व्रते काम्य व्रतात मोडतात. अनंत, कोजागरी, वरदलक्ष्मी इत्यादी व्रते अर्थपुरुषार्थ प्राप्त करून देणारी नैसर्गिक व्रते होत. शनिप्रदोषासारखी व्रते कामपुरुषार्थ प्राप्त करून देणारी नैसर्गिक व्रते होत व हरिवंशश्रवण, गुरुचरित्रवाचन इत्यादी कामपुरुषार्थप्रापक काम्य व्रते होत. नैसर्गिक व्रते वर्षातील ठराविक तिथीलाच आचरण करता येतात, पण काम्य व्रतांसाठी योग्य मुहूर्त व दिनशुध्दी पहावी लागते. सोळा सोमवारव्रत अशाघ व्रतांपैकी आहे. ते मोक्षपुरुषार्थ प्राप्त करून देणारे काम्य व्रत आहे. तसेच पुत्रप्राप्ती करून देणारेही काम्य व्रत आहे. तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात उद्भवलेला संकल्प नेमका कोणत्या पुरुषार्थाशी निगडीत आहे, हे पाहून मगच व्रताचा प्रकार व ग्राह्यता ठरवावी. पुरुषार्थाशी संबंध पाहिल्यावर ते वर्षातून पुन्हापुन्हा येणारे आहे, की केव्हातरी येणारे आहे, यावर हे नित्य आहे किंवा नैसर्गिक आहे हे ठरते.
पंचांगात नोंद नाही, पण चांगल्या दिवशी सुरुवात करता येणारी व्रते काम्य या सदरात मोडतात. वास्तविक व्रतांची रचना करताना धर्मशास्त्रकारांनी इतका काटेकोरपणा दाखविला आहे की, व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीला मोक्षमार्गप्रापक एक सद्गुरु व आपल्या इष्ट-आराध्य दैवत यांच्या भक्तीखेरीज अन्य कोणताही मार्ग अवलंबविण्याची गरज नाही. कोणतेही संकट वा महासंकट आणि कोणतीही कामना वा महाकामना परिपूर्ण करण्यास आपल्या सद्गुरूने सांगितलेल्या व्रताचरणासारखा अन्य मार्ग नाही. म्हणूनच गुरुचरित्र ग्रंथात सद्गुरूंच्या मुखातून आलेली म्हणजेच सद्गुरुने निरोपिलेली व्रते करून त्यांच्या भक्तांना इहपर कल्याण प्राप्त झालेले दिसून येते.
समाजात तथाकथित मार्गदर्शन करणारे म्हणजे चुकीचा मार्ग दाखवून दिशाभूल करणारे महंत, बुवा इत्यादी लोक व्रताचरणाचा उपदेश वा सल्ला न देता केवळ पुड्या, अंगारे, इत्यादी देऊन समाजाला चुकीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे संचित, प्रारब्ध, क्रियमाण या कशाचाही निरास न होता तात्पुरती बधिरता येऊन माणूस आनंदी होतो, पण नंतर त्याच्या लक्षात येते की, आपले संकटही दूर झालेले नाही, व मनोकामनाही पूर्ण झालेली
नाही.
No comments:
Post a Comment