असं म्हणतात तुमच्या जगण्याची क्वालिटी ही तुम्ही ज्यांच्या संपर्कात येता त्यांच्यावर देखील अवलंबून असते. तुम्ही चालत असतानाच आयुष्याच्या एका वळणावर तुम्हांला कायमची सावली देईल असा वटवृक्ष लाभतो पण तुम्ही मात्र ते वळण टाळून पुढील "हुलकावणी" देणाऱ्या मार्गाला स्विकारत पुढे जाता.
मुक्त जगण्याच्या धुंदीत आपण "ठेहेराव" नावाची गोष्ट विसरतो....
मग पुढे एका उंचावरून आपला कडेलोट हा ठरलेला असतो. तेव्हाही सावरणार्या हातात वेळीच आपला हात देण्यात झालेला विलंब हा कडेलोट न टळण्याचं एक प्रमुख कारण असतं.
आयुष्यात फक्त चांगली माणसं येऊन उपयोग नसतो तर त्यांची किंमत ओळखून त्यांचा मान ठेवण्याची जाणीव असणं हाही महत्वाचा भाग असतो.
आपलं एकटेपण हे अनेकदा ह्या अशाच चांगल्या दर्जाच्या माणसांना डीच करून, काही सुमार व्यक्तींच्या मोहात अडकण्याचाच परीपाक असतो...
आपल्या जगण्याचं मुल्यांकन इतर कुणी करु नये हे जसं खरं आहे तसंच इतरांचं आयुष्य, इतरांची स्वप्न आपली समजून जगण्याच्या मोहात आपण एकटेपणाची वाट तर धरत नाही ना हे समजून घेण्याची जबाबदारी पण आपलीच असते.
प्रत्येक व्यक्तीचा पिंजरा हा वेगळा आणि त्याची चावी पण वेगळीच नाही का ? -मनमानसी
No comments:
Post a Comment