*'उंबर आहे जिथे तिथे दत्तगुरूचा वास असे 'असे हिंदूधर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आले आहे.*
*गालाच्या विविध विकारावर - उंबराचा चीक गालासाठी मोठे औषध आहे. लहान मुलांचे गाल सुजले असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावतात ज्यामुळे सूज कमी होते.*
*शरीरातील कोणत्याही गाठीवर - आपल्या शरीरात जर कुठे गाठ आली असेल तर अशा कोणत्याही गाठीवर उंबराचा चीक लावला तर गाठ बसून तिचा निचरा होतो.*
*लहान मुलांना आव झाली असता - लहान मुलांना अनेकदा आव होते. या आवेवर उंबर उपयुक्त आहे.*
*उंबराच्या चिकाचे पाच-सहा थेंब साखरेतून त्या लहानग्याला खाण्यास द्यावे, लगेचच आव थांबते.*
*उष्णतेने तोंड आले असता - उष्णतेने तोंड आले असता उंबराच्या पानावर आलेल्या फोडांचा उपयोग करावा. उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी करावी. आणि त्यात थोडा मध व खडीसाखर घालून ज्याचे तोंड आले असेल त्याला ती चाटण्यास द्यावी. जर तोंडाचा दाह जास्त होत असेल तर दिवसातून दहा-बारावेळा हे चाटण चाटवावे. तोंड आलेले जाते.*
*अंगातील कडकीवर - कोणत्याही प्रकारच्या कडकीवर उंबराची फळे खायला देतात. चांगली पिकलेली उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेबरोबर खावीत. सर्व प्रकारची कडकी बरी होते.उंबराच्या मुळाचे पाणी मिळाल्यास अंगात कडकी राहात नाही.*
*सतत तहान-तहान होत असेल तर तृष्णा थांबविण्यासाठी उंबराची साल अगर कच्ची फळे पाण्यात उगाळून त्याचे चाटण द्यावे. यामुळे तेलकट खाऊन अगर तापामुळे जर का तहान लागत असेल तर तीही थांबते.*
*डांग्या खोकल्यावर - डांग्या खोकल्यावर उंबराचा चीक टाळूवर लावावा. लगेच खोकला ताबडतोब थांबतो.*
*उपदंश किंवा गर्मीवर - उपदंश म्हणजेच गर्मीवर उंबराची पिकी फळे पाण्यात उगाळून चाटण द्यावे.*
*किडनी स्टोनवर - उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला सायंकाळी खाच द्यावी. त्यातून रस जिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे झाडाला लावून ठेवावे. सकाळी उठल्यावर उंबराचे ते औषधी जल जे साचते. ते प्यावे. असे काही दिवस नियमित केल्यास किडनी स्टोनचा विकार होत नाही.*
*लघवीच्या जागी आग, तिडीक मारणे, लघवीला ठणका, लघवीच्या जागेवरील व्रण इत्यादी तक्रारींवर उंबराच्या सालीचा काढा करून तो घेतल्यास त्वरित बरे वाटते. 40 ग्रॅम उंबराच्या सालीचा 1 लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवून त्यात खडीसाखर घालून दोन वेळा एक चमचा काढा घ्यावा.*
*गोवर कांजिण्यात - गोवर कांजिण्या ह्या उष्णताजन्य रोगात उंबराचा काढा सकाळ -संध्याकाळ एक छोटा चमचा घ्यावा. जुन्या उंबराच्या झाडाचे खोड सायंकाळी कापून त्यातून रस झिरपेल अशी खाच पाडावी आणि रात्रभर भांडे लावून ठेवावे. उंबराचे औषधी जल साचते. ते प्यायले असता उष्णतेचे विकार कमी होतात.*
*सर्व रोगांवर उपयुक्त उंबराचे सत्व - उंबराचे सत्व काळजीपूर्वक करावे. हे सत्व करण्याची कृती अशी, 5 किलो उंबराची पाने घ्यावीत ती स्वच्छ धुऊन चटणीसारखी बारीक वाटावीत. नंतर 20 लिटर पाण्यात ही चटणी मिसळून ते मिश्रण 10 लिटर शिल्लक राहील एवढे उकळवावे. नंतर गाळावे. आता गाळलेले पाणी परत उकळवावे. ते दाट होईपर्यंत सतत ही क्रिया करावी.*
*ह्यालाच रसक्रिया म्हणतात. हे उंबराचे सत्व, नाडीव्रण, भंगदर, कोणत्याही प्रकारचा व्रण असो वा सूज, तरी मुकामार लागला किंवा शरीरात नको त्या अवघड जागी गाठ आली तसेच गंडमाळा, कंठमाला यासारख्या रोगांचा निचरा या उंबराच्या सत्वाच्या लेपाने होतो. त्याची पट्टी अथवा लेप लावून वर कापूस लावावा. या सत्वाची गोळीदेखील अत्यंत गुणकारी आहे. तोंडात उष्णतेमुळे लालसरपणा व जखमा अथवा फोड आहे असतील तर उंबरसत्वाची गोळी तोंडात धरावी.हळूहळू चोखावी. यामुळे तोंडाचे उष्णतेचे विकार बरे व्हायला मदत होते.*
*व्रणशोथ, मुकामार, पापणीच्या सुजेवर, दंतरोगावर मूत्रविकारावर - उंबरापासून आयुर्वेदात एक गुणकारी व योग्य औषध तयार केले जाते. त्याचे नाव औदुंबरामृत. ते कसे तयार करतात?*
*औदुंबरामृताची कृती : उंबराची हिरवी, कोवळी पाने चार किलो स्वच्छ धुवून बारीक कुटावीत. ही 64 लिटर पाण्यात उकळावी, 16 लिटर पाणी राहिल्यावर स्वच्छ कपड्यात तयार झालेला कषाय गाळून घ्यावा. चोथा फेकून द्यावा. परत आठ लिटर राहीपर्यंत कषाय उकळावा. हा कषाय घमेल्यात काढावा. हे घमेले एका मोठ्या गंजात पाणी टाकून त्यात 4/6 विटा ठेवाव्यात. त्या विटांवर हे कषाय असलेले पातेले ठेवून गंजाखाली विस्तव चालू करावा.*
*गंजातील पाण्याची पातळी घमेल्याच्यावर जाऊ देऊ नये. गंजातील पाण्याच्या वाफेमुळे घमेल्यातील काढा अवलेहाप्रमाणे घट्ट होत आल्यावर घमेले उचलून घ्यावे. घमेल्यातील औषध थंड झाल्यावर त्यात टाकणलाहीचे चूर्ण 25 ग्रॅम घालावे व चांगले ढवळावे. नंतर स्वच्छ अशा बरणीत मिश्रण घालून ठेवून द्यावे. म्हणजे उंबराची रस क्रिया पूर्ण होते.ही सर्व कृती योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावी म्हणजे औदुंबरामृत अचूक होईल व त्याचे औषधी गुणही अबाधित राहतील.*
No comments:
Post a Comment