Sunday, June 26, 2022

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे....

1) अंबाबाई मंदिर :*

 लखुबाई मंदिरापासून जवळ नदीच्या काठावर उत्तरेकडे हे मंदिर आहे. 1854 साली या मंदिराचा जीर्णोध्दार लिंबा नावाच्या नर्तकीने केला. असा उल्लेख सापडतो. मूळ हे मंदिर सिदु कोळी यांनी बांधले. पुढे हे मंदिर बडवे समाजाच्या ताब्यात गेले. या मंदिरात महिषासुरमदिंनी देवी अंबामातेची अत्यंत सुंदर, रेखीव, आकर्षक अशी 2॥ ते 3 फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व नवरात्रात देवीदर्शनासाठी इथे गर्दी होते. नवरात्रात रोज नवनवीन प्रकाराने पूजा बांधली जाते. आरास केली जाते. अष्टमीस होम केला जातो. मंदिरासमोर दीपमाला व विटेचे अग्निकुंड आहे.
*2) व्यास मंदिर :*
 अंबाबाईचे मंदिराशेजारी पटांगणाच्या उत्तरेस रामबागेच्या समोर हे मंदिर आहे. आतील मूर्ती खूपच सुंदर आहे. हे मंदिर ज्योतीपंतदादा महाभागवत यांनी बांधले, असा एका ठिकाणी संदर्भ सापडतो. पूर्वी इथे भागवताची पारायणे होत असत. गुरुपौर्णिमा व पौष मासातील प्रत्येक रविवारी असंख्य लोक इथे दर्शनास येतात.
*3) त्र्यंबकेश्वर मंदिर :*
 विठ्ठल मंदिराजवळ रोकडोबा वेस (हरिदास वेस) कडे जाताना हे मंदिर आहे. जवळच कुंडलतीर्थ आहे. पूर्वी या मंदिराजवळ संस्कृत पाळशाळा होती. या मंदिरात सभामंडप व व्यासपीठ (गर्भगार ) असे दोन भाग आहेत. इथे महादेवाची मोठी पिंड आहे. त्यावर पितळी मुखवटा बसवला जातो. रोज दोन वळा 'श्री'ची पूजा केली जाते. महाशिवरात्र व श्रावणातील सोमवारी इथे उत्सव असतो.
*4) पंचमुखी मारुती मंदिर :*
 थोरल्या दत्त घाटा - (विप्र घाटा) जवळच हे छोटे मंदिर आहे. मूर्ती 7 फूटांची आहे. मूर्तीस पाच मुखे आहेत. एक हात कामरेवर आहे. दुसरा आशीर्वाद स्वरुपाचा आहे. येथील पूजा-अर्चा बैरागी पाहतात. हनुमान जयंतीस असंख्य बैरागी एकत्र जमून उत्सव साजरा करतात.
*5) काळभैरव मंदिर व शाकंबरी मंदिर :*
 श्रीविठ्ठल मंदिराजवळ महाद्वारात खाजगी इमारतीमध्ये हे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती सुंदर आहे. मूर्तीचे एक हातात डमरु, गळयात माळ, कानात कुंडले, मस्तकी मुकुट आहे. शेजारी सेवकांची चित्रे आहेत. एक बाजूस जोगेश्वरीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीशेजारी शिवलिंग आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी भैरवतीर्थ होते, तलाव होता. तलावाचे चारी बाजूस काळभैरव, महादेव, गणपती व बनशंकरी (शाकंबरी) देवतांच्या मूर्ती होत्या. स्नानगृहे होती. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात या मंदिरावर हल्ला झाला. इथले दगड निझामाच्या आधिपत्याखाली असलेल्या परांडा गावी नेण्यात आले. इ.स. 1770 साली कोंकणे या सावकाराने काळभैरव मंदिर बांधले. या मंदिराजवळ श्रीबनशंकरी (शाकंबरी) देवीचे सुंदर मंदिर आहे. इथे चैत्रात भैरव अष्टमीला काळभैरव जयंती उत्सव होतो, तर पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीकडील उत्सव होतो. याच भागात आत सराफकट्टा आहे. इथे असलेल्या श्रीगणेशमूर्तीचे रस्तारुंदीकरणाच्या वेळी स्थलांतर झाले. शांकबरी देवीचे मंदिर प्राचीन आहे. या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक मूर्ती शाकंबरीची आहे 2॥ फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीला 4 हात आहेत. एका हाती डमरु, दुसऱ्या हाती तलवार आहे. एक हात मांडीवर आहे व एक आशीर्वादात्मक आहे. गळयात अलंकार आहेत. 1775 साली अगनळ यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. या दोन्ही मंदिरांची व्यवस्था बडवे समाजाकडे आहे.
*6) मल्लिकार्जुन मदिर :*
 श्रीविठ्ठल मंदिराच्या पूर्वभागत महाद्वारात हे प्राचीन व भव्य मंदिर आहे. गर्भागार व सभामंडप असे मंदिराचे दोन भाग आहेत. बांधकाम दगडी आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात एका बाजूस गणपतीची मूर्ती आहे. शेजारी 5 फडयांच्या नागाची दगडी प्रतिकृती आहे. मध्यभागी पितळेच्या नंदी आहे. गर्भागारात श्री मल्लिकार्जुनाची भव्य अशी शाळुंका आहे. मूळ मंदिर छोटे होते. संत नरहरी सोनार याच महादेवाची उपासना करीत असे. त्यानेच या मंदिराचा विकास केला.
*7) होळकरांचे राममंदिर :*
 महाद्वार घाटावर, चंद्रभागेच्या तीरावर हे रामंदिर आहे. मंदिर व इमारतीचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. मंदिराचा सभामंडप 60X28 फूट आहे. गर्भागार थोडे उंचावर आहे. व्यासपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत. 'शेजारी आहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती उभी आहे. अहिल्याबाई शिवभक्त होत्या म्हणून मंदिरात शिवलिंगसुध्दा आहे. चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. येथील व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.
क्रमश....
*8) श्री. द्वारिकाधीश मंदिर (श्रीमंत शिंदे सरकार वाडा ) :*
 महाद्वार घाटावरच भव्य, दगडी तटबंदी असलेले श्री द्वारिकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते. मंदिराला चार भव्य दरवाजे आहेत. देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील श्रीद्वारिकाधीशा (मुरलीधर)ची शाळीग्रामची मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. मस्तकी चांदीचा मुकुट

आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वालियरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर व वाडयाच्या बांधकामाच्या भक्कमपणाची परीक्षा पाहण्यासाठी वाडयावरुन हत्ती फिरवले गेल्याची कथा सांगितली जाते.
*9) ताकपिठे विठोबा मंदिर :*
 श्रीविठ्ठल मंदिराचे पिछाडीस पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर हे प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे. यात्रा काळात गर्दीमुळे मुख्य मंदिरातील श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर भाविक वैष्णवभक्त इथे येऊन दर्शन घेतात. येथील व्यवस्था महाजन बडवे यांच्याकडे आहे.
*9) गोपालकृष्ण मंदिर :*
 एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस उत्सव होतो व दहीहंडीचा कार्यक्रम होतो. या मंदिराच्या मागील बाजूस श्रीविठ्ठल मंदिराकडे मुख करुन बसवलेली श्रीगजाननाची पितळी मूर्ती आहे. भाद्रपद महिन्यात या ठिकाणी दहा दिवस धार्मिक कार्यक्रम होतात.
*9) काळा मारुती मंदिर :*
 प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका गरीब ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
*10) नामदेव मंदिर :*
 प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे. मंदिरात संत नामदेवांची पुण्यतिथी हा मंदिरातील मुख्य उत्सव आहे
*11) श्रीधर स्वामी समाधी मंदिर :*
 कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली. आजही या ग्रंथांचे घराघरांत वाचन, पारायण केले जाते. माघ महिन्यातील वद्य पंधरवडयात तृतीयेस श्रीधरस्वामींची पुण्यतिथी उत्सव, धार्मिक कार्यक्रम करुन साजरा करतात.
*12) श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर :*
 प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो.
याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.
सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. याचे व्यवस्थापन मारवाडी समाजाकडे आहे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...