तो तसं वागला, ही अशी बोलली..
अनेक तक्रारी, भयंकर मनस्ताप, धुसफूस, तगमग..
सुखाच्या लहरी, अपमानाचे कढ , दुःखाचे घाव ..
कुठे इमेज सांभाळायची असते ,
कुणाचं तरी मन सांभाळायचं असतं ,
कधी वावरताना भान जपायचं असतं ,
कधी तरी आत्मकोषात लपायचं असतं..
आपण प्राधान्य देत जातो नेहमीच.. कधी व्यक्तींना, कधी परिस्थितीला..पण हे करत असतांना स्वतःचं मन जपतो का आपण..?
एक आयुष्य..
एकच मन..
काय खरं काय खोटं
कोण लहान कोण मोठं..
कोण ठरवणार..
इथे रहायचंय कुणाला कायम..?
आयुष्याची ओंजळ आठवणींच्या फुलांनी भरून , सुगंध उधळून टाकायचाय सगळीकडे..
प्रत्येकाच्या मनात एक कोर्ट असतं.. आपल्याला प्रामाणिकपणे चूक-बरोबर सांगणारं असं आपलं मन. सदसद्विवेकबुद्धी चा झरा वाहतो प्रत्येकाच्या आत. चुकताना थांबवणारं , योग्य ठिकाणी पाठ थोपटणारं असं आपल्या प्रत्येकाकडे असणारं प्रत्येकाचं private कोर्ट म्हणजेच मन
डोकवलं तर त्यात किती तरी files पेंडिंग सापडतील.?.. वर्षानुवर्षं तश्याच धूळ खात पडलेल्या.
ह्या फाइल्स म्हणजे आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती. अनेक अनुभव. चांगले, वाईट.
अनेक सल, अनेक अव्यक्त भावनांचा गुंता.
ह्या मनाने तरी किती ओझं वहायचं ?
कुणा बाहेरच्या वकीलाची काय गरज. कोण प्रामाणिक सल्ला देणार.?
जगायचं शिल्लक असतं खूप, पण स्वतःच्या कोर्टाने न दिलेली शिक्षा आपण बळंच ओढून घेतो अंगावर अनेकदा नकळत.
थोडं झूकून बघूया,
थोडं झोकून बघूया..
आपणच आपल्या मनाच्या कोर्टातून सगळ्या files क्लोज़ करूया..
No comments:
Post a Comment